किती करावी दगदग…..!

36

जीवनात संघर्ष असतो म्हणे; संघर्षाशिवाय तरणोपाय नाहीच म्हणे; माणसाने खूप कष्ट करावे म्हणे; आपण तर मोठे व्हावेच, सोबत आपली लेकरंही घडवावी म्हणे; असे बरेच काही! यासाठीच माणसाची दगदग चालू आहे. इतकी की मरेपर्यंत ती संपायचे नाव घेत नाही. आपली आशा संपत नाही, अन् ही आशा दगदग करणे सोडू देत नाही. आशा स्वप्न पहायला लावते, की स्वप्नेच आशा निर्माण करतात? काहीही असो, त्यासाठी कष्ट तर उपसावी लागतातच; कष्ट म्हटले की दगदग ही क्षणोक्षणी पावलोपावली आलीच. एरवी आमचे वाडवडील म्हणायचे, एखादेवेळी सुखासुखी न झेपावणारे काम हाती घेतले असेल किंवा चार-दोन वेळेस अतिरिक्त काम झाले असेल तेव्हा ”दगदग करून घेऊ नको बेटा, तुला सहन होत नाही.” तेव्हा वाटायचे, आपला थोडा घाम गळाला की काय, घरचे किती विचारतात आपल्याला. किती प्रेम करणारी आपली माणसे आहेत; आपली काळजी घेणारी माणसे आहेत. पण, एक दिवस या आपल्या माणसात आपण स्वतःच हरवून जाईल असे वाटले नव्हते.दगदग म्हणजे काय असते? नवीन काहीच नाही. ‘काबाडकष्ट’ ज्याला आपण म्हणतो नेमके तेच. एवढेच की काबाडकष्ट इथे नकोसे वाटतात. ज्यावेळेस हे काबाडकष्ट सहन होत नाहीत तेव्हा त्याला ‘दगदग’ हे नाव दिले जाते. कारण ते सहनक्षमतेच्या आत असते तर ती दगदग नसती. उलट लोकांनी कष्टालापण एन्जॉय केले असते. असो!

ज्यावेळेस आपण लहान असतो किंवा तारुण्याच्या उंबरठ्यावर किंवा ऐन तारुण्यात असतो, तेव्हा कोणावर तरी अवलंबून असतो. अशावेळेस थोडेसे काम पण खूप जास्त वाटून ते दगदगच वाटायला लागते. पण, आपलेच आईवडील असेच आपल्या पोटासाठी झटताना कधी दगदग वाटत नाही. आपल्याला ते त्यांचे आपल्याविषयीचे कर्तव्ये वाटायला लागते. जेव्हा आपण पालक होतो, तेव्हा जबाबदारी कळून काम हेच सर्वस्व वाटायला लागते. या सर्वस्वाच्या नादात सतत कष्ट उपसताना घाम गाळून घसा कोरडा अन् सगळे शरीर अधाशी होते; भुकेला नाही तर कामाला.

मला इथे काय म्हणायचे, व लेखाचे शीर्षक काय दर्शवते? हा मुख्य मुद्दा समजून घ्या. जीवन जगायचे म्हणजे काम करावेच लागते. काम करण्याचा पण मूळ उद्देश हा पार आदिममानव काळ असो की आजचा आधुनिक जगताचा काळ, ‘पोटाची भूक भागवणे’ हाच होता, असायला पाहिजे.पण, पोटासोबत मनालाही भूक लागते हे जेव्हा कळले तेव्हा त्याची न संपणारी भूक संपवायला आपण स्वतःच संपायला लागलो. पोटासाठी कष्टने हे दगदग होऊच शकत नाही, अन् ते दगदग होत असेल तर मेलेले बरे, इतके निष्क्रिय आपण होऊन जावू. पण, मनाला खुश करण्याच्या नादात स्वतःला इतके ऍडजस्ट करायला लागलो की उरलेले शरीर हे सर्व अवयवांनी बनलेले नसून जणू ऍडजस्टमेंटची वायरिंगची गुंतागुंत असेल. ही गुंतागुंत सुटत नाही, सुटायला लागली की नवीन कधी होते, हे सुद्धा कळत नाही. इतका आपण कामाचा व्याप करून ठेवला.

घरी मागे एक इन्व्हर्टर आणले होते. दुकानदाराने सांगितले की त्या इन्व्हर्टरची किती उपकरणे, किती वॅटमध्ये सुरू ठेवण्याची क्षमता आहे. ज्या दिवशी या क्षमतेच्या वर उपकरणे आपण त्या इन्व्हर्टरला जोडू त्या दिवशी तो बंद पडेल. जितके दिवस लिमिटमध्ये काम होते, इन्व्हर्टर मस्त चालले पण ज्या दिवशी ओव्हरलिमिट झाले, त्या दिवशी ते खरेच बंद पडले. अशीच क्षमता मशीन सोबत प्रत्येक सजीवाची आहे. त्याला माणूस म्हणून आपण अपवाद होण्याचा प्रयत्न करतोय. निसर्ग जेव्हा काही गोष्टी एखाद्या साच्यात बसवते तेव्हा आपण त्याला कितीही प्रयत्न करून बदलू शकत नाही. पण, या मनाचे काय करावे? ते बदलायला व आपल्याला त्याच्याविरुद्ध बदलू द्यायला आपण तयारच नाही. मग स्वतः मात्र ऍडजस्टमेंट करता करता सम्पलो तरी चालेल, पण मनाला संपू द्यायचे नाही.

ही दगदग सहण्याची वृत्ती अशीच तयार होत नाही. त्याला खूप वर्षांची आपली हाव असते. आपली ही हाव इतरांची हाव पाहूनच तयार झालेली असते. हाव म्हणजे हव्यास. लोकांची हाव बऱ्याच वेळा सहज पूर्ण झालेली असते. काहीतर इतके समजूतदार असतात की हाव कधी पूर्ण होत नाही म्हणून गपगुमान बसतात. हे अशी माणसे दुर्मिळ आहेत.आपण त्यानांचं अपवादात्मक परिस्थितीत अपवाद म्हणू. पण, आपण सो कॉल्ड ओरिजिनल माणूस, जो आधुनिक म्हणून इतका बदलला की आधुनिकतेचा अविष्कार मशीन बनवता बनवता कधी मशीन झाला, हे त्यालाच कळले नाही. तो मशीनही अर्धवटच झाला. कारण पूर्ण मशीन ही अर्धवट कधीच नसते, आणि तिच्या कामात व कामाच्या हिशोबात चोख असते. म्हणजे हा ना इकडचा, ना तिकडचा राहिला.

दगदग करून घ्यायची जर तयारीच असेल तर त्याला दगदग म्हणणे बंद करावे लागेल. कारण दगदग सहन होत आहे, म्हणजे ती फारच कुचकामी झाली आहे. आपल्याला नाजूक करता करता स्वतःच खल्लास झाली आहे. दगदगीला एक नाव देता येईल, ‘हव्यास’, नको तो हव्यास, झेपावत नाही ते हव्यास! पोटाची भूक ही दगदग होऊ शकत नाही, आणि ते भागवून खूप जास्त ओझे अंगावर घेणे म्हणजे, ‘दगदग’! आणि दगदग जर सहन होत असेल तर तो हव्यासच.भारतीय लोकांची जगण्याची एक रीत आहे. ती रीत म्हणजे इथली माणसे वर्तमानात कोणीच जगत नाहीत. सगळ्यांना येणाऱ्या भविष्याचीच चिंता. भविष्याच्या चिंतेत हा वर्तमान खराब होतो, तो जेव्हा भूत होतो, तेव्हा आठवण ही खराबच असते. येणारे भविष्य जेव्हा वर्तमान होते, तेव्हा पुढच्या वर्तमानासाठी तो भविष्यकाळही खराबच होतो. म्हणजे तिन्ही काळी हाल, आणि हे हाल घडविणारे आपणही सदैव बेहाल!

आपण जे म्हणतो न, ही पिढी, ती पिढी; आमची पिढी, तुमची पिढी; येणाऱ्या पिढीसाठी कष्टतोय म्हणून आपण नेहमीच बोलून दाखवतो, बऱ्याच वेळा ऐकतो पण! इथे नेमके चुकते काय? तर प्रत्येक जण येणाऱ्या पिढीसाठी कमवायला बसला. येणारी पिढी त्यापुढील पिढीसाठी. मग जगायली कोणती पिढी? हे आकलनकक्षेच्या पलीकडे जाऊन बसले. मला तर कधी कधी वाटते, येणाऱ्या पिढीची मजाच आहे. ती मजा खरंच कोण्यातरी पिढीने लुटावी. पूर्वजांना कदाचित त्यामुळेच शांती मिळाली तर मिळाली. नाहीतर ते अशांतच राहून, गप्प असणाऱ्या बाजारात आतूनच ओरडून वणवा पेटवून द्यायचे.
किती ती दगदग! मुलाचे शिक्षण आहे, म्हणून चाललो आम्ही जिल्ह्यावर राहायला. मुलगा नेमका चड्डीत इनर वेअर घालायला शिकला, अन् बाप नेमकाच कोवळ्या मिशीतून काळ्याभोर दाढीत आला. तो 100 किमीची ये-जा ची आदळआपट रोज करायला तयार आहे. फक्त पोरगं शिकायला पाहिजे. मग, हा काळयातून अकाली पांढरा झाला तरी चालेल. पांढऱ्या रस्स्यावरून अळणीवर आला तरी चालेल. फक्त बाबड्या शिकून मोठा व्हावं. इथे बाप सगळेच दगदग करून घ्यायला तयार, पण पोरगा दगदगीला दगदग म्हणू लागला की बापाचे दगदगीतच मरण आहे.

एक चार चाकी कार घेतली. ती घेण्यासाठी कर्ज व कर्जाचे हफ्ते डोंगर म्हणून डोक्यावर उभारून ठेवले. त्यासाठी वेगळी दगदग होती. दगदग जीवन आटोपते जगण्याची. आटोपते म्हणजे तडजोड करून. तडजोड असते खुशीची; तुपावरून डालड्यावर येण्याची; हिरव्या पालेभाजीला दाळेची, दाताला चवीची, भुकेला उपासाची, दसऱ्याला दिवाळीची, खर्चाला वाट ऑफरची, ऑफरमधून फ्री मिळवण्याची. अशी खूप सारी दगदग असते. चैनीच्या वस्तू चैनीत राहू देत नसतील, तर चैन,चैन नसून दैना आहे. चार चाकी गाडी घेऊन चार महिने झाले, पण चारही चाके जाग्यावरच आहेत. चार चाकी मजल्याला दुमजला करेल म्हणून सगळी खटपट होती. पण मजल्याचा इमला जमला नाही, अन् न जमणारी गोष्ट जबरदस्तीने जमत नाही.आयुष्य चांगले जगण्यासाठी दगदग असेल तर आधीचे जगणे, जगणे होते; जे खरेखुरे होते. पण अधिकच्या नादात वजा होणे आपण पसंत केले आणि वजा, वजामध्येच सम्पले.दगदग’ कधीच संपत नाही, सम्पते ते आयुष्य! राहते ती विरझन म्हणून आशा, जी दगदगीला संपू देत नाही.आयुष्य एकदाच आहे. पुनर्जन्म घेतलेला कोणी अजून जन्मला नाही. त्याला आपणही अपवाद नाही. म्हणून जसे जगता येईल तसे जगा. खुशी जी लवकर लक्षात येते, आनंद त्यात माना. अधिकच्या खुशीत, आहे ते आयुष्य बर्बाद करू नका. आयुष्याचा अर्थ शोधत बसू नका. जमलं तर उरलेले आयुष्य समाधानाने जगून पहा. सुखाने शेवटाकडे जाल.

कशासाठी हे हालअपेष्टा
अन् रोजचीच दगदग
मरायला आले तरी
सुटत नाही धडपड
श्वास रोखून एकदा
जगलो का म्हणून
विचार एकदाच करा.
वाटलेच जर मनाला
कमी पडलोय मी
त्या दिवशी उडायचे
सुरू करा…!!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(मो:-8806721206)लेखक/ कवी/ व्याख्याते,नांदेड