महाराष्ट्राचा बहुमान !

14

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे लवकरच भारताचे नवे मुख्य सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ९ नोव्हेंबर पासून ते भारताचे मुख्य सर न्यायाधीश म्हणून सूत्र हाती घेतील. विद्यमान सर न्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे विशेष म्हणजे विद्यमान मुख्य सर न्यायाधीश उदय लळित हे देखील महाराष्ट्राचेच आहेत याचाच अर्थ सलग दोन वेळा मराठी सुपुत्रांना देशाच्या न्यायव्यवस्थेचे मुख्य सर न्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे. याआधी चार मराठी न्यायमूर्तींना हा मान मिळाला आहे.

न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर ( १ फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६ ) न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड ( २२ फेब्रुवारी १९८८ ते ११ जुलै १९८५ ) न्यायमूर्ती शरद बोबडे ( १८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१ ) आणि विद्यमान सर न्यायाधीश उदय लळित ( २७ ऑगस्ट २०२२ते ८ नोव्हेंबर २०२२ ) या चार मराठी जनांनी हे पद भूषविले आहे. यातील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे धनंजय चंद्रचूड यांचे वडील आहेत. याचाच अर्थ वडील आणि मुलगा देशाचे सर न्यायाधीश होण्याचा अनोखा योगायोग या निमित्ताने घडला आहे. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे सात वर्ष देशाचे सर न्यायाधीश होते हा एक विक्रमच आहे त्यांचे सुपुत्र न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना २ वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे अर्थात हा कार्यकाळ देखील खूप मोठा आहे त्यामुळेच त्यांचा कडून मोठ्या अपेक्षा आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त होण्यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती देखील होते. दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर कायद्या संदर्भात पुढील शिक्षण घेण्याकरिता ते हार्वर्डला गेले तेथून आल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली त्या अगोदर काही काळ त्यांनी पश्चिम भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले.

वकील आणि न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा अनुभव दांडगा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या नात्याने न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सर्वात जास्त वेळा घटनेशी संबंधित मुद्द्यांच्या सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या घटना पीठावर काम केले आहे. राज्यघटना, मानव अधिकार, जनहित याचिका, गुन्हेगारी कायदा, वाणिज्य कायदा अशा विविध विषयांवर त्यांनी आपले निकाल दिले आहेत. राम जन्मभूमी वादा संदर्भात २०१९ साली ५ सदस्यीय खंडपीठाने जो एकमताने निर्णय दिला त्या खंडपीठात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे देखील होते. प्रायव्हसी ( खाजगी ) हा मूलभूत अधिकार असल्याचा ऐतिहासिक निकाल देखील न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच दिला आहे. याशिवाय अनेक ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण निकाल न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत.

त्यांच्या निवडीचा तमाम मराठी माणसांना अभिमान आहे. देशाच्या मुख्य सर न्यायाधीशपदी झालेली त्यांची निवड म्हणजे महाराष्ट्राचा बहुमान आहे. न्यायालय आणि न्यायालयीन कामकाज याविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत. न्यायालयात जलद न्याय मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांनी न्यायालयाची पायरी चढुच नये अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. सर्वसामान्य नागरिकांची ही भावना खोटी ठरवून जलद न्याय देण्याबरोबरच न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा दृढ करण्याची जबाबदारी देखील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यावर आहे त्यात ते यशस्वी होतील यात शंका नाही. देशाचे नवे सर न्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे मनापासून अभिनंदन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५