जिवती नगरपंचायतीचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

28

🔹समस्या नगरपंचायतीने तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी होत आहे

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.12सप्टेंबर):- स्वच्छ भारत..स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. सध्या गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे. मात्र जिवती शहरातील प्रभाग क्र.१३ ची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न येरणीवर आला आहे.

प्रभागात क्र.१३ मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात असणारी नाली तुंबल्याने नालीतील दुर्गंधीयुक्त घाण पाणी नालीच्या पात्रा बाहेर ओसंडून वाहत आहे. याकडे नगर पंचायत प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रभागसह शहरातील इतर प्रभागातही नगरपंचायतीच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा झालेले आहे.

या प्रभागातील श्याम धोंडीपरगे यांच्या घरापासून ते प्रल्हाद मदने यांच्या घरापर्यंतची असणारी नाली ही अनेक दिवसांपासून तुंबली आहे. या भागात अगोदरच दैनंदिन साफसफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना, त्यात या नालीच्या घाण पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे इतरांना स्वच्छतेचे शहाणपण शिकवणाऱ्या नगरपंचायत कार्यालयच्या दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. ह्या नालीत घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. या दुर्गंधीमुळे लहान मुले वयोवृद्ध व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक मात्र त्रासून गेले आहेत. येथील नगरपंचायतीला या बाबत तोंडी व लेखी तक्रार देऊन सुद्धा काम होत नसल्याने नागरिकांचा नगरपंचायती प्रती संताप व्यक्त होत आहे. प्रभागातील नागरी समस्या काय आहेत हे जाणून घेण्याची तसदी कधीही नगरपंचायतीने केली नाही.

नगरपंचायती कडून विकासाची अपेक्षा नसल्यामुळे आता नागरिकांनी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न त्यांना पडत आहे. नगरपंचायतीकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे नालीमध्ये पाणी
तुंबत आहे. नालीतील साचलेल्या सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरत आहे. येथील दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत परिसरात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या घाण पाण्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा या समस्या नगरपंचायतीने तात्काळ सोडवाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

◆ नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष

प्रभाग क्र.१३ मध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी नगर प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. या प्रभागातील नाली तुंबल्यामुळे येथील साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले
आहेत.

– आकाश जाधव, नागरिक प्रभाग क्र.१३