“डॉ.आ ह.साळुंखे: विधायक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते” हे पुस्तक चिकित्सक विचारांचा ठेवा होय

डॉ विनोद वाघाळकर यांनी डॉ आ ह साळुंखे विधायक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते हे पुस्तक लिहले आहे.ज्यात त्यांनी प्राच्चविद्यापंडित ,संस्कृतभाषाप्रभू डॉ आ ह साळुंखे यांच्या समग्र लेखनाचा आणि त्यांच्या भाषणांचा, मुलाखतींचा आढावा घेतला आहे. त्यांच्या ग्रंथलेखन व भाषणे यांचा दृष्टिकोन हा सामाजिक जागृती आहे स्पष्टपणे दिसून येते.डॉ विनोद यांचे ‘डॉ आ ह साळुंखे यांचे इतिहास पुनर्लेखन एक चिकित्सक अभ्यास’ या विषयात शोधप्राबंध आहे.ज्यामुळे त्यांचा विद्यावाचस्पती म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी गौरव केलेला आहे. ते मनोगतात नोंदवतात की,डॉ आ ह यांनी काळाच्या पडद्याआड लुप्त झालेल्या वंचितांच्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे जोरकस समर्थन केले आहे.मागील साठ वर्षे त्यांनी चिंतनशील प्रयत्न करून मौलिक इतिहासग्रंथ शोषितांची व बहुजनांची बाजू मांडणारे लिहिले आहे.यातून त्यांचा विवेचनात्मक व वस्तुनिष्ठ मांडणी केलेली आहे.

प्रस्तुत ग्रंथ डॉ आ ह साळुंखे विधायक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते याची प्रस्तावना सामाजिक व शैक्षणिक अभ्यासक स्मृतिशेष डॉ उल्हास उढाण यांनी लिहिली आहे.त्यात ते डॉ विनोद यांच्या लेखनातील महत्वपूर्ण पैलूवर सारांश रुपात प्रकाश टाकतात.डॉ आ ह साळुंखे यांच्या लेखनात मनरंजन नसून त्यात इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचा विधायक विज्ञानवादी दृष्टिकोन आणि त्यांच्या कार्याची तटस्थ भूमिका मांडण्याचं कार्य आहे.प्राचीन भारताचा खोटा,विकृत आणि दिशाभूल करणारा इतिहास खरा म्हणून मांडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला,त्यांना उघड करण्याचं कार्य डॉ आ ह साळुंखे यांनी केले आहे.नवी पिढी आ ह यांचे साहित्य बारकाईने अभ्यास करत आहे,हे त्यांच्या साहित्याचे यश आहे.हे साहित्य परिवर्तनाच्या चळवळीला बळ ही देत आहे,असा विश्वास त्यांनी नमूद केला आहे .

प्रस्तुत ग्रंथात एकूण 11प्रकरणे आणि एक मुलाखत समाविष्ट आहे. ऐतिहासिक साहित्य, क्रांती- परिवर्तनाचा दृष्टिकोन,सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या पुनर्मांडणीचा दृष्टिकोन,निर्दोष समाज निर्मितीसाठी विद्रोही दृष्टिकोन,बहुजनांच्या स्वातंत्र्याची व मानवी मूल्ये प्रस्थापनेची धेयदृष्टी ,वैचारिक प्रबोधनाचा दृष्टिकोन,सत्यशोधकी दृष्टिकोन, संवैधानिक लोकशाहीचे समर्थन,इतिहास पुनर्लेखन एक न्याय दृष्टिकोन आणि समारोप अशी ही प्रकरणे आहेत.प्रकरणनिहाय विविध अनुरूप पुस्तकांचा आढावा घेतला आहे. पौराणीक कथानक म्हणून सीमित केलेल्या राजाला संशोधनातून एक ऐतिहासिक थोर पुरुष म्हणून ‘ *बळीवंश*’ ने प्रस्थापित केले आहे. बळीराजाचा वंशज जालंधर व त्याची पत्नी वृंदा यांचा विष्णू बरोबरचा संघर्ष.ज्यात विष्णू धोक्याने वृंदेचे शील भ्रष्ट करतो,त्याच विष्णू बरोबर तिचा दरवर्षी लावला जाणारा विवाह ही चुकीची कृती आहे हे *तुळशीचे लग्न एक समीक्षा* मधून समजते. *तथागत बुद्ध आणि संत तुकाराम* यातून दोन महामानवांच्या विचारांचा धागा अखंडपने एकच असल्याची नोंद दिसून येते.

भारतीय समाजातील उपेक्षित वंचित वर्गातून पुढे आलेल्या व कर्तबगारी सिद्ध केलेल्या *एकलव्य शंबुक आणि झलकारीबाई* व आद्य क्रांतिकारक असणारे उमाजीराजे नाईक यांच्यावर *प्राईड ऑफ स्वराज्य* यातून नजरेत आणले. आव्हानवीर असणारे थोर संत तुकारामांच्या चरित्राचा *विद्रोही तुकाराम* तर संत तुकारामांचे निवडक अभंग,तुकारामांचे अभंगशतक , न सरे ऐसे तुकोबांचे दान,तुकारामांचा शेतकरी हे मौलिक ग्रंथ यांचा आढावा ही आहे.आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतिकारक महात्मा फुले यांच्या धार्मिक व शैक्षणिक कार्याचे *महात्मा फुले व शिक्षण* आणि *महात्मा फुले आणि धर्म* हे दोन ग्रंथ आहेत. जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्यातील पालकत्व *शिवराय संस्कार आणि शिक्षण* तसेच राज्याभिषेक बाबत झालेला संघर्ष याची विस्तृत माहिती *छ शिवाजी म यांचा दुसरा राज्याभिषेक* तर समाजप्रबोधन करणारे मित्रांना शत्रू करू नका,परिवर्तन शस्त्रही कलाही,अंधाराचे बुरुज ढासळतील, संवाद सहृदय श्रोत्यांशी, सारखे ग्रंथ आहेत. विज्ञाननिष्ठता व धर्म बाबत धर्म की धर्मापलीकडे,गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो,आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल हे ग्रंथ आहेतच .तर स्त्रियांचे अस्तित्व,हक्क अधिकार व धर्माने दिलेली वागणूक हे हिंदू संस्कृती आणि स्त्री, महाभारतातील स्त्रिया भाग 1,2,व3असे ग्रंथ ..स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या दिशेनेही लेखन आहे.तर वैदिकांनी निर्माण केलेले विविध धार्मिक ग्रंथ व सुत्रग्रंथ इत्यादीचे अंतरंग कसे आहेत याची चिकित्सा वैदिक धर्मसुत्रे व बहुजनांची गुलामगिरी,ऐत रे य ब्राह्मण एक चिकित्सा,मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती हे ग्रंथ आहेत. सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गोतम बुध्द ग्रंथातून बुद्धांची वास्तववादी व यथोचित सन्मान करणारी प्रतिमा रेखाटली आहे.ज्यात त्यांच्या जीवनातील प्रकाशित अप्रकाशित पैलूवर अत्यंत उद्बोधक प्रकाश टाकलेला आहे.

मनुस्मृतिचे समर्थन करणारांना चपराक देताना आ ह लिहतात,.. त्या भुताच्या लांब लांब सावल्यानी भारतीय क्षितिज काळवंडू लागले असताना आम्ही आमची लेखणी आणि वाणी बासनात बांधून ठेवू अशा भ्रमात राहू नका..सांस्कृतिक व धार्मिक बाबतीत,विज्ञानाच्या व नवविचारांच्या वादळी तडाख्यात धर्मशक्ती क्षीण होते की काय? असे मध्यंतरी वाटत असताना पुन्हा आपले अस्तित्व पूर्ववत जमवण्यात धर्माला बरेच यश आले….विद्रोह करू इच्छिणाऱ्या सर्वांनी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातून भटजीला रिटायर करावे.कारण भटजीनीचं गुलामगिरीचा विषारी कचरा बहुजनांच्या मनात भरला आहे.जसा आदर्श असतो तसे समाजाचे चरित्र आचरण घडत असते.
आजचा शिक्षित म्हणवणारा ठराविक वर्गसुद्धा यज्ञादी कर्मकांडाचा सहारा घेतांना संकट निवारणाची व सुख समृद्धीची खुळचट कल्पना मनाशी धरून अवैज्ञानिकपणाचे दर्शन घडवत आहे.माणसांना जनावरांच्या पातळीवर ढकलणारी मनुस्मृती कोठे आणि त्यांना त्या पातळी वरून पुन्हा माणूस म्हणून उभे करणारी सध्याची राज्यघटना कोठे! राज्यघटनेच्या या कृतीमुळेच यांच्या अहंकाराची नांगी छाटली गेली आहे आणि म्हणून हे राज्यघटनेचा द्वेष करीत आहेत!

आपल्या पिढीची ही जबाबदारी आहे की प्राचीन काळापासून चा आपला सर्व क्षेत्रातील इतिहास लोकांपुढे ठेवावा.आपल्या साहित्याच्या कसोट्या आपल्या आपण तयार कराव्या.प्रस्थापित व्यवस्थेने ज्यांची उपेक्षा निंदा वा टवाळी केली आहे,त्यांचे नव्याने मूल्यांकन करावे..

सदर पुस्तकाचे मुखपृष्ठावर डॉ आ ह साळुंखे यांचे छायाचित्र उत्साहवर्धक आहे.त्याखाली असणाऱ्या ओळी सूर्य होता आले नाही तरी सूर्यफुल व्हावे, मस्तक त्याच्याकडे असावे, त्याच्या आलोकात पहावे!बुध्द होता आले नाही,तरी बुध्दफुल व्हावे, हृदय त्याच्याकडे असावे,त्याच्या स्फूर्तीत जगावे!.लेखक डॉ विनोद यांनी हे पुस्तक फुले दाम्पत्य ,डॉ आंबेडकर आणि आपले आई वडील यांना अर्पण केले आहे. पुस्तकाची बांधणी, कागद , कव्हर उत्कृष्ठ दर्जाचे आहे.पुस्तकाच्या शेवटच्या पेजवर हार शाल बुके ऐवजी बुक पुस्तक भेट देण्याबाबतचा शासननिर्णय जोडला आहे.मलपृष्ठावर लेखक परिचय व स्मृतीशेष डॉ उल्हास उढाण याची पाठराखण आहे.पुस्तक ISBN आहे.ज्यामुळे शासकीय, निमशासकीय संस्था,ग्रंथालये यांना घेता येईल..डॉ विनोद वाघळकर यांच्या पुस्तकासाठी त्यांना खूप धन्यवाद. असेच दर्जेदार साहित्य त्यांनी लेखन करावे..

पुस्तकाचे नाव:- “डॉ.आ.ह.साळुंखे :विधायक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते.”
लेखक: डॉ.विनोद वाघाळकर.
प्रकाशन:अजिंठा प्रकाशन,औरंगाबाद
सेवामुल्य:-75₹
संपर्क 7798655796.

✒️समीक्षण:- रामेश्वर तिरमुखे(अंबड,जिल्हा जालना)मो:-9420705653

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED