मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने वडवणीतील पत्रकारांच्या वतीने सत्कार

58

✒️वडवणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वडवणी(दि.24जून):-पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेने मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम.देशमुख यांना जाहीर झाल्याने वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

याबाबत अधिक वृत्त असे की,पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेने मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम.देशमुख यांना जाहीर झाला आहे.शनिवार दिनांक २५ जून रोजी पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ११ वाजता दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते एस एम देशमुख यांना सन्मानित केले जाणार आहे.एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांच्या हक्कासाठी आणि हितासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या सतत तीस वर्षांच्या अथक परिश्रमातून आणि संघर्षातून राज्यातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळाले, पत्रकार संरक्षण कायदा असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. याचे सर्वस्वी श्रेय एस.एम.देशमुख यांना आहे.

पत्रकार पेन्शन योजना, पत्रकार आरोग्य योजनेसह पत्रकारांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावून पत्रकारांना मोठा आधार दिला.
एखादा पत्रकार आजारी असेल, एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला असेल तर संबंधित पत्रकारांना पहिल्यांदा एस एम देशमुख यांची आठवण होते आणि ते गरजू पत्रकारांच्या मदतीला धावून देखील जातात याचा अनुभव राज्यातील अनेकांनी आहे. राज्यातील पत्रकारांसाठी आयुष्यभर संघर्ष करणा-या एस.एम.देशमुख यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य असल्याने वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा देवडी येथे जाऊन यथोचित सत्कार केला.यावेळी मराठी पत्रकार परिषद सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीचे राज्य प्रमुख संपादक अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी तालुका अध्यक्ष विनायक जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे, सरचिटणीस सतिश सोनवणे, कोषाध्यक्ष शांतीनाथ जैन, पत्रकार धम्मपाल डावरे सह आदी उपस्थित होते.