पावसाचे पाणी वाचवा!

33

भारतीय हवामान खात्याने या वर्षी समाधानकारक व सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण व मुंबईत चक्रीवादळाचाही पाऊस पडला आहे. सध्या पुण्या – मुंबईसह राज्यातील सर्वच प्रमुख शहरात पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. गेल्या काही वर्षात राज्यात अपुरा पाऊस पडल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः विदर्भ मराठवाड्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी दाही दिशा…. अशी लोकांची अवस्था झाली होती अशावेळी हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज दिलासाजनक आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याने पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.

पावसाच्या जास्तीजास्त पाण्याची बचत कशी होईल याचे नियोजन आतापासूनच करायला हवे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेच पाणी वाया जाते. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात तर पाण्याचा हा अपव्यय होय. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी जिरवणे व पाणी साठवणे या दोन तंत्राची खूप जरूरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा पाणी जिरवण्याचा फायदा असा की, भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यात घट होत नाही. जलव्यवस्थापन म्हणजे केवळ धरणे बांधून, पाईपलाईन शहरापर्यंत नेऊन घरोघरी पाणी पोहचवणे असा नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व पटवून देणे. पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हवे.

यासंदर्भात नागरिकांचे देखील प्रबोधन व्हायला हवे. नदी, विहीर, तलाव, बंधारे यात पावसाचे जास्तीतजास्त पाणी कसे साठेल याचे नियोजन सरकारी पातळीवर व्हायला हवे. नागरिकांनीही पावसाचे पाणी वाचवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करायला हवेत. नागरिकांनी आपल्या घरात, सोसायट्यात रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. शाळा, कॉलेज तसेच सर्व सरकारी कार्यालयात रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे पर्जन्य जलसंधारण प्रत्येक घरात, सोसायटीत, कार्यालयात झाले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. पाण्याचा थेंब न थेंब महत्वाचा आहे. कारण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे कारण ती काळाची गरज आहे.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५