‘अग्निपथ’ विरोधात बसपाचा ‘विशाल जनआक्रोश धिक्कार मोर्चा’

70

🔹योजना तात्काळ मागे घ्याय, अन्यथा तीव्र आंदोलन-अँड.संदीप ताजने

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.20जून):-लष्कर भरतीसाठी केंद्र सरकारने घोषित केलेली ‘अग्निपथ’ योजना देशातील असंख्य तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करणारी आहे. ही योजना तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी करीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज,सोमवारी (२० जून) प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रदेश प्रभारी मा.सुनिलजी डोंगरे, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.चेतनभाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थित अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘विशाल जनआक्रोश धिक्कार मोर्चा’ काढण्यात आला.यावेळी जिल्हाधिकार्यांना बसपाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. ही योजना तात्काळ मागे घेतली नाही, तर राज्यभर आंदोलन उभारू; असा इशारा यानिमित्ताने बसपाने दिला आहे.

केंद्रातील भाजप सरकारला या अग्निविरांच्या निमित्ताने केवळ त्यांच्या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक हवे आहेत, हे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते, असा दावा अँड.ताजने यांनी केला आहे. अग्निपथ योजनेविरोधात देशातील तरूणांच्या तनातील खदखद, निराशा हिंसक आंदोलनातून बाहेर पडत आहे. सरकारने त्यामुळे योजनेवर तात्काळ पुनर्विचार करण्याची मागणी मा.राष्ट्रीय अध्यक्षा बहन सुश्री मायावती जी यांनी देखील केली आहे. आता सरकारने ही योजना मागे घेतली नाही, तर आदरणीय बहेनजींच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करू असे अँड.ताजने म्हणाले.

ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे अन्यायकारक ठरेल. राज्य सरकार देखील ओबीसींचा ‘इम्पेरिकल डेटा’ गोळा करण्यासाठी दिरंगाई करीत आहे. अद्यापही हा डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही.त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळेच ओबीसी बांधवांवर अन्याय होत असल्याचा आरोप देखील अँड.ताजने यांनी केला.

देशातील जनता महागाई, बेरोजगारीने पिचल्या गेली आहे.अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये देखील बर्याच समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.शहरात महानगर पालिकेने घोषित केलेल्या सर्व झोपडपट्ट्यांना तसेच दलित वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. प्रशासनाने त्यामुळे या भागांमधील जुनी पाईप लाईन बदलून नवीन पाईप लाईन टाकावी अशी मागणी देखील यानिमित्ताने ताजने यांनी केली. अमरावती शहर अध्यक्ष सुदाम बोरकर तसेच उपारध्यक्ष जितेंद्र पंचगाम यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. जिल्हा बामसेफ संयोजन मा.दिपक धुरंधर सर तसेच माजी नगरसेविका तसेच माजी महिला जिल्हाध्यक्ष सौ.निर्मलाताई सुदाम बोरकर, प्रदेश सचिव अविनाश वानखडे, प्रा.प्रेम मनवर सर, रामभाऊ पाटील, अजय भाऊ गोंडाने, भगवान लोणारे, किरण सहारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

अमरावतीतील वैद्यकीय महाविद्यालय केवळ कागदावरच-सुनील डोंगरे

अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली आहे. पंरतु, ही घोषणा अद्यापही केवळ कागदावरच आहे.लवकरात लवकर महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी प्रदेश प्रभारी मा.सुनील डोंगरे साहेबांनी केली.या रुग्णालयामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसह आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने बरीच सुविधा उपलब्ध होईल,असे ते म्हणाले.यासोबत शहरातील सर्व झोपडपट्टयांसह दलित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना लवकरात लवकरच पी.आर कार्ड देण्याची मागणी देखील बसपाकडून करण्यात आली आहे.

दारिद्रय रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षण करा-चेतनभाऊ पवार
महानगर पालिकेअंतर्गत दिले जाणारे दारिद्रय रेषा कार्ड संबंधी अद्यापही सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. तात्काळ हे सर्वेक्षण करीत गोरगरीबांना मदत करण्याची मागणी प्रदेश उपाध्यक्ष चेतनभाऊ पवार यांनी केली आहे.शिवाय प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेची थांबलेली सर्व बांधकामे तातडीने सुरू करण्यात यावी तसेच रमाई आवास योजनेचा गेला पाच वर्षातील निधी कुठे खर्च करण्यात आला यासंबंधीचा हिशोब सत्ताधार्यांनी द्यावी अशी मागणी देखील पवार यांनी केला आहे.मागण्या मान्य करण्यात आल्या नाही, तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बसपाने दिला आहे.