

🔹एकनाथ खिल्लारे लिखित तगमग कथासंग्रहाचे थाटात प्रकाशन
✒️औरंगाबाद(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद(दि.17ऑक्टोबर):-जीवनाचा अनुभव लेखकाच्या लेखणीतून झिरपत असतो. त्यामुळे ते लिखाण समृद्ध होत असते. एकनाथ खिल्लारे यांच्या कथांमधून हा प्रत्यय येतो. त्यामुळेच तगमग हा मानवी जीवनाचे उत्कट दर्शन घडवणारा कथासंग्रह आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.बोधिपर्ण प्रकाशन प्रकाशित एकनाथ खिल्लारे यांच्या तगमग या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ.दासू वैद्य यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर अध्यक्ष डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्यासह डॉ. दासू वैद्य,रमाई फाउंडेशनच्या डॉ.रेखा मेश्राम, लेखक एकनाथ खिल्लारे आणि प्रा.शिवाजी वाठोरे यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. दासू वैद्य म्हणाले की,भाकरीची भ्रांत असलेला मुलगा शिकण्याला येतो तेथे हॉटेलमध्ये काम करून शिकण्याची तगमग जपतो. खिल्लारे यांनी सर्व कथांमधून प्रांजळपणे वास्तव मांडले आणि त्यावर भाष्य केले.
पुस्तकावर भाष्य करताना डॉ.रेखा मेश्राम म्हणाल्या की, व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून ज्येष्ठ लेखक एकनाथ खिल्लारे लिखित ‘तगमग’ या कथासंग्रहाने शैक्षणिक बळकटीचा म्हणजेच व्यवस्था परिवर्तनाचा मोठा विचार मांडला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवाजी वाठोरे यांनी केले तर आभार कवी देवानंद पवार यांनी मानले.यावेळी साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.