ओबीसीचे हितशत्रू कोण?

ओबीसी राजकीय आरक्षणावर डल्ला मारल्यानंतर ओबीसीचा इंपिरीकल डाटा न्यायालयाने तात्काळ मागितला असून, महाराष्ट्र राज्य सरकारची कोंडी केली. ओबीसीचा इंपिरीकल डाटा गोळा करण्यासाठी त्यामुळे मा.जयंतकुमार बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग कामाला लागले. हाच समर्पित आयोग, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरुन ओबीसीची बाजू जाणून घेऊन, अहवालाद्वारे शासनाकडे मांडणार आहे. दरम्यान, समर्पित आयोगाला मोठ्या संख्येने निवेदने देऊन ओबीसीनी दाखवून दिले की, आज ओबीसी जाग्रुत होत आहे. झोपलेल्याला जागं करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग करता येत नाही हे मिथक ओबीसीसाठी लागू पडणार नाही. हे ओबीसीच्या सद्यस्थितीतील जाग्रुतीवरुनही दिसून येईल. ओबीसी समाजात हजारो जाती आहेत. आणि हिंदुंमधील जातींशिवाय मुस्लिम ख्रिश्चन आदि अन्यधर्मीय मागास यांचा समावेश आहे, भिन्नधर्मीय ओबीसीतील एकोपा विरोधकांची निंद हराम करणारा ठरणार आहे.

ओबीसीची जातवार जनगणना आता कळीचा मुद्दा बनला आहे. जनगनणेच्या मागणीने ओबीसीकरीता लढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. केवळ संख्या वाढत आहे असे नाही तर ओबीसीच्या न्याय्य हक्काचे शत्रू कोण, ओबीसी मागास का आहे, जातीव्यवस्थेनेच ओबीसीचे कंबरडे मोडले असून, उच्चजातीय शोषकांची बारभाई कारस्थाने ओबीसीच्या लक्षात येत आहे. अशा जागृत, धडपड करणाऱ्या ओबीसी बांधवांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे ओबीसीचे विरोधक मागे सरतील. हा लढा फार जिकरीचा आहे. संयमाने लढला पाहिजे.मुस्लिम, ख्रिश्चन, शिख,बौद्ध, दलित आदिवासी यांनी आजवर ओबीसीच्या अधिकाराला कधीही विरोध केलेला नाही. तर समर्पित आयोगाला ओबीसींच्या न्याय्य हक्काच्या विरोधात निवेदन देणाऱ्यांचे बिंग फुटले. ओबीसीचे हे खरे हितशत्रू आजचे नाही तर, त्या शत्रुत्वाला दीर्घकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सांस्कृतिक संघर्षाची परंपरा आहे.

सिंधुजनांची सम्रुद्ध अशी मूळ संस्कृती नष्ट करणारे; बळीराजाला कपटाने मारणारे; महावीर, बुद्ध, चार्वाक यांच्या न्यायी तत्त्वज्ञानाला विरोध करणारे; कबीर, बसवेश्वर, तुकाराम, शिवराय,महानुभाव , वारकरी पासून तर फुले,शाहू पेरियार, आंबेडकर अशा ज्यांनी समतेची न्यायाची बाजू घेतली त्यांना विरोध करणारी छावणी आहे. ज्यांनी
ओबीसींसह स्त्रिशुद्रातिशुद्रांचे दमन करण्यासाठी जातीव्यवस्था मजबूत केली. एवढेच नव्हे तर ती व्यवस्था पक्की करण्यासाठी रग्गड साहित्य निर्मिती केली. ‘वेद म्हणजे भेद’ अशी परखड चिकित्सा केली जाते, ती काही उगीच नव्हे. वेदांशिवाय मनुस्मृती आणि सर्व स्मृतिग्रंथ, पुराणे धर्मग्रंथ रचून त्यातून ओबीसींवर गुलामी लादली. ती गुलामीची मानसिकता प्रकर्षाने कायम ठेवण्यासाठी, धर्मांधता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ओबीसीची बाजू घेणारी अवैदिक विचारधारा दीर्घकाळापासून या विषमता खोरांशी लढा देत आहेत. ओबीसीची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याला कोणाचा विरोध नेहमी होत आलेला आहे हे समजून घेणे ओबीसी आंदोलनाचे पुढील टप्पे असतील.

