पाण्याला चव असते….!

माझ्या उपरोक्त लेखाचे शिर्षक थोडे अचंबित करणारे नक्की आहे; पण मी तसे लिहिले म्हणजे काहीतरी अर्थ असणार म्हणूनच! आपण उच्च प्राथमिक शाळेपासून ऐकत, वाचत, लिहित आलोय की, ‘पाण्याला चव नसते!’ पाण्याच्या अनेक गुणधर्मापैकी तो एक गुणधर्म आहे. मग,मी पेश केलेले पाणी काही वेगळे आहे का? की त्याचा स्रोत वेगळा आहे. मग, माझ्या पाण्याला चव व तुमच्या पाण्याला चव नाही. असे का? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यांची सोडवणूक व वरील मुख्य प्रश्नांची सोड, चला तर करूया!

वर्तमानपत्रात आपण नेहमी वाचत असाल, ‘पाण्याने तोंडाची चव पळवली’, ‘पाणी झोम्बलं’, वैगरे! मला हा प्रश्न पडायचा की, पाणी एवढी चव गोळा करून काय करत असेल? कारण आपल्याजवळ जे नसते, ते आपण पळवतो, मागतो, काहीजण चोरतात. तसा या गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. तोंडाची चव पळवणे म्हणजे, पाणीच जर नसेल तर जेवण,चहा,अनेक पेय आपल्या मुखापर्यंत कसे येतील; आणि मुखापर्यंत नाही आले तर सगळे बेचवच की!

पाणी नसल्याने आपली चव जाते; याचा अर्थ पाण्याला चव आहे. कारण त्याच्यात चव नसती तर, ते नसण्याने आपले जीवन एवढे बेचव झालेच नसते. पण, आपल्याला हे कधी कळेल? पाणी संपल्यावर! पाणी खूप आहे. ते काही अजून हजारो वर्षे सम्पणार नाही. जसे पृथ्वीचा गोळा थंड होऊन, वातावरण तयार होऊन पाणी तयार व्हायला कैक वर्षांचा कालावधी लागला, तसे ते पूर्णतः नष्ट व्हायला पण वेळ लागेलच! याचा अर्थ असा नव्हे की, पाण्याचे दुर्भिक्ष्य यायला खूपच अवधी आहे अजून! तसे अजिबात नाही. समुद्र आहे म्हणून पाणी आहे. पावसाळा आहे म्हणून पाणी आहे. म्हणजे, तुमच्या बाजूला 100 फूट विहीर व त्याला पाणी 50 फुटावर जरी असले म्हणजे तेही खूप आहे, पण ते पाणी उपसण्याची कुठलीच व्यवस्था नसेल तर काय उपयोग त्या पाण्याच्या उपलब्धतेचा. ही गोष्ट आपल्याच राज्यातील रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई या सर्व जिल्ह्यांना लागू होते. जी जिल्हे मोठया समुद्राकाठी आहेत. कारण, आजही तिथे कैक वाड्या, वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

शासनाने मागे एक अहवाल प्रसिद्ध केला होता; त्यानुसार 2030 पर्यंत 40% लोकांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही.सध्याची आजची स्थिती सांगतो. महाराष्ट्रात 8 प्रमुख शहरे अशी आहेत, ज्यांना महिन्यातून फक्त तीन किंवा चारदा पाणीपुरवठा होतो. म्हणजे या शहरांतील नळांना दहा-अकरा दिवसांतून एकदाच पाणी येते. राज्यात 5 शहरे अशी आहेत, ज्यांना तीन ते पाच दिवसांत एकदाच पाणी येते. सहा शहरांना एक ते दोन दिवसांत एकदाच पाणीपुरवठा होतो, म्हणजेच, 19 प्रमुख शहरे (प्रामुख्याने जिल्हा मुख्यालये) अशी आहेत, जी दररोज पाण्यापासून वंचित आहेत. एवढे मोठे जायकवाडी धरण शेजारी असताना, नियमित पाण्याला ‘औरंगाबादकर’ उपाशीच म्हणावे लागतील अशी व्यथा आहे.

मुळात हा पाणीपुरवठा नियमित न होण्याला भरपूर कारणे असतील; जसे प्रशासनाचे नियोजन नसणे, पाइपलाइन लिकेजची समस्या, अनधिकृत पाणी वापर, पाण्याची नासाडी, वैगरे. पण, हे कधी; जेव्हा विवक्षित ठिकाणी पाणी असेल तर. पण, जिथे जलसाठाच नाही, त्यांनी काय करावे? आणि असे का झाले? याचा शोध घ्यावा लागेल. आता हा शोध काय नवीन नाही; आणि पावसाळ्यात कोणी लक्ष घालेल एवढा वेळ कोणाकडे नाही.कारण तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी असते.

‘इस्रायल’ या देशाचे नाव ऐकले असेलच! आशिया खंडातील एक देश, ज्याला युरोप,आशिया, आफ्रिकेने घेरलेले आहे. आता, या देशाची ओळख काहीपण असू द्या! पण, पूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा देश म्हणूनच होती. तिथला 60% प्रदेश अवर्षणग्रस्त व पाणी टंचाईने त्रस्त होता. पण, त्यांनी नन्तर पाण्याच्या बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, लोकांत पाण्याविषयी जनजागृती करून त्यांची समज वाढवून तोच अवर्षणग्रस्त देश आज पाण्याच्या बाबतीत परिपूर्ण केला आहे. इथे समुद्राचे पाणी मीठ काढून पिण्यायोग्य केले जाते. देशातील 80% जनता हेच पाणी पिण्यासाठी वापरते. पाण्याचा पुनर्वापर हे प्रामुख्याने इथे केला जातो. देशातील 80% वापरातील पाणी हे पुनर्वापर केलेलेच आहे. ‘थेंबातून शेती’ इस्रायलने करून दाखवली. लोकांना पाण्याचे महत्व पटवून 18% पाण्याचा वापरच कमी केला. ज्या देशात पाण्याचे दुर्भिक्ष होते; तो देश जगातील 150 देशांना पाणी वापर नियोजनाचे धडे आज शिकवत आहे. आजही तिथे पाऊस कमीच पडतो; पण साठवणूक इतकी आहे की, एक ढग बरसला तरी मेजवानी होईल.

आपल्या भारतात पण सन 2019 ला दुष्काळी ‘बुंदेलखंड’ प्रांतात दिशादर्शनासाठी (मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशचा भाग) इस्रायलचे शिष्टमंडळ आले होते. त्यांनी पाणी वापराचे अमूल्य धडे भारतीयांना दिले होते. आजही तिथे निसर्गाचे पाणी अर्थात मुबलक नाहीच; पण योग्य नियोजन व सुयोग्य वापरामुळे तो देश पाण्याने समृद्ध आहे.

मग, आपण नेमके चुकतो कुठे? आपण तर मान्सून पावसाच्या मुख्य गर्तेत आहोत. जिथे एका वर्षी पडलेला पाऊस दहा वर्षे पुरेल इतके पाणी आहे. तरीसुद्धा दरवर्षी गावोगावी टँकर लागलेली आहेतच. ही अवस्था अवर्षणग्रस्त प्रदेशाची असेल तर समजू शकतो; पण पावसाचे सरासरी 100 टक्के प्रमाण असणारे प्रदेशही पाण्यासाठी तरसत असतील तर शोकांतिकाच आहे.

तुम्हाला माहिती आहे का? एका छोट्याशा ढगाचे वजन 100 आफ्रिकन हत्तीएवढे असते, तर मान्सून मधील एका काळ्या ढगाचे वजन 2 लक्ष आफ्रिकन हत्तीएवढे असते. म्हणजे आपण आपल्या परिसरातील एकदा पडलेला पाऊस जरी अडवला तरीदेखील वर्षभर पुरेल इतका जलसाठा होऊ शकतो. अशी किमया अहमदनगर,बीड मधील बऱ्याच गावांनी केली आहे. उदाहरण घ्यायचेच झाले तर हिवरेबाजार,राळेगणसिद्धीचे घ्या! आदर्श आहेत आपल्यांसाठी ते! आपण आयते पाणी योग्य वापरू शकत नाही, तर पावसाचे पाणी साठवणे फार दूरची गोष्ट होईल. घरचा बोअर म्हणजे ‘फुकाची खीर’च! कितीही सांडा! कोणी अडवणारे नाहीच. तुम्हाला किती लागेल हो पाणी! दिवसाचे 1000 लिटर पुष्कळ झाले. याने तुमची पाणी समस्या कदाचीत वाढणार नाही; पण तुम्ही इतरांच्या हिश्श्याचेही पाणी पळवायले, त्याचे काय?

पाण्याचे नियोजन करा; असे म्हणून ऐकायला इतके आज्ञाधारक कोणी राहिले नाही. जे आज्ञाधारक होते, त्यांनी आधीच स्वयंस्फूर्तीने आपले गाव सुधारून घेतले. हिवरेबाजार गावात 35 फुटाखालील पाणी फक्त प्यायला वापरता येते. जेणेकरून बोअरच्या अतिरिक्त उपसावर नियंत्रण मिळू शकेल. त्यामुळे तिथे उन्हाळ्यातही विहिरीत जाऊन मुले पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. इतका डोळ्यांना दिसता जलसाठा आहे. दुसरे उदाहरण आहे, ‘खांडबारा’ परिसरातल्‍या दहा गावांचे. या गावांमध्‍ये एका शासकीय प्रकल्‍पाचा भाग म्हणून विहीरींचे खोलीकरण झाले, आणि काही नवीन विहीरीही झाल्‍या. प्रकल्‍प राबवणार्‍या संस्‍थेने आग्रह धरून प्रत्‍येक विहीरीवर पाणीवापर गट तयार केले. पूर्वी ज्‍या विहीरीचे पाणी एकच शेतकरी उपसत होता, तिचे पाणी आता तीन शेतकरी वाटून घेत आहेत. असा गट केल्‍याशिवाय नवीन विहीरच करता येणार नाही, असा नियम आता स्‍थानिक शेतकरी मंडळांनी केला आहे. पाणीवाटप केल्‍यामुळे आपोआपच नवीन विहीरींची गरज कमी झाली आहे.

आता हे सर्व काही संशोधने नक्कीच नाही. कोणी सांगून मार्गदर्शन करण्यापेक्षा त्या-त्या गावकऱ्यांना ते वेळीच समजले. पण, आपण नगरपालिकेच्या नळाचे पाणी नालीत सोडून खुश आहोत. जिथे पाणी बचत करणे हे काळाची गरज असताना, फुकट मिळालेले पाणी वाया घालणे हे नित्यकर्मच झाले आहे. ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ तंत्रज्ञान कागदाच्या पलीकडे जात नाही. मैलो- मैल पाण्यासाठी भटकंती करणारे, उन्हाळ्यात शासनाच्या नावे ओरडतात आणि पुढच्या उन्हाळ्यात तेच हांडे डोक्यावर घेऊन आपलेच कर्म, जड मन, जड ओझे वाहतात. स्वतः प्रयत्न करताना कोणी इथे दिसत नाही. ‘पाणी फौंडेशन’सारखी एखादी संस्था येते; आणि पाणी साठवणूक संस्कृती व्हावी याची शिकवण देते. देव आणि देवाचे शिलेदार प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही. म्हणून स्वतः मधील भक्तपणा जागवून जगाचा नव्हे आपल्या घरातल्या बोअरच्या पुनर्भरणाचा वसा हाती घेतला तरी आज लाख मोलाचे काम होईल.

म्हणून तोंडाची चव घालवायची नसेल, तर पाण्याची खरी चव ओळखून आताच कामाला लागा. नाहीतर पाण्याला चव आहे हे तर कळलेच; सोबत चव गेल्यावर उरलेली चव कडू,तुरट,तिखट असते; याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:-8806721206

नांदेड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED