कारंजा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस संपन्न

    49

    ✒️कारंजा घाडगे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    कारंजा(घा)(दि.17ऑक्टोबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा (घा)जि. वर्धा येथे 14 ऑक्टोबर 2022 ला धम्मचक्र प्रवर्तन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समिती, बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

    सर्वप्रथम उपस्थित उपासक / उपासिका यांनी बोधीवृक्षाखाली असलेल्या भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण व मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार अभिवादन केले. त्यानंतर सभागृहातील सर्व आदर्श महापुरुषाच्या तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून मेणबत्ती अगरबत्ती लावून अभिवादन केले.

    याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. पी. गाडगे,प्रमुख पाहुणे पंढरीनाथ पुनवटकर ,विनोद दंडारे आणि कारंजा कृषी ऑफिसच्या सविता कटकतलवारे , जी.आर. गवई विचार मंचावर उपस्थित होते .अध्यक्षीय भाषणातून एस .पी .गाडगे यांनी 15 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथील दीक्षाभूमी येथे दिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दीड तासाच्या भाषणातून दिलेला संदेश यांचा उजाळा करून देताना, घरोघरी सुख ,शांती ,समृद्धी आणि मानव म्हणून जगायचे असेल तर स्वतःला बुद्धिस्ट समजणाऱ्या लोकांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भाषणाचे अनुकरण केले पाहिजे,अन्यथा तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला गालबोट लागले तर याला आपणच स्वतः जबाबदार राहू हे नाकारता येत नाही. त्याकरिता पंचशीलाचे पालन, शहाण्याशी मैत्री व मुर्खाच्या संगतीपासून दूर असले पाहिजे याची सुद्धा प्रत्येकाला जाणीव असणे गरजेचे आहे.

    अशा प्रकारे बुद्धाने दिलेल्या उपदेशाची एस. पी. गाडगे यांनी आठवण करून दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण वाळके तसेच सूत्रसंचालन अशोक नागले यांनी केले व आभार विजय कांबळे यांनी मानले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियुष रेवतकर ,निष्कर्ष नागले, कृतिका नागले, विजय कांबळे , डॉ. युवराज तायडे, डॉ. पारस बीसांद्रे ,मदन नागले, नीरज माहुरे, रमेश मनवर, सुनिता ढोके, वनमाला माहुरे ,किरण काळे, संजय गाडगे यांनी सहकार्य केले .शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे स्मरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.