ओबीसीची ध्येय उदिष्ट निश्चित नसल्यामुळे फुटबाल होतो?

32

आज ओबीसी कोणत्या पक्षात नाही?.आणि आपला ओबीसी समाज कुठे आहे? आपल्या ओबीसी समाजाची किती प्रगती झाली? आपल्या ओबीसी समाजात किती उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी लोक आहेत? किती क्लासवन अधिकारी आहेत ?.पत्रकार, संपादक, साहित्यिक, वकील, डॉक्टर,इंजिनियर, प्राध्यापक,शिक्षक,आमदार खासदार नगरसेवक किती आहेत? आणि कोण कोणाचे वैचारिक मानसिक गुलाम झाले आहेत. शिक्षण आणि नोकरीत सत्तावीस टक्के आरक्षण घेणारे कामगार,कर्मचारी अधिकारी कोणत्या विचारधारेच्या ट्रेड युनियनचे सभासद आहेत. का त्यांनी स्वताची कामगार संघटना युनियन बनविली नाही.मग ते ओबीसी समाजातील विध्यार्थी तरुणांना कशी नोकरी मिळवून देऊ शकतात?.त्यामुळे ओबीसी समाजामध्ये कामगार,मजूर,शेतकरी यांची स्थिती कशी काय आहे,याकडे आपले लक्ष आहे काय?.याची माहिती प्रत्येक संस्था,संघटना व पक्षात समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिक्षित लोकांनां असला पाहिजे. ते ओबीसीची ओबीसीची ध्येय उदिष्ट निश्चित नसल्यामुळे फुटबाल होतो?. हे कोणालाच दिसत नाही.

ओबीसी समाज आजही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागासलेले जीवन जगत आहे. भारत देशामध्ये बहुसंख्य समाज मागासलेला आहे. व अल्पसंख्य समाज पुढारलेला आहे. यामध्ये असंख्य जाती इतर मागासवर्गीयां मध्ये मोडतात त्यापैकी माळी,कोळी,शिंपी, नाभिक, परिट, गुरव, लोहार, कुंभार अशा अनेक जाती ओबीसी प्रवर्गात मोडतात. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये लोकांची संख्या सर्वाधिक आहे. भारतामध्ये ओबीसी समाज 3743 जातीत विभागलेला आहे. महाराष्ट्रात साडेतीनशे पेक्षा जास्त जाती या समाजामध्ये येतात.पण ते सर्व गर्वसे कहो हम म्हणतात आणि दुसऱ्यांची रोजगार हमी योजना राबवितात. स्वतःचे काय?.ओबीसीची उदिष्ट ध्येय निश्चित नसल्यामुळे फुटबाल होतो?

ओबीसी समाज हा मूळचा कुशल कारागीर निर्माणकर्ता समाज होता. ओबीसी हा बारा बलुतेदार अठरा अलुतेदारांचा समाज आहे. ओबीसी समाजाचे पूर्वी स्वतःचे असे परंपरागत व्यवसाय होते. त्यांचे व्यवसाय यांत्रिकीकरणामुळे,औद्योगिकरणामुळे हिराऊन घेतल्या गेले. ओबीसी अखंड समाज बेकार झाला. औद्योगिक क्रांतीमुळे जवळजवळ या समाजाची गरज संपली. या लोकांवर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे कुशल कारागीर असलेला हा समाज बेरोजगार झाला, त्यांचा असंघटित मजूर, कामगार झाला,तो मिळेल ते काम संघर्ष करून जीवन जगत आहे. त्यामुळेच ओबीसी समाजाची सर्व क्षेत्रात लक्षवेधी संख्या असूनही त्यांची रीतसर नोंद नाही. त्याला स्वताला ओबीसीची दशा आणि दिशा काय हेच माहिती नाही. रायगड कुलाबा जिल्ह्यातील आगरी कोळी भंडारी समाजाच्या शेतजमिनी सरकारने घेऊन उधोग धंद्यांना दिल्या त्या विरोधात दि.बा पाटील यांनी प्रचंड संघर्ष केला म्हणून त्या भागात साडेबारा टक्के जमीन व रोजगार गेलेल्या कुटुंबांना नुकसानभरपाई कायदानुसार मिळते.त्याच पद्धतीने ओबीसी समाजातील अनेक घटकांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्याची आवश्यकता होती. पण दि बा पाटील सारखे नेतृत्व कुंभार,लोहार,सुतार समाजाला मिळाले नाही. म्हणूनच त्यांच्या पोटावर लाथ मारून किलोस्कर, गरवारे,जिंदाल सारखे उच्चवर्णीय भांडवलदार पुढे आले. त्यामुळे एकेकाळचे कुशल कारागीर आज खरेदीच्या निमित्ताने आपण जेव्हा बाजारात जातो. तेव्हा मोठ्या दुकानांमध्ये आपलेच ओबीसी बांधव मारवाडी,जैन लोकांच्या हाताखाली काम करताना दिसतात. तेव्हा खूपच वाईट वाटतं. बारीकसारीक चुका झाल्यास मालक या लोकांवर ओरडतात. तेव्हा असं वाटतं की, या लोकांनी का असं जीवन पत्करले असेल. कारण ओबीसीची उदिष्ट ध्येय निश्चित नसल्यामुळे फुटबाल होतो?. हे त्यांना कळत नाही कि कळते पण वळत नाही.

महाराष्ट्रात नव्हे तर देशात बहुसंख्य असलेला ओबीसी समाज एकजूट नसल्यामुळेच लाचार,गुलाम म्हणून सर्व सहन करतो. म्हणून त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. ५२ टक्के असलेला ओबीसी राजकीय दृष्ट्या जागृत झाला तर राज्यात,केंद्रात तो सत्ताधारी होऊ शकतो. तो संघटित झाला तर इतर भटक्या विमुक्त जाती जमाती,आदिवासी, अल्पसंख्याक त्यांच्या सोबत मोठा भाऊ म्हणून जोडला जाऊ शकतो.ओबीसीची दशा आणि दिशा बदलू शकतो,ओबीसी समाजातील प्रत्येक घटक हा समाज बनलेला आहे. परंतु साठ टक्के असलेला ओबीसी समाज अजूनही समाज बनलेला नाही. समाज म्हणजे एक असा समूह जो की एकमेकांचे दुःख,हित समजू शकतो तो समाज !! जसा पूर्वी बारा बलुतेदार अलुतेदार एकजीव होता.तो सर्व दृष्टीने एक दुसऱ्याशी जिव्हाळ्याने सामाजिक बांधिलकी म्हणूनच जोडला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारखे दूरदृष्टी ठेवणारा नेता मिळाल्यामुळे महार समाज समाज बनला. तो राजकारणामध्ये मागासवर्गीयाचा एक दबावगट बनलेला आहे. आपल्या हक्क अधिकारासाठी मागासवर्गीय बांधव जागृत आहेत. एका मागासवर्गीयावर अन्याय झाल्यास दुसरा मागासवर्गीय अन्यायाला वाचा फोडतो. त्यासाठी तो किती ही मतभेद असले तरी संघर्ष करण्यासाठी एकत्र येतो. परंतु एका ओबीसी शेतकऱ्याने आत्महत्या केली तर दुसऱ्या भागातील ओबीसी शेतकरी त्याविरुद्ध आवाज उठवत नाही. ही आपली शोकांतिका आहे. जर आपण ओबीसी समाजाने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार स्वीकारला असता तर ओबीसी समाज कधीच समाज बनलेला असता. आपण किती नतद्रष्ट आहोत ज्या समाजात महात्मा जोतीराव फुलेंचा जन्म झाला होता. त्याच लोकांनी महात्मा फुलेंना बहिष्कृत केले होते. आजही आपण त्यांना पूर्णपणे स्वीकारले नाही. कारण त्यांचा विचार स्वीकारला असता तर ओबीसीची अशी दशा झाली नसती.तर तो देशाला दिशा दाखवणाऱ्या चळवळीचे नेतृत्व करणारा असता.मंडल आयोगाने अनेक राजकीय नेते दिले आहेत. त्यांना सर्वच पक्षानी जवळ केले हे विसरता येणार नाही.म्हणूनच ओबीसीची उदिष्ट ध्येय निश्चित नसल्यामुळे फुटबाल होतो. समाजात जागृती करतांना,स्वराज्य,शिक्षण,आरक्षण,न्याय, अधिकार मिळविण्यासाठी कोणता आदर्श डोळ्यासमोर आणि डोक्यात असला पाहिजे.

आजही आपला ओबीसी समाज महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो घरात लावतो. दुसरीकडे गणपती,साईबाबा,गजानन महाराज आणि तिसरीकडे सत्यनारायण घालतो. एक प्रकारे आपण ओबीसी त्यांच्या विचारांची माती करत आहोत. आजही ओबीसी समाज जुन्या परंपरा रितीरिवाज,कर्मकांड,खुळचट कल्पना यांचे वाहक आहेत. महात्मा फुलेनी ज्याप्रमाणे धर्मव्यवस्था नाकारली व जातीव्यवस्था ठोकरली त्या प्रमाणे आपण महात्मा फुले यांचा विचार संपूर्णपणे स्वीकारण्याची आवश्यकता आहे. एवढा मोठा महात्मा आपल्या जातीत जन्माला याचा तरी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.असं आता का म्हणावं लागतंय !

महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतात अस एकही दाम्पत्य नाही ज्यानी एकमेकांच्या सोबत राहून समाजकार्य,समाजक्रांती,प्रबोधन केले. त्यांचा आदर्श ओबीसी तरुणांना नाही कारण त्यांच्या आईवडीलानी तो घेतला नाही, तर तरुण पिढी कशी घेईल?. महात्मा फुलेंनी गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. शेतकऱ्याचा आसूड लिहून शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.शेतकऱ्यांचा मोर्चा काढला,नाव्ह्याचा संप घडविला. महात्मा फुले यांचा विचार स्विकारल्या शिवाय एकमय राष्ट्र निर्माण होणार नाही.ओबीसी समाजाला सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,शोषणाविरुद्ध जागृत चळवळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्याचा मागोवा घेऊन एकजुटीने लढण्याची गरज आहे. समुहभान निर्माण करून सामाजिक,शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज जागृत झाला पाहिजे. आपल्या अस्मितेसाठी ओबीसी ने लढा उभारला पाहिजे. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, ओबीसी जनगणनेच्या तुलनेत बजेटची तरतूद करणे,ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अल्प आहे, ओबीसी समाजाचे लोकसंख्येच्या मानाने शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, खाजगीकरणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ओबीसीने खाजगी आरक्षणाची मागणी करावी, जागतिकीकरणामुळे पारंपारिक व्यवसाय नष्ट होत आहेत, त्यासाठी ओबीसींना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे.या गोष्टीसाठी ओबीसी समाजाने सरकारकडून निधी उपलब्ध करून घेणे. या सर्व मागण्या म्हणजे ओबीसी समाजाचा हक्क, अधिकार आहे.जो संविधानिक आहे जो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमान्वये दिलेला आहे. सर्व राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार ओबीसीनां वापरतात.प्रथम ते थांबले पाहिजे. तरच ओबीसी समाजाचा फुटबाल होणार नाही.
ग्रामीण तसेच शहरी भागातील ओबीसी महिलांची फरपट थांबली पाहिजे. त्यांचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक स्तर उंचावला पाहिजे.

भारतीय संविधानाने दिलेल्या हक्काविषयी महिलांनीही जागरूक व्हावे. आर्थिक स्वावलंबन साधावे.ओबीसी समाजाची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शिक्षण,आरोग्य,रोजगार,यात पुरेश्या योजना राबवण्यात अडथळा येतो असे सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी ओबीसी जनगणना करण्यात यावी. तर ओबीसी चे सर्व प्रश्न सुटतील. प्राण्यांची गुराढोरांची गिनती होते, आम्ही तर माणस आहोत.आमची गिनती झाली पाहिजे.ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व मिळावे व शिक्षण, आरोग्य, रोजगार मिळावा यासाठी सर्व ओबीसी समाजाने जागृत होणे व त्यासाठी योजना आखणे गरजेचे आहे. ओबीसी जनगणना झाली पाहिजे! यासाठी आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मागितल्याने मिळत नाही संघर्षाला पर्याय नाही. या मूलमंत्राचा आपण अंगीकार करून वाटचाल करावी. असे माझे सर्व ओबीसी बंधू-भगिनींना आवाहन आहे.ओबीसीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी वैचारिक आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघावर लक्ष केंद्रित करा.हेच काम करणे आवश्यक आहे, तुमचे उदिष्ट ध्येय निश्चित असतील तरच यशस्वी वाटचाल होऊ शकते.तरच ओबीसीचा फुटबाल होणार नाही.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९