काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; उद्धव ठाकरे भाजपच्या वाटेवर?

29

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.11जुलै);– शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यांनतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे अनेक आमदार बंद करून शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, आता पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठं संकट उभं राहिलं आहे.

या संकटाचं कारण आहे ते म्हणजे सेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांनीही पुकारलेलं बंड! होय, आता सेनेचे खासदार देखील बंद पुकारण्याचा तयारीत असून लवकरच ते शिंदे गटात सहभागी होतील आणि भाजपला पाठिंबा देतील अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. दरम्यान, खासदारांनी बंद करू नये यासाठी आता उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिवसेना पक्ष येत्या 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार असून शिवसेनेचे खासदार आणि आमदार NDA चे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात आज ‘मातोश्री’वरील बैठक संपल्यावर शिवसेनेकडून अधिकृत भूमिका जाहीर होणार आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. शिवसेनेच्याच खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केल्यामुळे शिवसेनेत बंड पुकारले जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.