वाघनगरची ग्रामसभा.साठा उत्तराची कहाणी!

वाघनगर हे जळगाव तालुक्यातील सावखेडा बु.येथील विस्तारीत वस्ती.त्याला अजून सावखेडा शिवार म्हणतात.म्हणजे शेतातील झोपडपट्टी.घरे सिमेंटची पण विचार गुलामासारखे. जळगाव शहरापासून फक्त २० फूट अंतरावर.म्हणजे एक पतली गल्ली.तरीही ते अद्याप सावखेडा बु.ग्रामपंचायतीला जोडलेले आहे. ग्रामपंचायत मुख्यालय सावखेडा बु.हे वाघनगरपासून स्त्यावरून सहा किमी अंतरावर व सरळ शेतातून,नाल्यातून चार किमी अंतरावर आहे.तरीही सावखेडा बु ग्रामपंचायत मधे लोंबकळते आहे.का?वाघनगर ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे.सर्वाधिक नवीन एनए, नवीन प्लॉट, नवीन घरे वाघनगरमधे बांधली जातात.त्याचे बांधकाम मंजुरी,कम्पलीशन चा खूप मोठा अनधिकृत पैसा सावखेडा बु ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाला मिळतो.शिवाय गिरणाची वैध,अवैध रेती वाहतूक वाघनगर मार्गे वाहतूक केली जाते.त्याचेही रीतसर हप्ते रस्त्यावर मिळतात.म्हणून वाघनगर स्वतंत्र ग्रामपंचायत होऊ नये किंवा जळगाव मनपात ही संलग्न होऊ नये म्हणून अधिकृत स्तरावर प्रयत्न होत आहेत.नागरिकांनी मागणी केली तर हो हो म्हणून, तुम्ही सहकार्य करा.

आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायत करू.ज्यांनी ग्रामपंचायत पाहिली नाही, ज्यांनी पंचायत समिती पाहिली नाही, ज्यांनी झेडपी पाहिली नाही ते आधिकाऱ्यांना काय मदत करतील?कशी मदत करतील? आम्ही अजून पांचशे रुपयात मत विकणारी माणसे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची जल स्वराज पाणीपुरवठा योजना सुद्धा कोणीतरी रेती माफिया व बिल्डर करून देत असतो,असा समज असणारी माणसे.हे काय मदत करतील? पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील रात्री ९.३०वाजता वाघनगरला आले,त्यांची आरती ओवाळणारी बायामाणसे,भाऊ आमचा कचरा साफ करून द्या,अशी मागणी करणारी साधीभोळी माणसे कशी मदत करतील?आपल्या अंगणात फुकटची दगड माती टाकून अडथढा करणारी विकृत माणसे, दुसऱ्याच्या गटारीचे पाणी माझ्या अंगणातून जाऊ देणार नाही असे दारू पिऊन धिंगाणा घालणारी माणसे ,कशी मदत करतील?आज ३०तारखेला दोन वर्षांनंतर ग्रामसभा घेतली.मर्जीतील लोकांना फोन करून बोलवले.कानाखालचे लोक बोलवून आणले.झाली सुरू ग्रामसभा.लोकांनी पाणी,कचरा,गटार बाबत प्रश्न विचारले तर लोकांमधूनच मधेच उत्तरे देणारी माणसे सरपंच व ग्रामसेवकाचा ताण परस्पर कमी करीत होते.कदाचित तसे आधीच ठरवले असावे.काही तर निव्वळ गोंधळ घालण्यासाठी पढवून आणले असावेत.तरीही झाली ग्रामसभा.झाली हेच मोठे भाग्य!हेच कौतुक !

वाघनगर मधील उघड गटारींसाठी चार लाख समाजकल्याण खात्याकडून मिळाले.पैकी ग्रामपंचायत दोन सदस्यांनी आपल्या गल्लीत गटार बांधून घेतली.बाकीचे दोन लाख दहा हजार रूपये इस्टीमेट नुसार पुर्ण काम न करता परत केले.कारण पुढील गल्लीत आपले विरोधक राहातात.त्यांनी जरी निधी आणला तरी आपण आपल्यापुरता वापरून घेऊ.ग्रामीण भागात यालाच राजकारण म्हणतात.बोगण्यात हात घालून बोटी काढणे.स्वताचे जेवण झाले कि बोगण पालथे घालणे.यालाच जीत म्हणतात.यालाच बहादुरी म्हणतात.यालाच स्कील म्हणतात. ग्रामीण भागातून आलेली माणसे,चाकू पिस्तूल चालवणारी माणसे, नोकरी लागली म्हणून येथे आलेली माणसे,टेरीकॉट घातली,रोज छटाक खोबरेल डोक्यावर टाकले तरी आम्ही अजून लोकशाही विचारधारा स्विकारत नाहीत.डोक्यावरचे तेल मेंदूत उतरत नाही.म्हणून मताची किंमत पांचशे वर जात नाही.अधूनमधून मंडप टाकून रस्सा वाढला कि पावशेर टाकून जेवणारी माणसे.वाघनगरची लोकसंख्या घरोघरी जाऊन मोजता आली नाही.एकीकडून मोजली तर आठ हजार येते,दुसरीकडून मोजली तर दहा हजार येते.जेवणाचा मंडप टाकला कि उलटूपालटून जेवणार्थी येतात.तेंव्हा मोजली तर बारा हजार भरते.
काही लोकांनी समस्या मांडल्या ,ज्या सरपंच व ग्रामसेवकांनी निर्माण केलेल्या होत्या.गटार अर्धवट सोडून निधी परत करणे.अर्धा किमी सिमेंटचा रस्ता बनवला तर एक फर्लांग पॅच सोडून देणे.किती हा मुर्खपणा.म्हणे हा पॅच आम्ही भरला तर महानगरपालिका परवानगी देणार नाही.ही अक्कल,नक्कल कोठून आणली असेल? काम अर्धवट सोडून निधी परत केल्याचे कारण विचारले तर उत्तर मिळाले कि, नवीन सत्तर लाखाचा निधी मिळणार होता, म्हणून परत केला.जसे मुलगा होण्यासाठी मुलगी बळी दिली.आणि मुलगा ही झाला नाही. हा काय मुर्खपणा झाला?ऐकणाऱ्यांना यातील नमक आणि गमक कळलेच नाही.

