आठ पोलिसांची हत्या करणा-या विकास दुबेचे घर जमिनदोस्त

49

लखनऊ (वृत्तसंस्था) :
कुख्यात गुंड आणि आठ पोलिसांची हत्या करणा-या विकास दुबे याच्याविरोधात उत्तर प्रदेश सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने जेसीबीच्या सहाय्याने शनिवारी विकास दुबे याचे घर पाडले आहे. विकास दुबेचे घर पाडण्यासाठी अंमलबजावणी पथक आज जेसीबी मशीनसह कानपूरच्या बिकरू गावी पोहोचले. अंमलबजावणी पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा या कारवाई दरम्यान उपस्थित आहेत.

विकास दुबेने आपले घर बेकायदेशीररित्या बांधल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, प्रशासन त्याच्या सर्व मालमत्तेची चौकशी करणार आहे. त्याची सर्व बँक खातीही जप्त केली जाणार आहेत. तसेच, विकास दुबेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके विविध भागात छापा टाकत आहेत. या सर्व क्षेत्रात विकास दुबेचे कुटुंब आहे.

याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतले आहे. जेणेकरून विकास दुबेला लवकरात लवकर पकडता येईल. विकास दुबे नेपाळमध्ये पळून जाण्याचीही शक्यता आहे, म्हणून लखीमपूर खेरी जिल्ह्यातील पोलीसही सतर्क आहेत.