खुल जा सीमसीम!अकलका ताला!!

113

एखादी पतसंस्था सुरू होते.भाषण,प्रसार,पत्रके,बैनरबाजी केली जाते.जनतेच्या मदतीसाठी,दुर्बलांच्या कल्याणासाठी ,असे सांगितले जाते.पण येथे जनतेची मदत किंवा कोणाचे कल्याण वगैरेचा हेतू नसतो.मानसिकता तशी नसतेच.लुटारूंना साधू दाखवण्यासाठी भंपकबाजी केली जाते.पुढाऱ्यांच्या कपाळावरील टिळा सुद्धा मुर्खांना भुलवण्याचे थोतांड आहे.मुर्ख लोक,गरजू लोक त्या जाळ्यात अडकतात.नदी नाल्यात जे जाळे लावले जाते,पीठ लावुन गळ टाकला जातो तो माशांच्या कल्याणासाठी असतो का?ते माशाला कळत नाही.पण माणसाला कळले पाहिजे.

मी नंदुरबार येथे आसीआसीआय चे कर्ज घेतले.मंजूर झाले.तर एका अर्जावर बायकोने मराठीत सही केली.त्यांनी अमान्य केली.म्हणे सही इंग्रजीत पाहिजे.मला खटकले.असा कोणता कायदा आहे,कोणती बॅंक आहे,जेथे मराठीत सही चालत नाही?कोण तो ,असा कायदा बनवणारा? ती सरासर अडवणूक होती.मी तसे करणे,त्यांच्या इशाऱ्यावर नाचणे नाकारले.कोण तो तुमचा वरिष्ठ,मी बोलतो म्हणून मी त्याला फोनवर दरडावले.नव्हे चांगलाच दम भरला.तो नरमला.मराठीत सही मान्य केली.मला कर्ज मिळाले.त्याच कर्जाची परतफेड करतांना वसुली एजंट धुळ्याच्या कोळपकर ने माझ्या कडून हप्त्याचे पैसे घेतले.पावती दिली.मी खुष.पण सहा महिन्यांनी मला आयसीसीचे पत्र आले कि, तुम्ही कर्जाचा हप्ता भरत नाहीत.मी सरळ कोळपकरचा फोन नंबर पत्ता घेऊन पोलिसात तक्रार दाखल करण्याची मागणी केली.तेंव्हा माझे पैसे आयसीसीच्या बॅंकेत भरले.असा प्रकार अनेक कर्जदाराच्या बाबतीत होत असतो.

नंदुरबार येथे निराधार महिला भिमाबाई भोईच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र च्या खात्यात दरमहा सहाशे रूपये पडत असत.ती महिला स्लीप भरून पैसे काढत असे.असे करतांना ,पैसै देतांना कैशीयर ने दुसऱ्या कोऱ्या स्लीपवर त्या महिलेचा अंगठा घेतला.ती भरून बाराशे रूपये परस्पर काढून घेतले.तिला कळलेच नाही.जेंव्हा ती उर्वरित रक्कम काढायला आली तेंव्हा कळले कि, तुमच्या खात्यात पैसे शिल्लक नाहीत.ही तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही बॅकेत जाऊन त्या महिलेचे विथड्रावल स्लीप तपासणी ची मागणी केली.आधी उडवाउडवीची उत्तरे दिली.जसे काही बॅंक भारताच्या राष्ट्रपती ची आहे आणि आम्ही युगांडाचे निग्रो आहोत.पण जेंव्हा पोलिस बोलवण्याची कारवाई सुरू केली तेंव्हा त्या महिलेच्या खात्यात बाराशे रूपये जमा झाले.
माझ्या वडिलांनी बहादरपूर पोस्टात आरडी खाते उघडले.सतरा हजाराचा भरणा झाला.पण वडिल आजारी असतांना त्यांच्या नकळत ते पैसे गायब झाले.नंतर कळले कि,एजंटने गुपचूप अंगठा उमटवला.पैसे काढून फस्त केले.सर्वच स्लीप एजंटने भरलेल्या असल्याने ठरवता आले नाही,अंगठा कधी घेतला,कोणी घेतला.वडिलांना गरज नसलेले पैसे पोस्टात ठेवले होते.म्हणून चोरी गेल्याचे दुख झाले नाही.

जळगाव येथील पोस्टात वृद्ध नागरिकांनी व्याजाच्या प्रलोभनाला बळी पडून पेन्शन ची रक्कम काढून पोस्टात ठेवली.ते तर वारले.नंतर तिच रक्कम काढताना विधवा वृद्ध महिलेला खूप उपद्व्याप करावे लागले.कधी साहेब नाही.कधी सर्व्हर डाऊन .कधी पैसे शिल्लक नाहीत.असे सांगून महिलेच्या मृत्यूची वाट पाहात राहिले.मी हस्तक्षेप केल्यानंतर, तुम्ही कोण? म्हणून अडवणूक केली. त्यांनी पैसे अदा केल्याच्या कोऱ्या स्लीपवर त्या महिलेची सही घेतली.मी त्याचे व्हिडिओ शुटींग करून घेतले.याच मुद्यावर आक्षेप घेतला कि, पैसे अदा न करता सही का करून घेतली?आधी पैसे दिले पाहिजे, नंतर सही घेतली पाहिजे.त्याच सोबत संपूर्ण कामकाज व कर्मचारी चे चहरे व्हिडिओत टिपले.हे सर्व समजल्यावर एसी त घाम फुटला.त्या महिलेला ठेवीची रक्कम मिळाली.

जळगाव च्या पीपल्स बॅंकेच्या आर्थिक अनियमितता मुळे आरबीआय ने पंचवीस लाखाचा दंड ठोकला.यांनी भरला सुद्धा.पण ही माहिती पत्रकारांनी प्रसारित केली.तर त्यांचेवर अब्रू चा दावा करण्याची धमकी दिली.बॅंक किंवा पतपेढी किंवा पोस्ट असे गोलमाल करतात आणि प्रसिद्धी केली कि अब्रूची किंमत मागतात.गोलमालची एक कमाई आणि वरून अब्रू विकून दुसरी कमाई ,अशी दुहेरी कमाई या संस्था करतात.जळगाव मधील नवीपेठ मधील एका सहकारी पतसंस्था मधे मी पैसे ठेवायला गेलो.खाते उघडण्याची प्रक्रिया चालू होती.मी रिकामा बसलो.मागे वळून पाहिले.संचालक मंडळाची नावे वाचली.मला दरदरून घाम फुटला.ओरडलो कि बरडलो ?थांबा,माझे खाते काढू नका.रद्द करा.मी पैसे ठेवत नाही.म्हणे का? काय झाले?म्हटले,बापा हो! या लांडग्यांच्या झुंडीत माझ्या बकरीचा टिकाव लागणार नाही.ते केंव्हा फस्त करतील मला कळणारच नाही.खाते उघडतांना,पैसे ठेवतांना संचालक मंडळाचा पुर्व इतिहास माहित असणे खूप गरजेचे असते.तलावात उतरण्याआधी पाणीची खोली माहिती पाहिजे.अन्यथा डुबण्याचे चान्स जास्त.

माझे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते होते.मला एक कागद सोपवला.म्हणे यावर सही करा.तो इंग्रजीत होता.बारीक अक्षरे मला वाचताच आली नाहीत.मला कळलेच नाही तर सही तरी का करावी?म्हणे,तुमचा अटल विमा आहे.परस्पर पैसे कापले जातील.तुम्ही मेल्यावर वारसांना पैसे मिळतील.मला प्रश्न पडला, अटलबिहारी स्वताला मृत्यूपासून वाचवू शकले नाहीत.मला कसे वाचवतील?शिवाय मी जिवंतपणी माझे पैसे खाणेपिण्यासाठी न वापरता,यांचेकडे द्यायचे.मी मेल्यावर हे वारसांना परत करतील याची , ग्यारंटी कोण देईल? बायको पोरांचा तोंडचा घास काढायचा आणि बिनभरोश्याच्या माणसांच्या तोंडात ठेवायचा.आता खाऊ पिऊ देत नाही म्हणून एक राग, मेल्यावर दरदर भटकायला लावले,हा दुसरा राग.इतका राग आल्यावर त्यांनी माझे श्राध्द तरी का करावे? नाही केले तर त्यांचा काय दोष? मीच खरा अपराधी.

जळगाव महापालिकेतील कर्मचारी घोडेस्वार नोकरीत असताना वारले.त्यांचे फंड, पेन्शन साठी लग्नाची एकमेव पत्नी क्लेम करीत होती. तर त्यांची आणखी दुसरी,तिसरी बायको नाही,असा वारसदाखला आणायची सक्ती केली.किती दुख होत असेल त्या बाईला? माझ्या पतीच्या आणखी दोन तीन बायका असतील का? जर एकाच पत्नीने क्लेम केला,दुसरी कोणी क्लेमेंट आलीच नाही तरीही त्या महिलेला आठ महिने याच कारणे ताटकळत ठेवले.कोर्टातून वारस दाखला आणल्यानंतर पेन्शन सुरू केले.पती मेल्याचे एक दुःख,या फजिती चे दुसरे दुःख.या कर्मचारीचे ग. स.पतपेढी मधे आर्थिक व्यवहार होते.वारले तेंव्हा त्यांचेवर कोणतीही थकबाकी नाही,असा दाखला जोडला.तरीही जळगाव महापालिका आधिकाऱ्यांनी सेटलमेंट चा तीन लाखाचा चेक परस्पर ग.स.बॅंकेत जमा केला.जर बॅंकेचे घेणे नाहीच तर चेक का बॅंकेत टाकला?आणि ग.स.बॅंकेने का स्विकारला?असा आक्षेप घेतल्यानंतर तो चेक त्या विधवा महिलेला देण्यात आला.आता कळले ग.स.सोसायटीच्या सभेत हाणमारी का होते?

नंदुरबार येथील ग.स.सोसायटीमधे आमचे मित्र सी जी चौधरी त्यांच्या कामासाठी गेले असता, त्यांना जीवंत माणसे मेल्याची नोंद आढळली.त्यांनी त्या जिवंत माणसांना भेटून सांगितले कि, तुम्ही मेलेले आहात.तुमच्या नावाने प्रत्येकी तीन लाख संचालक मंडळाने परस्पर काढून घेतले.तरीही तुम्ही कर्जाची परतफेड करीत आहात.या प्रकरणाची पोलिसात तक्रार झाली.आख्खे संचालक मंडळ चौदा दिवस जेलमधे होते.यात शिक्षक आमदार पदाचा उमेदवार सुद्धा जेलमध्ये होता.आता कळले कि,ग.स.सोसायटीच्या सभेत हाणामारी का होते?जर या संस्था सेवा करण्यासाठी स्थापन केल्या जातात तर मग,या संस्थामधे नोकरी मिळवण्यासाठी लांच का दिली जाते?संचालक,चेयरमन बनण्यासाठी अवास्तव खर्च का केला जातो? मतदारांना दारू मटण,पाकीट का वाटप केले जाते?मला नाही वाटत कि,सेवा करण्यासाठी असे करावे लागते.

गांधीजी,विनोबाजी,शास्रीजी,साने गुरुजी आणि आता बाबा आमटे यांना अशी पाकिटे वाटण्याची गरज वाटलीच नाही.या आर्थिक संस्थांमधे सेवा वगैरे काही नसते.निव्वळ मेवा असतो.जळगांव जिल्ह्यातील अशा अनेक आर्थिक संस्थांनी लाखो मुर्खांना लुबाडले.पैसे तर गेलेच, पुन्हा कोर्टाच्या चकरा मारत आहेत.ज्या उतार वयात सुखनैव जीवन जगायचे त्याच वयात नरकवास वाट्याला आला आहे.फक्त आर्थिक पतसंस्था नव्हे, शिक्षणसंस्था सुद्धा जनतेच्या सेवेसाठी नसतातच.तसे असते तर संचालक,चेयरमन बनण्यासाठी लफडे, पळवापळवी,हाणामारी, कोर्टकचेरी करायची गरज पडलीच नसती.मुंबईचे आमदार गुवाहाटी ला पळवून नेणारे गुराखी प्रामाणिक असतील का?शिक्षणसंस्थामधे मुख्याध्यापक, प्राचार्य, कुलगुरू बनण्यासाठी मेरीट नाही,पैसे मोजावे लागतात.खुल जा सीमसीम!

जळगाव येथील एका प्रामाणिक बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले होते कि,हर्षद मेहता यांच्या नावाने बॅंकेच्या धुर्त अधिकाऱ्यांनीच बोगस कंपन्या स्थापन केल्या.काही भंगार कंपन्या विकत घेतल्या.कंपन्यांना भरमसाठ कर्ज दिल्याचे दाखवले.कसे बुडवायचे,तेही शिकवले.हर्षद मेहताला जेलमधे पाठवले.तो तेथेच मेला.आणि अधिकारी कोकणात फार्म हाऊसवर लाईफ एन्जॉय करीत आहेत.बीएचआर मधे ठेवलेले पैसे परत न मिळाल्याने ठेवीदार जळगावच्या कलेक्टर कडे गेलेत.म्हणे , आम्हाला फसवले.आमचे पैसे काढून द्या.कलेक्टर ने उत्तर दिले.

” तुम्हारे पास जरूरतसे जादा पैसे थे.जो तुम्हारी पत्नी ,बेटे,बेटी खर्च करना चाहते थे.तुमने उनसे छिपाकर बीएचआर मे रख दिये.उसनेभी वही सोचा,इन पैसोकी जरूरत उनको नही इसलिये मेरे पास रखा है‌.मुझे तो बहुत जरूरत है.मुफ्तमे मिले तो क्यो न लुफ्त उठाऊ?”बीएचआर चे ठेवीदार व कर्जदारांचा अभ्यास केला असता, प्रथमदर्शनी ठळक दिसते कि,गरीब व मुर्ख माणसांनी ठेवी ठेवल्या आणि श्रीमंत व बदमाषांनी कर्ज घेतले.जोपर्यंत मुर्ख माणसे जगात आहेत तोपर्यंत धुर्त माणसे त्यांना लुटत राहातील.तरीही आम्ही प्रयत्न करतो कि,मुर्ख माणसांनी शहाणे व्हावे.जे पैसे जास्त आहेत तेच पैसे बॅंकेत ठेवतात.त्यापेक्षा त्याच पैशांनी आहार,विहार करुन बुद्धी वाढवली तर फसवणूक होणार नाही.

उपभोगम,दानम च,धनस्य.
नतु: त्रयोर्गती भवेत नाशम!

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव