एसीबीचा दणका!, पाच हजाराची लाच घेताना विस्तार अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; बीड जिल्ह्यात खळबळ

33

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.7जून):-माजलगाव येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडल्याने लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सेवा ज्येष्ठता यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो बीड जिल्हा परिषदेला पाठवण्यासाठी मोबदला म्हणून तक्रारदाराकडे दहा हजाराची लाच मागितली. मात्र तडजोडी अंती व्यवहार पाच हजारांमध्ये ठरवण्यात आला. हे पाच हजार रुपये स्वीकारताना माजलगाव येथील पंचायत समितीचे रामचंद्र होनाजी रोटेवाड या विस्तार अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराल ही कारवाई केली गेली.

या प्रकरणातील तक्रारदार हे ग्रामपंचायत केसापुरी येथे लिपिक आहेत. त्यांना सेवेत दहा वर्षे पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सेवा ज्येष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव दाखल करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवावा, अशी त्यांची मागणी होती. पण हा प्रस्ताव पाठवण्यासाठी या विस्ताराधिकाऱ्याने त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडी अंती व्यवहार पाच हजारांवर ठरला आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे पैसे कुठे द्यायचे हे देखील ठरलं होतं. विस्ताराधिकाऱ्याला लाच स्वीकारताना पंचासमोर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडलं. एसीबीने कारवाई केलेची ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे या बातमीने इतर लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.