उन्हाळी सुट्टी काळात कोविड ड्युटी केलेल्या शिक्षकांंची बदली रजा अर्जित रजा म्हणून सेवापुस्तिकेत नोंद होणार

    42

    ?आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

    ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(7जुलै):-कोरोना महामारीत कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी चेक पोस्ट,संस्थात्मक विलगीकरण कक्ष,राशन दुकान आदी ठिकाणी जबाबदारी पार पाडली.शिक्षकांना दरवर्षी १ मे पासून सुट्ट्या असतात.या सुट्ट्यांच्या कालावधीतही अनुदानित,अंशतःअनुदानित,खाजगी,प्राथमिक,माध्यमिक,नगरपालिका,जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असुनही या कालावधीत कोरोना आपात्कालीन व्यवस्थापन अंतर्गत विविध कामगिरी पार पाडली.सदर कालावधीमध्ये कोरोना कामगिरी केलेल्या शिक्षकांना जणगणनाप्रमाणे बदली रजा म्हणून अर्जित रजा मंजूर करुन या रजेची नोंद सेवापुस्तिकेत करण्यात यावी अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना केली होती.ही बाब धोरणात्मक स्वरुपाची असल्याने शिक्षण आयुक्त यांनी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचीवांना शिफारस केली आहे.

    आमदार कपिल पाटील यांनी यासंदर्भात शिक्षण आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता.शिक्षण आयुक्तांनी राज्याच्या अप्पर मुख्य सचीवांना शिफारस केल्याने उन्हाळी सुट्टीत कोविड ड्युटी केलेल्या शिक्षकांची बदली रजा अर्जित रजा म्हणून सेवापुस्तिकेत नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार कपिल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना या सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे.आमदार कपिल पाटील यांनी हा प्रश्न उचलून पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे शिक्षक भारती नागपूर विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,माध्यमिक जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर,राकेश पायताडे,प्रशांत सुरपाम,जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,रावन शेरकुरे,धनराज गेडाम,कैलाश बोरकर,विरेनकुमार खोब्रागडे,विलास फलके यांनी अभिनंदन केले आहे.