उपकार कुणावर करायचे?

41

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात.दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला.आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली.एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली,आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय.ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो.हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत.तुम्ही तिला मारू नका.

पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला,आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही.आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस.कुणीही तुला त्रास देणार नाही.याची मी ग्वाही देतो.तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली.एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व गरुडाच्या लक्षात आले.आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या गरुडाने मनातल्या मनात ठरवले.

एकदा गरुड उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडली.ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असता अधिकच खोल जात होती.शेवटी गरुडाने त्यांना अलगद बाहेर काढले.उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती.गरुडाने त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ ऊब दिली.थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी गरुडाने उंदराच्या पिलांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या त्याला उडता येईना. तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले.

उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या गरुडाचे संपूर्ण पंख कुरतडले होते.फडफडत कसेबसे गरुड तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला त्याबाबत विचारले.

“तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले?”

बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली, “उपकार कधीही वाघा सारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण,स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्था करिता दूसरा पर्याय शोधात असतात. स्वतःचा स्वार्थ साधला कि, ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला सुद्धा विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र दिलदार स्वभावाचे लोक निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्याऱ्याला लक्षात ठेवतात.”

स्वार्थी लोकांना लवकर ओळखा.कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे,गैर कारभाराचे,भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून,गडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात….त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते.आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाहीत; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात.

त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान होते ते या क्षणाला होते.त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. ‘ हेचि फल काय मम तपाला ‘ ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा ‘थेंबे, थेंबे’ संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच,आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते.तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.शेवटी काय तर आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही. पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात, माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे…येवढंचं काय ते……..?
नमोबुद्धाय ! जयभिम !!.

✒️लेखन:-भंते शाक्यपुत्र राहुल,श्रावस्ती बुद्धविहार पैठण(9834050603)