अंकोली येथे विज्ञान मंथनयात्रेमध्ये प्रश्न विचारत रहा , तुम्ही वैज्ञानिक बनाल : विज्ञान संवादक डॉ. अभय कोठारी

100

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.28जून):-विज्ञानग्रामातील विज्ञानसभेत तुम्ही जसे प्रश्न विचारत आहात तसेच प्रश्न सतत विचारत रहा,तुम्ही निश्चितच वैज्ञानिक बनाल असे प्रतिपादन अहमदाबाद येथील जगप्रसिद्ध विज्ञान संवादक डॉ.अभय कोठारी यांनी केले. ते अंकोली (ता.मोहोळ) येथील विज्ञानग्राममध्ये आयोजित मंथन विज्ञानजत्रा उभारणीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी निरंजन देशपांडे हे होते.

अरुण देशपांडे व सुमंगला देशपांडे यांनी चाळीस वर्षांच्या प्रयत्नाने विज्ञानग्रामची उभारणी केली आहे. या विज्ञानग्रामात कायमस्वरूपी मंथन विज्ञान जत्रा सुरु करण्यात येणार आहे. दहा एकरात दोन वर्षात त्याची उभारणी होऊन २ ऑक्टोबर २०२४ ला गांधी जयंतीला त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. योग्य प्रशिक्षण देऊन विज्ञानजत्रेच्या माध्यमातून दीड लाख विज्ञान संवादक तयार करून नवीन हरित स्वयंरोजगाराची निर्मिती होईल असे वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी सांगितले.

कार्यक्रमात बालवैज्ञानिक हर्षवर्धन इंगळे,सुमित शिंदे,शिवम भालेराव,भक्ती पुदे,प्रज्ञा कांबळे यांचा टूल बॉक्स देऊन सत्कार करण्यात आला.तसेच डॉ. अभय कोठारी यांनी नासाने प्रमाणित केलेले सौरचष्मे इनोव्हेटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांना भेट दिले. ऊर्जासाक्षरता,आगप्रतिबंधक झोपडी, फोटोट्रॉन बाग यांची प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली. पैगंबर तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महाराष्ट्र,गुजरात, तेलंगणा राज्यातील विज्ञान संवादक राघवेंद्र देशपांडे,निलेश भोगटे,संतोषकुमार,डॉ.भालचंद्र किणीकर, सीमा किणीकर, वैभव मोडक,अक्षय कुलकर्णी, उल्हास पेडामकर,रियाज तांबोळी, आदिंसह शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत सुतार, शिवाजी पवार,तानाजी पवार,जुनैद तांबोळी यांनी परिश्रम घेतले.

फोटो : अंकोली येथील विज्ञान ग्राम मध्ये मंथन विज्ञान जत्रा कार्यक्रमाचे उद्घाटन केल्या नंतर डॉ .अभय कोठारी,निरंजन देशपांडे, अरुण देशपांडे, सुमंगला देशपांडे व विद्यार्थी दिसत आहेत .