अनधिकृत बॅनर-होर्डींग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करा – ॲड आशिष गोंडाणे

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6सप्टेंबर):-मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 31 जानेवारी 2017 आदेश जारी करीत अनधिकृत होर्डिंग्ज, फलकांविरोधत कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासन तसेच नगरपरिषदे ला दिलेले आहेत . अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्याविरोधात दंडात्मक कारवाईसह शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कारवाईसाठी न्यायालयाने 18002333471 व 180023331982 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत .

अवैध बॅनर लावल्यास महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम 1995 चे कलम 3 अन्वये 2 हजार रुपये आर्थिक दंड किंवा दंड न भरल्यास 3 महिन्याचा कारावास अशी तरतूद आहे.राजकीय कार्यक्रम,नेत्यांचे वाढदिवस, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच धार्मिक सणानिमित्त चौक आणि रस्त्यावर विनापरवानगी बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केले जाते.

शासन नगरविकास विभागाच्या 1 जुन 2003 च्या अधिसुचनेनुसार अश्या जाहिरातीद्वारे सार्वजनिक नीतिमत्ता आणि सभ्यता यांचे उल्लंघन होण्याचा संभव असतो.त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये सार्वजनिक शांतता किंवा सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी चित्रे, चिन्हे,फलक तयार करणे,त्याचा प्रचार करणे, प्रदर्शन करण्यावर प्रतिबंध घालण्याचे पोलिसांना अधिकार दिले गेले आहेत. जर कोणी वरील प्रकारचे कृत्य करेल तर अश्या संबंधित व्यक्तीवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 107 कारवाई होऊ शकते.तसेच फलकावरील मजुरासंदर्भात फलक तयार करण्यापूर्वी आणि लावण्यापूर्वी पोलिसांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे आणि पोलिसांनी प्रमाणपत्र दिल्यानंरच फलक लावण्यास परवानगी दिली जाईल.

फलकावर परवानगी क्रमांक,मुदत ,अर्जदाराचे नाव,आदी नमूद असेल अशी व्यवस्था कायद्यानुसार करण्यात आली आहे. नगरपरिषद ने प्राधिकृत केलेल्या जागेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी फलक, पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज फ्लेक्स आदी लावण्यावर पूर्णपणे प्रतिबंध आहे . या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कमीत कमी 4 महिने व 1 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. ब्रम्हपुरी शहरात बॅनर वर शीतयुद्ध सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ॲड.आशिष गोंडाणे यांनी ही सविस्तर माहिती आमच्या वार्ताहरांना दिली आहे.