भक्तांनो संधी दवडू नका…

66

गेल्या एका महिन्यात १३ काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्यात. शेकडो काश्मिरी पंडित रस्त्यावर आलेत. सुरक्षेअभावी अनेकांनी सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान, गृहमंत्री व भारतीय शासनाविरोधात काश्मिरी पंडितांचा प्रचंड जनक्षोभ उसळला आहे.गेली अनेक दिवस त्यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र स्वरूपाची निदर्शने केली आहेत. शेवटी ते लोक काश्मीर सोडून जिवाच्या भीतीने पलायन करत आहेत. काश्मीर फाईल्स चित्रपट आल्यानंतर ज्या ज्या भारतीयांचे काश्मिरी पंडितांविषयीचे प्रेम उतू जात होते, त्या भक्तांकरिता आपली देशभक्ती सिद्ध करण्याची अत्यंत सुवर्ण संधी चालून आलेली आहे.

दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये अनंतनागमध्ये सरपंच अजय पंडिता याची हत्या करण्यात आली होती. तर, मागच्याच महिन्यात एका अधिकाऱ्याची व पोलीस कॉन्स्टेबलची हत्या करण्यात आली होती व आता गेल्या आठवड्याभरात एका हिंदू शिक्षिकेसह एका बँक मॅनेजरची आतांकवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. काश्मिरात तब्बल ८ हजार कर्मचारी आहेत. त्यातील १८०० कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. काहींच्या कुटुंबात तीन तर काहींच्या कुटुंबात चार सदस्य आहेत. जवळपास १३०० कर्मचाऱ्यांची व्यवस्था ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये करण्यात आलेली होती. तर, बाकीचे कर्मचारी भाड्याच्या घरांत वास्तव्यास होते. मात्र, आता टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटना बघता केंद्र सरकार सुरक्षेच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळेच हजारो हिंदू कुटुंबीयांनी काश्मीर सोडले आहे. मागील गुरुवारी म्हणजेच २ जून २०२२ रोजी एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल १८०० पंडितांसह ३ हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर सोडल्याचं वृत्त समोर आलंय.

त्यामुळं काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. तेथील हिंदू पुन्हा धोक्यात आला आहे. काश्मिरी हिंदू निदर्शने, मीडिया- सोशल मीडिया च्या माध्यमातून सातत्याने आम्हाला सुरक्षा पुरविण्याचे आवाहन करतो आहे परंतु त्यांच्याकडे लक्ष द्यायला न मा.पंतप्रधानांना वेळ आहे ना गृहमंत्र्यांना.ह्या सर्व टार्गेट किलिंगमुळे १९९० साली काश्मिरी पंडित, शीख आणि मुस्लिम बांधवांच्या झालेल्या सामूहिक हिंसाचाराची आठवण देशाला होते आहे. विशेष म्हणजे १९९० मध्ये ही घटना जेव्हा घडली त्यावेळी सुद्धा केंद्रात भाजपा समर्थित व्ही.पी. सिंग यांचे सरकार होते. यावेळी काश्मीरचे राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नेते जगमोहन मल्होत्रा हे राज्यकारभार पाहात होते. सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी या भाजपा समर्थित व्ही.पी.सिंग सरकारमध्ये देशाचे गृहमंत्री काश्मीरचेच मुस्लिम नेते मुफ़्ती मोहम्मद सईद होते. आणि आजसुद्धा देशात भाजपाचेच सरकार असून भाजपाचेच गृहमंत्री आहेत. म्हणजे १९९० साली पहिल्यांदा काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून पलायन करावं लागलं होतं आणि त्यानंतर आताच्या काळात दुसऱ्यांदा काश्मिरी पंडितांना तेथून पलायन करावं लागतंय या दोन्ही वेळी देशात कायम हिंदूंची काळजी दाखविणारे भाजपाचेच सरकार आहे ह्याला काय योगायोग म्हणावा?

ही झाली आजची काश्मिरातील परिस्थिती. काश्मीर फाईल्स चित्रपट बघून आकांडतांडव करणाऱ्या, काश्मिरी पंडितांवरील पुतना मावशीच प्रेम उतू जाणाऱ्या भक्तांना आपली देशभक्ती सिद्ध करण्याची नामी संधी चालून आलेली आहे. काश्मिरातील हजारो हिंदू सरकारी कर्मचारी जिवाच्या भीतीने काश्मीर सोडून पलायन करत आहेत. केंद्रातील मोदी सरकार त्यांचे रक्षण करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. काश्मिरातील चौका-चौकात तैनात असलेले पोलीस, सीआरपीएफ, सैन्य सुद्धा त्यांची सुरक्षा करण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे आता भक्तांची ही जबाबदारी आहे की त्यांनी स्वतःहुन पुढाकार घ्यावा आणि काश्मिरात ज्यांच्या रोजच हत्या होताहेत त्या आपल्या हिंदू भावांना काश्मिरात जाऊन सुरक्षा पुरवावी किंवा त्या काश्मिरी हिंदू सरकारी नोकरदारांना तेथून परत बोलावून वातावरण निवळेपर्यंत त्यांच्या जागी आपण तेथील सरकारी कार्यालयात नोकरी करावी. त्यांना आधार द्यावा, हिम्मत द्यावी. त्यांचे रक्षण करावे.
विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि ते तमाम भक्तलोक ज्यांचा देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे, ज्यांना काश्मिरातील हिंदूंसाठी मनात अतीव प्रेम आणि कळवळा आहे त्यांनी एकूण परिस्थिती बघता एक क्षणभरसुद्धा घरी थांबू नये. या देशाला- हिंदू धर्माला त्यांची गरज आहे. त्यांनी आजच निघून काश्मिरात जाऊन तेथून नोकऱ्या सोडून निघून गेलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांच्या जागेवर रुजू व्हावे व दहशतवाद्यांना ठणकावून सांगावे की या देशात तुम्हाला न घाबरणाऱ्या कट्टर हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे. ही वेळ विचार करण्याची नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आहे. अशा संधी आयुष्यात वारंवार येत नसतात. आज इतिहासात स्वतः चे नाव अमर करण्याची नामी संधी भक्तांना चालून आली आहे.
भक्तांनी अशी हिम्मत दाखविल्यास फक्त आतंकवाद्यांनाच नव्हे तर या देशातील खांग्रेसी, परिवर्तनवादी, शेक्युलर-फुरोगाम्यांना सुद्धा कायमची एक जरब बसेल की हे कट्टर हिंदुत्ववादी फक्त बोलबच्चनच देत नाहीत, हे फक्त सुधारणावादी हिंदूंनाच मारत नाहीत तर धर्मासाठी वेळप्रसंगी आपल्या जिवाचीसुद्धा परवा न करता आतंकवाद्यांशी सुद्धा थेट भिडतात. फक्त भारतीय मुस्लिमांबद्दलच द्वेष पसरवत नाहीत तर काश्मिरात जाऊन पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या छातीवर सुद्धा बसू शकतात. असे झाले तरच निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्माने गमावलेली देशाची इभ्रत काही प्रमाणात का होईना परत मिळू शकेल.
आज जम्मूपासून काश्मीरपर्यंत जाणाऱ्या महामार्गावर जागोजागी सीआरपीएफ आणि सैन्याचे सशस्त्र जवान आणि गाड्या तैनात आहेत.

इतके की जणू आपल्याला आपण देशाच्या बॉर्डरवर उभे असल्याचा भास व्हावा. काश्मिरात सुद्धा जवळपास प्रत्येकच चौकात जागा घेऊन तिथे बंकर बनविण्यात आले आहेत. २४ तास काश्मिरातील रस्त्यांवरून पोलीस आणि सैन्याची पेट्रोलिंग सुरूच असते. तरीसुद्धा सरकारी कार्यालयांमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये घुसून ह्या काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतच आहेत. उलट वाढत आहेत. तेथील हिंदू आता उघड उघड पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शाह यांच्या विराधात घोषणा देवू व बोलू लागले आहे. १९९० च्या घटनेवर चित्रपट बनवून, जुन्या आठवणी ताज्या करून संपूर्ण देशात दोन धर्मांमध्ये द्वेष पसरविण्यात आला. पंतप्रधान, गृहमंत्री व भाजप कडून काश्मीर फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन करत अनेक शहरात भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांसाठी ह्या चित्रपटाचे मोफत शो ठेवण्यात आले. हा चित्रपट बघणे म्हणजेच जणू देशभक्तीचा पुरावा असल्यासारखा प्रचार केला गेला. काश्मिरी हिंदूंची काळजी दाखविली गेली. अनुपम खेर सारख्यांनी तर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माध्यमांसमोर मगरीचे अश्रूसुद्धा गाळले. परंतु आता रोज होणाऱ्या हिंदूंच्या हत्या त्यांना दिसत नसाव्यात.

विवेक अग्निहोत्री सारख्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंच्या दुःखाचे मार्केटिंग करून जो पैसा कमावला त्यातून त्याने सद्यस्थितीत काश्मिरात रोज हत्या होत असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कवडीसुद्धा मदत करू नये हे कोणते हिंदुप्रेम? हा तर धर्माचा धंदा झाला.काश्मिरी हिंदूंना आता केंद्र शासन-प्रशासन, चित्रपट निर्माते- कलाकार, नेते-मंत्री कुणाकडूनच काही आशा नाही, त्यांना आशा आहे त्या भक्तांकडून ज्यांना हिंदू धर्माची सर्वात जास्त काळजी आहे. त्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांकडून काश्मिरी हिंदूंना आशा आहे ज्या कायम हिंदू धर्म धोक्यात असल्याचा प्रचार करत असतात. बस आता ह्या भक्तांनी ह्या काश्मिरी आणि देशातील सर्वच हिंदूंच्या अपेक्षेवर खरे उतरावे. फक्त हिंदुत्व रक्षणाच्या वल्गना न करता थेट काश्मिरात जाऊन आपली देशभक्ती कृतीतून सिद्ध करावी. भक्तांनी ही संधी सोडू नये. या संधीचे सोने करावे..

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-9822992666