6 सप्टेंबर पासून म्हसवडचे सिद्धनाथ मंदिर वज्र लेपा निमित्त सव्वा महिना बंद राहणार

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4सप्टेंबर):-येथील मंदिरातील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी या दोन्ही पाषाणमूर्तींना वज्रलेप करण्याचे नियोजन येथील गुरव समाज व सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टने घेतल्याने मंगळवार दिनांक सहा पासून सव्वा महिना मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आले.

          श्रींच्या वज्रलेपाबाबत सविस्तर माहिती , देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आली,की महाराष्ट्र ,आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत   व म्हसवडकरांचे ग्रामदैवत म्हणून हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे.सध्या श्रींच्या मूर्तींची बऱ्याच प्रमाणात झीज झाली असून मूर्तींमध्ये अनेक अवयवांची नाजूक अवस्था निर्माण झाली असल्याने येथील गुरव समाज व देवस्थान ट्रस्ट यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेतली असून श्रींच्या मूर्तींना वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            भाद्रपद शु.एकादशी म्हणजे मंगळवार दिनांक 6 सप्टेंबर 2022 पासून ,अश्विन कृ. द्वितीया, म्हणजे 11 ऑक्टोबर 2022 या सव्वा महिन्याच्या वज्रलेप कार्यक्रम सोहळ्यास सुरुवात होणार आहे. प्रारंभी मूर्ती मधील दैवत्व काढण्याचा धार्मिक विधी होणार असून तेव्हापासून,,वज्रलेप होऊन , प्राणप्रतिष्ठा,होमहवन आदी धार्मिक विधी होईपर्यंत मंदिरामध्ये अहोरात्र अखंड सेवा, मंत्र, जप, साधना, विविध देव स्तोत्रे, गायत्री मंत्र आणि विविध मंत्रांचे पठण आदी धार्मिक विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            वज्रलेप कार्यक्रम सोहळ्यानिमित्त सव्वा महिना मंदिरातील गाभारा बंद राहणार असल्याने श्रींचे दर्शन भाविकांना घेता येणार नसले तरी रविवार, पौर्णिमे दिवशी जसे असते तसे, गरुड खांबापासून भाविकांना दर्शन घेण्याची सोय करण्यात आली असल्याचे, देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आले

      दरम्यान सव्वा महिना वज्रलेप कार्यक्रम सोहळ्यानिमित्त मंदिर गाभारा बंद राहणार असल्याने तमाम ग्रामस्थ व भाविक भक्तांनी मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.