सातव्या अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनाचे मोठ्या थाटात उदघाटन सोहळा संपन्न

32

🔹कवीला वेगळा निरीक्षणाचा डोळा पाहीजे

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.14मे):-नक्षञाचं देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फाऊंडेशन यांच्यावतीने महाकाव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी काव्यग्रंथदिंडी सोहळा पार पाडला.गणेशमंदिर ते नाट्यगृह ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.अनेक सारस्वत व प्रमुख पाहुणे सहभागी झाले होते.दिपप्रज्वलन व तुळशीवृंदावनला पाणी घालून पर्यावरण संदेश देत उदघाटन संपन्न झाले.

“उंच उंच वाढणाऱ्या इमारतीच्यामागे, झोपडीत राहणारा कामगार, त्याच्या घरातील दुःख दैन्य कवीला कळले पाहिजे. त्यासाठी कवीला सामान्य माणसाच्या जगण्याच्या पलिकडचे पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. तरच सामान्यांची सद्यस्थिती कवितेत येईल व कविता अधिक समृद्ध होईल. असे प्रतिपादन आपल्या महाकाव्यसमेलन अध्यक्षीय भाषणांत प्रसिद्ध हास्यकवी, महाकाव्यसंमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर यांनी केले.

नक्षञाचं
देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फाऊंडेशन यांच्यावतीने दोन दिवसांचे महाकाव्यसंमेलन पिंपरी येथे आयोजित केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी अशोक नायगावकर बोलत होते. यावेळी महाकाव्यसमेलन उदघाटक श्रीमंत मालोजीराजे भोसले हे होते. तसेच प्रमुख पाहुणे उद्योजक कृष्णकुमार गोयल, अॅड प्रफुल्ल भुजबळ महाराज, लेखक श्रीकांत चौगुले, कामगार नेते कैलासभाऊ कदम, आयोजक प्रा. राजेंद्र सोनवणे, स्वागताध्यक्ष शंभुदादा पवार,माऊली मलशेट्टी,आशिश कदम आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी नायगावकर पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला कवितेची समृद्ध परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या तसेच आधुनिक कवींच्या कविता आपण वाचल्या पाहिजेत. निसर्ग कवितेतील हळुवारपणा, सामाजिक कवितेतील आशय कळायला पाहिजे. त्यासाठी नियमितपणे कवितेचे वाचन श्रवण केले पाहिजे. “

यावेळी श्री कृष्णकुमार गोयल म्हणाले की,” एखाद्या घटनेकडे किंवा निसर्गातील बाबीकडे सामान्य माणसाचे बघणे आणि कवीचे निरिक्षण यात फरक आहे. कवीची कल्पनाशक्ती अफाट असते. त्यातून तो वेगळे जग आपल्यासमोर मांडतो.” अध्यक्षपदावरून बोलताना श्री मालोजीराजे म्हणाले की,” पूर्वीच्या काळी दरबारात कवी असायचे, त्यांना राजाश्रय मिळायचा. त्यांना राजकवी म्हणायचे, आता ती परिस्थिती राहिली नाही. तरीसुद्धा लोकशाही व्यवस्थेत कवींना राजाश्रय मिळाला पाहिजे. तर त्यांची कविता अधिक बहरेल. “

काही शतकांपूर्वी सर्व साहित्य आहे काव्यात्मकच होते. वेदकालापासून संत साहित्यापर्यंत सर्व ग्रंथांची निर्मिती काव्यात्मक पद्धतीनेच झाली आहे. त्यामुळे कवितेला मोठी परंपरा आहे, असे श्रीकांत चौगुले म्हणाले.याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात प्रा. राजेंद्र सोनवणे म्हणाले की, “कवीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे .कवीचा सन्मान म्हणजे कवितेचा सन्मान. त्यासाठी कवीला सन्माननीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करत आहे. शंभूदादा पवार यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार कवी वादळकार यांनी मानले.