ओबीसी प्रबोधनाच्या या प्रवाहातील सत्यशोधकी ब्राह्मणेतर चळवळ फार महत्त्वाची ठरते. सत्यशोधकांनी ओबीसी शुद्र-अतिशुद्र- स्त्रिया यांच्या विरोधकांना ओळखले आणि धर्माच्या नावाखाली लुडबुड करणाऱ्या ईश्वर आणि माणूस यांच्या मधल्या दलालापासून सावध राहण्याचे सूत्र मांडले. अशा ओबीसी विरोधकांना दान दक्षिणा देऊ नये, त्यांच्या हातून लग्ने लावू नये, जन्मपत्रिका तयार करू नये, लग्न, ग्रहशांती, लग्नपत्रिका, मुंज, पिंडदान, आदि कार्यातून पुरोहिताला बाद करून ही क्रुत्ये ओबीसी बहुजनांनी स्वतः केली पाहिजेत. देव आणि उपासकांच्या मधला दलाल हटवा. धार्मिक प्रसंगी पुरोहिताशिवाय कार्य पार पाडा. अशा अनेक गोष्टी ब्राम्हणेतर सत्यशोधकांनी केल्यात. यातून ओबीसींचे धार्मिक स्वातंत्र्य मिळेल. शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणानंतर क्षात्रजगद्गुरुंचे धर्मपीठ निर्माण केले. ओबीसी ब्राह्मणेतरांतील पुरोहितांना प्रशिक्षण देण्यासाठी पुरोहित शाळा सुरू केल्या.ब्राह्मणेत्तर ओबीसी मधील पुरोहित प्रशिक्षित केले.साहित्याच्या माध्यमातून ब्राह्मणेतरांनी ‘स्वयंपुरोहित’ सारखा ग्रंथ रचून पुरोहितांची नाकेबंदी करण्यासाठी हिंमत दिली. अनेक धार्मिक प्रसंगी करावयाचे विधी सांगणारे साहित्य निर्माण केले. सत्यशोधक मंगलाष्टके, सार्वजनिक सत्यधर्मविधी, सत्यनारायणाच्या पोथीला पर्याय अशी पर्यायी धर्मकृत्ये ओबीसींनी स्वतः करावी यातून विरोधकांना ओबीसींना परेशान करण्याची संधी मिळणार नाही.

शोषणाची संधी मिळणार नाही, ही त्यामागील न्यायाची भूमिका होती, हे ध्यानात घ्यायला हवे. अलीकडच्या काळात शिवधर्म संहिता ही त्याचाच अंश वाटेल. सत्यधर्मीय, सत्यशोधकी पद्धतीने, ग्रामगीतेतून, शिवधर्मगाथेतून लख्ख केलेल्या अनेक अवैदिक परंपरा ओबीसी-ब्राह्मणेतरांचा धर्मस्वातंत्र्याचा लढा अधिक मजबूत करणाऱ्या वाटतील. आपली निखळ संस्कृती जी कृषिजीवनाशी संन्निध आहे. श्रमसंस्कृतीशी तादात्म्य पावलेली आहे. लोकजीवनाचा झुळझुळ वाहणारा निरंतर प्रवाह आहे. ही संस्कृती आपल्याला या धर्मस्वातंत्र्याशिवाय लाभणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक परिवर्तन ही खरी यापुढे लढाई असली पाहिजे. आज ओबीसी ज्या आतुरतेने या परिवर्तनवादी वातावरणात प्रविष्ट होत आहे. त्याला आपल्या निखळ समतावादी प्रवाहात सामील होण्याची ही फार मोठी संधी आहे.ओबीसींचे विरोधक हे अस्सल विषमतावादी आहेत. ‘ब्राह्मणेतरांपेक्षा तेच स्त्रियांना कमी लेखतात. स्त्री शिक्षणाला त्यांनी विरोध केला. त्यांनी स्त्रीजातीला हीन ठरवले. आई बहिणी लेकी सुना यांच्याविषयी पुरातन काळापासून संशय घेतलेला आहे. हे विरोधक इराणमधून आलेले आर्य असून त्यांना धर्म नाही. भाषा नाही. धर्माचे ढोंग करून आमचे अन्न खाऊन आम्हास कनिष्ठ समजतात. आमच्यात तंटे लावतात. मंदिरातील मूर्तींना शिवू देत नाही. तीर्थाच्या ठिकाणी लुटतात. आमची दक्षिणा ,आमचे अन्न खाऊन आम्हाला ते कनिष्ठ समजतात.’ अशी वास्तव मांडणी जवळकर करतात, त्याची प्रासंगिकता समजली पाहिजे.

ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यासाठी ज्या जातींनी त्यांच्या जातीच्या नावानिशी असलेल्या लेटरपॅडवर निवेदने दिलीत त्यावरून ओबीसींचे हितशत्रू आता ओबीसींना नव्या स्वातंत्र्यासाठी विचार करायला भाग पाडत आहेत. याचीही बूज राखली पाहिजे.

✒️अनुज हुलके(9823883541)

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED