एकनाथजी शिंदे, तुमच्या राज्यातले पोलिस पार्श्वभागात सुर्यप्रकाश तेल सोडतात !

33

🔹पोलिसांच्या वर्दीला कलंकीत करणारा प्रकार !

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

पोलिस छातीची ढाल करून लोकांचे रक्षण करतात. जीवावर उदार होवून कर्तव्य निभावतात. पोलिसांच्या कर्तव्य भावनेबद्दल नेहमीच आम्हाला नितांत आदर राहिला आहे. कोराना काळातले त्यांचे काम सलाम करण्यासारखे आहे. कोरोना काळातल्या कामासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता नेहमीच त्यांच्या ऋणात राहील. अनेक वेळा पोलिस आपल्या कर्तृत्वाने पोलिस खात्याची व मानवतेची मान उंचावतात पण अनेक प्रसंगात काही पोलिस अतिशय क्रुर व निष्ठूर वागतात. शरमेने मान खाली जाईल, लाज वाटेल असे वागतात, मानवतेला काळिमा फासणारे वर्तन करतात. कायदा कोलून, फाट्यावर मारून कौर्याचे दर्शन घडवतात. त्यांच्या या कौर्याचा बळी नेहमीच सर्व सामान्य माणूस होत असतो. ज्याला कुणी विचारणारे नाही, ज्याच्यासाठी कुणी आवाज उठवणारे नाही अशा लोकांच्यावर पोलिस अत्याचार करतात. आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी स्वत:च कायदा पायदळी तुडवत गावगुंडासारखे वर्तन केले आहे. अनेक ठिकाणी हे पोलिस आहेत की सरकारी गुंड ? असा प्रश्न पडावा असे वर्तन पोलिस करतात. अशा बेजबाबदार पोलिसांच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा पोलिसांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. तसेच कर्तव्यदक्ष असणा-या चांगल्या पोलिसांना यामुळे बदनाम व्हावे लागते, पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होते.

अशाच पध्दतीने पोलिसांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचे काम बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या सोनपेठ येथे झाले आहे. एका पारध्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप होतो आहे. लॉकअपमध्ये पोलिसांनी पारध्याला गंभीर मारहाण केली, शॉक दिले. त्यातच सदर पारध्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू नंतर त्याचे प्रेत शिरसाळे येथील एका शेतात फेकून दिल्याचा आरोप पारध्याचे नातेवाईक करत आहेत. हे गंभीर आहेच पण यावर कडी करत पोलिसांनी केलेले कृत्य भयंकर आहे. मृत देविदास काळे या पारध्याच्या अल्पवयीन पुतण्यालाही लॉकअपमध्ये टाकून मारले आहे. त्याच्याशी अत्यंत अमानूष वर्तन केले आहे. त्या अल्पवयीन मुलाच्या पार्श्वभागात सुर्यप्रकाश तेल ओतून त्याला मारले आहे. तसेच पारध्याच्या कुटूंबातील महिलांनाही अटक करून तीन दिवस लॉकअप ठेवले होते. चोविस तासात कोर्टात हजर करण्याचा नियम असताना नियमच फाट्यावर मारत त्यांना तीन दिवस लॉकअपमध्ये ठेवले होते. शेवटी त्यांना कोर्टापुढे हजर न करताच सोडून दिले. विशेष म्हणजे सोनपेठ पोलिसांनी देविदास काळेला अटक केली, कोर्टापुढे हजर केले आणि तीन दिवसांनी त्याच देविदास काळेचा मृतदेह एका ऊसाच्या शेतात सापडतो. पोलिसांना त्याची ओळख पटत नाही, तो बेवारस म्हणून दाखवला जातो. मयत देविदास काळेचा पुतण्या सांगतो की त्याच्या चुलत्याला अटक केली तेव्हा अंगावर वेगळा शर्ट होता आणि प्रेतावर एका पोलिसाचा शर्ट होता. काळेच्या पत्नीला न सांगताच त्याच्या प्रेताचे शवविच्छेदन केले. अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी दुस-यांदा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिल्यावर त्यातही दिरंगाई केली. मयत देविदास काळे हा शेतात शॉक लागून मेला असे पोलिस सांगत आहेत मग सदर शेताच्या मालकावर त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही ? एकूण सगळा प्रकार संशयास्पद आहे. पोलिस सांगतात तो घटनाक्रम वेगळा आहे आणि मृत काळेचे नातेवाईक सांगतायत ते वेगळे आहे. मयत काळेच्या पत्नी सुनंदाबाईंनी आदल्या रात्रीचा सांगितलेला घटनाक्रम पोलिसांची लबाडी समोर आणणारा आहे.

एकनाथरावांच्या राज्यात पोलिस पार्श्वभागात तेल टाकून मारत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात कुणावर गुन्हा दाखल झालेला नाही. शिंदे सध्या सिंघम स्टाईलने काम करतायत. त्यांच्या धडाकेबाज निर्णयाचा सर्वत्र बोलबाला चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यायला हवे. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. अल्पवयीन मुलाच्या पार्श्वभागात सूर्यप्रकाश तेल सोडणा-या, बेदम मारहाण करत एकाचा जीव घेणा-या व महिलांना बेकायदेशीरपणे लॉकअपमध्ये ठेवून घेणा-या पोलिसांना कुणी काहीही सवाल करत नाही हे गंभीर आहे. ज्यांना हे अमानुष वाटत नाही, भयंकर वाटत नाही त्यांनी स्वत:च्या पार्श्वभागात सुर्यप्रकाश तेलाचे दोन थेंब सोडून पहावेत.

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील बंसारोळा येथील पारध्याच्या संशयीत मृत्यू प्रकरणाचा तपास करायला हवा. यातल्या दोषींवर कडक कारवाई करायला हवी. सांगलीच्या अनिकेथ कोथळे प्रकरणाला साजेल असाच हा प्रकार आहे. सांगलीतही चार वर्षापुर्वी अनिकेत कोथळेला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. अनिकेत कोथळेचे प्रेत जंगलात नेवून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. असेच प्रकरण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या सोनपेठ येथे घडले आहे. एका पारध्याला मारून त्याचे प्रेत पोलिसांनीच शेतात फेकल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. हा सगळा प्रकार जयभीम चित्रपटातल्या कथेसारखा आहे. सदर चित्रपटात पोलिसांनी बेदम मारहाण करत लोकांचे जीव घेतले व त्यांच्या प्रेताची व्हीलेवाट लावली. त्यानंतर आपल्या नालायकीचे पुरावे नष्ट केले असाच प्रकार बीड जिल्ह्यात घडल्याचा आरोप अँड विलास लोखंडे यांनी केला आहे. या एकूण प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश द्यावेत.