ठाम स्वप्न नि सातत्यपूर्ण प्रयत्नातील गतीमुळे स्वप्नाचीच तुमच्याकडे धाव..!

30

🔹पहिल्या प्रयत्नात आयपीएस असलेल्या असमाधानी दिव्या शक्तीची दुस-याच प्रयत्नात स्वप्नझेप

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर या परीक्षेत रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा सर्वत्र येऊ लागल्या. खरंतर लोकांना देखील अशा गोष्टी ऐकायला फार आवडतात. यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. अशीच एक कथा आहे, बिहारमधील यूपीएससी उमेदवार दिव्या शक्तीची. जिने एकदा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि उतीर्ण देखील झाली.

दिव्या शक्ती आहे तरी कोण? दिव्या शक्ती ही मूळची सारण येथील जलालपूर जिल्ह्यातील आहे. ती डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मली आणि वाढली. ती नेहमीच गुणवान विद्यार्थिनी होती. तिने मुझफ्फरपूरमधून हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले आणि ती इंटरमिजिएट अभ्यासासाठी डीपीएस बोकारो येथे गेली.

तेथे तिने बीआयटीएस पिलानी येथून संगणक शास्त्रात अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. दिव्याने त्याच कॉलेजमधून अर्थशास्त्रात एमएससीही केले आहे. त्यानंतर तिने एका अमेरिकन कंपनीत देखील दोन वर्षे काम केले आणि २०१९ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली.

दिव्याने तिच्या पहिल्या प्रयत्नात ७९ वा क्रमांक मिळवला आणि २०१९ मध्ये तिची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. मात्र, तिची स्वप्नं फार मोठी होती आणि तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते.

म्हणून, मग तिने आपल्या या परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि पुन्हा एकदा यूपीएससी २०२२ च्या परीक्षेला बसली. दिव्या शक्तीने तिच्या आयपीएस मध्ये प्रशिक्षण घेत परीक्षेची तयारी केली आणि तिने या वर्षी अखिल भारतीय स्तरावर ५८ वी रँक मिळवले. ज्यानंतर तिला खूप आनंद झाला.

दिव्याचे वडील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, बेतियाचे माजी अधीक्षक आहेत. ते म्हणाले की, ”दिव्या ही सुरुवातीपासूनच अभ्यासू होती. ज्यामुळे तिच्या जिद्दीने तिने हे सगळं केलं आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे. ती अनेकांसाठी प्रेरणा आहे.”

✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९