🔺जिल्ह्यातील बाधितांची संख्या 128 वर

🔺जिल्ह्यात अँटीजेन चाचणी करण्यात येणार

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.7जुलै): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या 125 व पुण्याचे तीन मिळून 128 वर गेली असून ग्रामीण भागात कोरोना बाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील चिमूर, भद्रावती आणि ब्रह्मपुरी या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित केलेले आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सोडून इतर सर्व व्यवहार हे बंद करण्यात आलेले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. लॉकडाऊन दरम्यान, खाजगी व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी संपूर्णपणे मनाई असणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंद केली जात आहे. संस्थात्मक अलगीकरणात दाखल झालेले नागरिकांचे पाच दिवसात स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येतात. स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यास पुढील दहा दिवसात त्या नागरिकाला गृह अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणानंतर गृह अलगीकरणात राहणे बंधनकारक असणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 125 व पुण्याचे तीन मिळून 128 वर पोहोचली आहे. यापैकी 71 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 57 इतकी आहे. या सर्व बाधितांची प्रकृति स्थिर आहे.

मंगळवारी दुपारी जिल्हा आरोग्य यंत्रणेनेकडून वरील माहिती देण्यात आली. माहितीनुसार पुणे येथील रहिवाशी असलेल्या आणि संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 23, 53 व 23 वयाच्या तीन जवानांचे रविवारी घेण्यात आलेले स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्व पुणे येथून आले होते. एक जुलैला एकाच ठिकाणी हे तीनही जवाण संस्थात्मक अलगीकरणात होते.

तर सोमवारी दिवसभरात एकूण 4 रुग्ण चंद्रपूर जिल्हयात पॉझिटीव्ह ठरले आहे. यामध्ये नागपूरच्या कामठी परिसरातून 26 जून रोजी परत आलेल्या 27 वर्षीय ऊर्जानगर येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीचा स्वॅब सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे.

याशिवाय पडोली येथील एमआयडीसीत काम करणाऱ्या 36 वर्षीय नागरिकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने दोन ठिकाणी खाजगी इस्पितळात ताप आल्यामुळे तपासणी केली होती.

तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या 2 बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव्ह आला आहे.

दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मौदा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

जिल्ह्यातील विविध तपासणी नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवला आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची, वाहनांची तपासणी केल्या जात आहे. या प्रत्येक वाहनांची, नागरिकांची माहितीची नोंद केली जात आहे. या नोंदणी नुसार अशा नागरिकांना संपर्क करून ती संस्थात्मक अलगीकरण झाले आहेत की नाही याची खात्री करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती न लपविता प्रशासनाला सहकार्य करावे. माहिती लपविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून शकुंतला लॉन येथे जावे तसेच तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात जाऊन स्वतः आरोग्य तपासणी करून संस्थात्मक अलगीकरणात रहावे. स्वतः आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण महत्वाचे आहे.संस्थात्मक अलगीकरणात आरोग्यविषयक सर्व सुविधा व काळजी घेण्यात येत आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राथमिक सुविधेसाठी 25 हजार रुपये प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी मदत मिळणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा. आरोग्य सेतूच्या माध्यमातून सेल्फ असेसमेंट आणि ब्लूटूथ असेसमेंट तसेच जिल्ह्यातील संभाव्य कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत याची यादी देखील प्रशासनाला प्राप्त होत आहे.या ठिकाणी नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य सेतूच्या माध्यमातून काही नागरिक पॉझिटिव्ह मिळालेले आहेत.

जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये कोरोना संदर्भात अँटीजेन टेस्टिंग करण्यात येणार आहे. ही चाचणी नेहमीच्या कोरोना चाचणी पेक्षा सोपी व कमी वेळात होणारी आहे. ही चाचणी गावात जाऊन देखील करता येणार आहे.यासाठीच्या मनुष्यबळ, प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे. पुढच्या आठवड्यात ही चाचणी सुरू करण्याचे नियोजन आहे. अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या 6 हजार 525 चाचण्या केलेल्या आहेत. दर दिवशी 200 ते 300 चाचण्या केल्या जात आहे. आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये 78 हॉटस्पॉट मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्या अवतीभवती बाधित असल्याचे नाकारता येत नाही.

बाहेरून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी, नोंदणी व संस्थात्मक अलगीकरण केले नाही अशा नागरिकांची प्रशासनाला 1077 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED