आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते २५० अतिवृष्टी ग्रस्त व पूर पीडित परिवारांना धनादेश वाटप !

45

🔹वरुड शहरातील ९६९ नुकसानग्रस्त परिवारांना प्रत्येकी कुटुंब ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान !

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरुड(दि.13ऑगस्ट):-नैसर्गिक आपत्ती आणि पुरात होणारी हानी ही अनपेक्षित आणि तेवढीच दुःखद असते. अतिवृष्टीमुळे झालेली हानी कितीही मदत केली तरी ती भरुन काढता येणारी नाही. आमदार व शासनाचा एक घटक या नात्याने मी वरुड मोर्शी तालुक्यातील सर्व अतिवृष्टीग्रस्त व पूर पीडित लोकांच्या सोबत असून शासन पातळीवर जे काही शक्य आहे ती सारी मदत करण्यास आम्ही तत्पर असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले.

वरुड मोर्शी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असून ७ व ८ ऑगस्टला वरुड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या एकही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांचे पंचनामे करून तात्काळ शासनाकडे पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले.

आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड शहरात दिनांक ७ व ८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अतिवृष्टी ग्रस्त व पूर पीडित परिवाराची भेट घेवुन त्यांना तात्काळ मदत म्हणून ९६९ नुकसानग्रस्त परिवारांना प्रत्येकी कुटुंब ५ हजार रुपये “सानुग्रह अनुदान” देण्यात आले आहे त्यापैकी २५० परिवारांना धनादेश आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले असून उर्वरित परिवाराच्या खात्यात सानुग्रह अनुदान वर्ग करण्यात आले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.

आमदार देवेंद्र भुयार यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्षात पाहणी केली आणि शासकीय अधिकारी तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक यांच्यासह नुकसानग्रस्त परिवारांची भेट घेवुन त्यांना वैद्यकीय सेवा, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तसेच जीवनावश्यक बाबीबाबत मदत आणि संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया —
अतिवृष्टीमुळे वरुड मोर्शी तालुक्यात हजारो घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय वरुड मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. नुकसानीचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ संपूर्ण पंचनामे करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना तात्काळ मदत देण्याची मागणी शासनाकडे केली आहे — आमदार देवेंद्र भुयार .