स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी- स्वामी दयानंद सरस्वती!

42

(स्वामी दयानंद सरस्वती पुण्यस्मृती विशेष)

स्वामी दयानंद सरस्वती हे एका युगपुरूषाचे नाव आहे. एकोणीसाव्या शतकातली ती एक महान व्यक्ती नव्हे, शक्ती होती. ते एक महान धर्मसुधारक व समाजसुधारक होते. अंधारात सापडलेल्या व दिशा हरवून बसलेल्या समाजाला व देशाला आधार असतो तो केवळ समोरच्या क्षीतिजावर चमकणाऱ्या ध्रुवताऱ्याचा. स्वामी दयानंद सरस्वतींनी धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा बायो समाजाकडून घेतली होती. प्रारंभीच्या काळात त्यांच्या सहकार्यानेच धर्मप्रचाराचे व धर्मानुधारणेचे कार्य करीत. तथापि पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी मुंबई येथे दि.१० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणांबरोबरच शैक्षणिक सुधारणा केल्या. वेदांचे शिक्षण घेणारा तरुण हा निर्भय, तेजस्वी आणि काळाचे आव्हान स्वीकारणारा केव्हा होईल? असे स्वानी दयानंदाना वाटत होते. उत्तर भारतात त्यांनी चालविलेले चोक्षण प्रसाद कार्य अतिशय महत्वपूर्ण ठरले. समाजाच्या सर्व घटकाना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे, अशी त्यांची धारणा होती. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान मिळावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. स्वामीजींनी ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू केले.

महर्षी दयानंदांचा जन्म गुजरातमधील टंकारा या गावी दि.१२ फेब्रुवारी १८२४ रोजी झाला. त्यांचे मूळनाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. त्यांचे आई-वडील औदिच्य ब्राह्मण होते. समाजात त्यांना सन्मानाचे स्थान होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. घराण्यात ज्ञानाची परंपरा होती. मूळशंकर हा कुशाग्र बुद्धीचा संवेदनशील मुलगा होता. वयाच्या चौदाव्या वर्षी यजुर्वेद त्यांना पूर्ण कंठस्थ होता. तीन प्रसंग असे घडले की त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले. पहिला प्रसंग शिवरात्रीच्या दिवशी घडला. शिवमंदिरात व्रत, उपवास करत असता रात्रीच्या सामसूम झालेल्या क्षणी शिवपिंडीवर उंदीर चढला. त्याचा कुठलाच प्रतिकार पिंडीकडून होत नव्हता. वडिलांकडून भगवान शिवाबद्दल बरेच ऐकले होते, तसे होताना दिसले नाही. दुसरे, बहिणीचा मृत्यू व तिसरा प्रसंग चुलत्याचा मृत्यू होय. या प्रसंगांनी खुप दु:ख झाले. मलाही असेच मरण येईल का? मृत्यू काय आहे? तेही जाणणे आवश्यक वाटून मूलशंकरने एके दिवशी गृहत्याग केला व ते पुन्हा कधी घरी परतले नाही. लग्नाच्या बेडीतही अडकले नाही.
एकदा शिवरात्री होती. वडील म्हणाले, “मूलशंकर, आज सर्वांनी उपवास करायचा. रात्रभर देवळात जागायचे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करायची.” हे ऐकून मूलशंकरने उपवास केला.

दिवस संपला, रात्र झाली. मूलशंकर आणि वडील शंकराच्या देवळात गेले. त्यांनी पूजा केली, पिंडीवर फुले वाहिले. तांदळाच्या अक्षता वाहिल्या. रात्रीचे बारा वाजले. वडिलांना झोप येऊ लागली, पण मूलशंकर जागे राहिले. आपला उपवास निष्फळ होईल, या भीतीने ते झोपले नाही. देवळातल्या बिळांतून उंदीर बाहेर आले आणि शंकराच्या पिंडीभोवती फिरू लागले. ते पिंडीवरच्या अक्षता खाऊ लागले. हे दृश्य पाहून जी मूर्ती उंदरापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ती भक्तांचे संकटापासून रक्षण कशी काय करू शकेल? मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते; तेव्हा मूर्तिपूजेलाही काही अर्थ नाही. अशा तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. त्या वेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली. परमेश्वराचे शाश्वत स्वरूप व धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली. इ.स १८५७च्या असफलतेपासून तर काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत भारतीयांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या ज्या महापुरुषांनी केले, त्यापैकी स्वामी दयानंद हे एक होते.

भारतात ब्रिटिशांना हाकलण्याकरिता सशस्त्रक्रांती हा एकमेव मार्ग आहे, अशी त्यांची पक्की खात्री होती. आर्यसमाज आणि गुरुकुल यांमध्ये राष्ट्रभक्ताना सशस्त्र क्रांतीकरिता प्रेरणा आणि प्रशिक्षण मिळत असे. स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय आणि लाला हरदयाल आदी ब्रिटिशांना भारतातून हाकलण्याकरिता उघडपणे लढणारे नेते आर्यसमाजीच होते.

एकदा टंकारा नगरामध्ये कॉलराची साथ आली. त्या साधीमध्ये मूलशंकरची चौदा वर्षांची बहीण मरण पावली. या घटनेनंतर तीन वर्षांनी मूलशंकरच्या आवडत्या काकांचाही कॉलरामुळे मृत्यू झाला. मूलशंकरला याचा जबरदस्त धक्का बसला, जणू काही त्यांचे जीवन सर्वस्वच हरवले! कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा, अशी मूलशंकरच्या मनात इच्छा निर्माण झाली. जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्म्याकडून समजवून घ्यावीत, असे त्यांना वाटत होते. या ध्येय प्राप्तीकरिता वयाच्या २१व्या वर्षीच त्यांनी घरदार सोडले. त्यांच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांच्या लग्नाचा चालविलेला विचार, हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते. भौतिक सुखाचा आनंद लुटण्यापेक्षा स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेणे, त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेत फिरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गृहत्याग केल्यानंतर मूलशंकर अहमदाबाद, बड़ौदा, हरिद्वार, काशी, कानपूर या ठिकाणी गुरूच्या शोधार्थ जंगलातून व पहाडातूनसुद्धा प्रवास करीत राहिले, परंतु त्यांना योग्य गुरू मिळाला नाही. याच सुमारास त्याकाळचे प्रकांड पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांची मूलशंकरशी भेट झाली. त्यांचे शिष्यत्व पत्करून मूळशंकरांनी संन्यास धर्माचा स्वीकार केला.

संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. पंधरा वर्षापर्यंत सर्वत्र भ्रमंती केल्यावर स्वामी पूर्ण शर्मा नामक साधूच्या म्हणण्यानुसार स्वामी दयानंद मधुरेस येऊन पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून वेद व इतर हिंदू धर्मग्रंथाचे ज्ञान घेतले. स्वामीजींना वेद सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वाटत होते. मुख्य म्हणजे वेदांमध्ये मूर्तिपूजा नव्हती की उच्चनीच हा भाव नव्हता. वेदातील ज्ञान हे खरेखुरे ईश्वरीय ज्ञान आहे; पवित्र ज्ञान आहे. ते समाजाकरिता अत्यंत उपयुक्त आहे. अशी दयानंदांची अदा होती. म्हणूनच त्यानी “वेदाकडे परत जा” अशी भारतीयांना शिकवण दिली. आपल्या अस्खलित प्रवचनाद्वारे ते मूर्तिपूजा, जन्मजात उच्च-निचता, जातिभेद, जाचक रूढी, यज्ञांमध्ये केली जाणारी पशुहत्या यांच्यावर घणाघाती आघात करू लागले. इ.स. १८६९मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पंडिताशी शास्त्रार्थावर वादविवाद केला, त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले.

सत्यार्थ प्रकाश हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंदांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी होय. या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय असून त्यामध्ये वेदांचा सत्यार्थ दिलेला आहे. म्हणून या ग्रंथाला सत्यार्थ प्रकाश म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णपणे वेदांवर आधारलेला आहे. वेद भाष्य, संस्कार निधी, व्यवहार भानू इत्यादी ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिले. सर्व मानव एक, सर्वांचा देव एक, सर्वांचा धर्म एक, पृथ्वी माता एक, हीच जीवनाची चतुःसूत्री आहे. स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही, त्यांना अज्ञानात ठेवले जाते. हे भारताच्या अध:पतनाचे एक कारण आहे. ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेल्या रत्नांचे प्रतिबिंब आरशात पडू शकत नाही, त्याप्रमाणे जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धतीसारख्या मूर्ख रुढीचे बंधन तोडत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे. त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे. सीता आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्या. ते त्यांच्या सद्गुणांमुळे, त्यांच्या पडद्यामुळे नाही. स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे. स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी असल्याने तिला तिचे अधिकार मिळाले पाहिजेत. हे त्यांचे विचार आजही प्रेरक वाटतात. अशा या महान युगपुरुषांनी दि.३० ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग करून अनंतात विलीन झाले.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️श्री एन. के. कुमार जी. गुरुजी.पोटेगावरोड, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.