अगा भाऊ, प्रकाशोत्सव कोठे कोठे आहे गा?

16

[आकाशातील गंमतीजंमती: ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहण विशेष]

आपल्या भारत देशात हिंदुबांधवांच्या सणाचा राजा दीपावली आहे. यंदा या सणातील प्रकाशोत्सव अर्थात दीपोत्सव दि.२१ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मिणमिणत्या पणत्या, चमकणारे, प्रखर तेजाचे व रंगीबेरंगी प्रकाशाचे बल्ब यामुळे संपूर्ण भारतदेश झगमगणार आहे. हा झगमगाट दि.२६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे नागरिकांना आनंदोत्सवाची खुप प्रचिती घेता येणार आहे. दुधात साखर पडावी किंवा दुग्धशर्करा योग जुळून यावा अगदी तसेच यंदा या दीपावलीच्या दरम्यान अनुभवायला मिळणार आहे. कारण आणखी एका प्रकाशोत्सवाचा आनंद आकाशातूनही बरसणार आहे; तो म्हणजेच नयनरम्य ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहण होय. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील सर्व शहरातून ते मनोहारी दृश्य थोड्या थोडक्या फरकाने का होईना नेत्रांत साठवता येणार आहे, ही फार मोठी उपलब्धी असेल. याविषयीची चटकदार माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींच्या शब्दशैलीतून वाचाच… संपादक.

यंदा दिवाळीत मंगळवार दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावली निमित्त पृथ्वीवरील भारतभूसह बऱ्याच ठिकाणी दीपोत्सव- प्रकाशोत्सवाची रोषणाई अनभवत असतानाच वर आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई बघावयास मिळणार आहे. अशी विश्वासपूर्ण माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल-अंतरीक्ष विज्ञान केंद्राने जाहीर केली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी हाती आली आहे, की आश्विन अमावस्येच्या दिवशी मंगळवार दि.२५ ऑक्टोबर रोजी ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ते आपल्या भारतासह आशिया खंडातील पश्चिम व मध्यभाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडातील काही भागातून पाहण्याची दुर्मिळ अशी सुवर्ण संधी चालून आली आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र- सॅरोस १२४ क्रमांकाचे असल्याचे सांगितले जात आहे. ग्रहण ग्रासण्याची टक्केवारी ही सर्वात कमी उस्मानाबाद येथे ३३ टक्के असणार आहे तर सर्वाधिक जालना येथे ३७ टक्के असणार आहे, हे विशेष!

या प्रकाशोत्सव- दीपोत्सव सूर्यग्रहणानंतर अवघ्या चौदा दिवसातच मंगळवार दि.८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे चंद्रग्रहणसुद्धा आपल्या भाग्यवंत भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच- ग्रस्तोदय चंद्र उगवताना दिसणार आहे, हेही दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असेल, यात शंकाच नाही! यावर्षी जरी सूर्यग्रहण दीपावलीत येत असले तरी २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाचे दिवशी कोणताही सण आलेला नाही. त्यामुळे हे चित्ताकर्षक सूर्यग्रहण फुर्सदीने न्याहाळण्याची नामी सुवर्ण संधीच प्राप्त झाली आहे. जीवघेण्या कोरोना संकटाच्या तब्बल दोन वर्षांनंतर हा दिव्यांच्या झगमगाटाचा दिवाळीचा सण पृथ्वीवर आणि आकाशातही मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा होत आहे, असे म्हणणे वावगे ठरू नयेच!

मराठवाड्यातील शहरांच्या वेळा पाहिल्यास औरंगाबाद येथून संध्याकाळी ४.५० वा. सूर्यग्रहणास स्पर्श होईल.ग्रहणमध्य सायंकाळी ५.४२ वा. होईल. त्यावेळी चंद्रबिंब हा सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग व्यापलेला आढळून येईल. आकाशात पश्चिम दिशेला सूर्यास्ताचे वेळी हे विलोभनीय दृश्य आपल्याला पाहता येईल. त्यानंतर ग्रहणमोक्ष- ग्रहण सुटण्यापूर्वीच सायंकाळी ६.०९ वा. सूर्यास्त- ग्रस्तास्त होईल. ग्रहण लागलेल्या स्थितीतच सूर्य मावळलेला असेल. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ग्रहणातच सूर्यास्त होत असलेला दिसेल. मात्र खगोलप्रेमी, अंतराळ निरीक्षणप्रेमी, अंतरिक्ष अभ्यासक, विद्यार्थी, भूगोलशिक्षक, हौशी छायाचित्रकार यांना ही एक पर्वणीच आहे. मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसणार आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल, त्यावेळा अशा- औरंगाबाद शहर- स्पर्श सायं.४.५०, मध्य ५.४२, ग्रस्तास्त ५.५९ वा. जालना शहर- स्पर्श सायं.४.४९, मध्य ५.४२, ग्रस्तास्त ५.५६ वा. बीड शहर- स्पर्श सायं.४.५२, मध्य ५.४३, ग्रस्तास्त ५.५७ वा. उस्मानाबाद शहर- स्पर्श सायं.४.५४, मध्य ५.४४, ग्रस्तास्त ५.५७ वा. हिंगोली शहर- स्पर्श सायं.४.५१, मध्य ५.४२, ग्रस्तास्त ५.५१ वा. नांदेड शहर- स्पर्श सायं.४.५३, मध्य ५.४३, ग्रस्तास्त ५.५१ वा. परभणी शहर- स्पर्श सायं.४.५२, मध्य ५.४३, ग्रस्तास्त ५.५३ वा. लातूर शहर- स्पर्श सायं.४.५४, मध्य ५.४४, ग्रस्तास्त ५.५४ वा. असतील. औरंगाबाद येथे विशेष ग्रहणमहोत्सव आयोजित केला आहे.

या ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त नागरिकांत असलेल्या विविध गैरसमजूती व अंधश्रद्धा दूर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, म्हणून दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी टेलिस्कोप ऑनर्स मीटचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्यांच्याकडे स्वतःची दुर्बीण आहे त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा किंवा मीटदरम्यान आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांची अकल करण्यात मदत करावी लागणार आहे. या मीटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपली नावे दि.२० ऑक्टोबर २०२२पर्यंत एमजीएम खगोल-अंतरिक्ष विज्ञान केंद्रांकडे नोंदवावयाचे होते.

या ग्रहण दीपोत्सवाच्या निरीक्षणासाठी ग्रहणचष्मे एमजीएम विज्ञान केंद्रातून उपलब्ध करून दिले जातात. सूर्यग्रहण पाहण्यासाठी अत्यावश्यक असे विशेष ग्रहणचष्मे औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल-अंतराळ विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत. यासाठी एमजीएम विज्ञानकेंद्र मोबाईल क्रमांक ९८५००८०५७७ वर संपर्क साधता येईल. सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टिदोष उद्भवू शकतात. सूर्यग्रहण हे खास ग्रहणचष्म्यातूनच न्याहाळावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पहावे. आगामी दहा वर्षांपर्यंत सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध होणार नाही. पुढील दहा वर्षांत आपल्या देशातून दोन सूर्यग्रहण दिसतील. यातील दि.२ ऑगस्ट २०२७ रोजी दिसणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हे ग्रहण दिसण्याची शक्यता शून्यात जमा आहे. तर दि.२१ मे २०३१ रोजी रामेश्वरम येथून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून मराठवाड्यात ते खंडग्रास स्थितीत ते दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदाची ही दिवाळीतील ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यास मिळालेली सुवर्ण संधी व्यर्थ दवडू नये, असेच वाटते. मात्र सद्याच्या अभ्राच्छादित वातावरणामुळे याही संधीवर पाणी फिरेल की काय? असे मनात विचारांचे ढग गर्दी करू पाहणे साहजिकच आहे!

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे ग्रहण निरीक्षणास सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(आकाश निरीक्षणप्रेमी)
रामनगर, गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.