अनेकांनी पाणी प्रश्न मांडला.पाणी आहे पण वेळेवर सोडत नाहीत.उत्तर मिळाले कि,वीज नसली,पाईट फुटला ही कारणे सांगितली.जन्माआधीच मृत्यूचे भय दाखवले.बारशालाच रडारड.रडबोंबल. आता ग्रामपंचायत पाणीपट्टी घेते.तर या पैशातून नियमित पाणी सोडणारा वालमन ठेवण्याची सुचना मान्य केली.पण बिल्डरच्या बांधकाम वर पाणी मारणारा माणूस नियुक्त करून त्याचा फोन नंबर ठराविक लोकांकडे असल्याचे अतिउत्साही लोकांनी स्वाभिमानाने सांगितले.काहींनी फुकटची माती दगड मिळाली म्हणून अंगणात टाकून रस्ता ओबडधोबड केला.त्यावर चालतांना ट्रैकींग करावे लागते.गाडी चालवतांना बेवडासारखे वाटते.एकदा जेसीबी लावून अशा हावरट आणि समाजकंटकांच्या अंगणातून रस्ता जसा आधी सरळ होता तसे करण्याची सुचना मान्य केली.ग्रामसेवक व सरपंचाचे कल्याण होईल.ते वाघनगरमधील व जळगाव मधील खड्यात पडणार नाहीत,अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

जळगाव शहरात आधी मनमानी स्पीड ब्रेकर टाकले होते.प्रत्येक घरापुढे स्पीड ब्रेकर.म्हणे आमची मुले रस्त्यावर येतात.गाडीवाले चेंगरून ठार मारतील.म्हणून स्पीड ब्रेकर टाकलेत.कलेक्टर च्या आदेशानुसार मनपाच्या बावळट आयुक्ताने ते काढून टाकले.आता तिच फॅशन हरिविठ्ठलनगर आणि वाघनगर मधे आली आहे.कारण ज्याच्या दारापुढे स्पीड ब्रेकर तो काहीतरी बडी हस्ती वाटते.रीक्षावाले,लॉरीवाले,फेरीवाले,कामवाले दचकून वचकून असतात.पण त्रास इतरांना होतो,त्याचे काय? ते काढून टाकण्याची सुचना केली.किंवा त्याचा स्लोप नियमानुसार पसरट करावा.म्हणे नाही, आमच्या अंगणातून जाणाऱ्याला “जोरका झटका ” लागला पाहिजे आणि दोन नॉनव्हेज शिव्या हासडल्या पाहिजे.अशा गदारोळात ग्रामसभा संपली.शेवटी सरपंच म्हणाले,आपले मंत्री आताच उद्धव ठाकरेंशी बेईमानी करुन शिंदेगटाकडे गेले.तर त्यांचाही एकदा सत्कार वाघनगर मधे करून टाकू.आपल्या स्टाईलने करू म्हणताच सर्वच लोकांनी टाळ्यांचा कळकळाट केला.पाणी मिळो अथवा न मिळो ,गटार होवो अथवा न होवो पण मंत्रीचे पाय आपल्या वाघनगरला लागतील,हे भाग्य तरी लाभेल.मंत्रीमहोदय रात्री साडेनऊला न येता दिवसाढवळ्या आले तर त्यांचे दर्शनाचा लाभ होऊन अनेकांना पावित्र्य लाभेल.अखिल वाघनगर ग्रामसभेचे फलित काय? मंत्रीचा सत्कार करू.सर्वांनी अंग झटकले.तेथली माती तेथेच टाकली.तेथले विचार तेथेच सोडले.कोणताही लाभ लोभ मोह न करता निष्काम भावनेने परत आले.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED