देवेंद्रजी, पत्रकार एच एम व्ही, चाय-बिस्कुटवाले का झाले यावर जाहिर परिसंवाद घ्याल का ?

15

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551009

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही पत्रकारांना उद्देशून ते ‘Master of voice’ असे म्हंटले होते. त्यानंतर लगोलग भाजपाचे आमदार शहा यांनी चाय-बिस्कुटवाले पत्रकार असे न म्हणता त्यांना “एच एम व्ही” असे म्हणण्याचे आवाहन केले. फडणवीसांचे नेतृत्व मानणा-या आयटी सेल वाल्या पिलावळींनीही तीच री पुढे ओढली. विरोधात लिहीणा-या व बोलणा-या पत्रकारांना उद्देशून “एच एम व्ही” म्हणायला सुरूवात केली. देवेंद्रजींनी पत्रकारांना अप्रत्यक्षपणे कुत्र्याचीच उपमा दिली आहे. एच एम व्ही कंपनीने Master of voice या वाक्याशी संबंधीत लोगो प्रसिध्द करताना ग्रामोफोनसोबत कुत्र्याचे चित्र प्रसिध्द केले होते.

फडणवीसांना हे वाक्य उच्चारताना तेच सुचितच करायचे होते. खरेतर फडणवीसांचे हे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. इतक्या उंचीवर गेल्यावर त्यांनी सामान्य व सुमार कार्यकर्यांसारखी भाषा वापरणे योग्य नाही. कारण त्यांच्यासारखे जबाबदार लोग जेव्हा बेजबाबदार वागतात व बोलतात तेव्हा चुकीचे पायंडे पडतात. चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या प्रवृत्तीला बळ मिळते. त्यांना बोलायचेच होते तर त्या काही लोकांची नावे घेवून त्यांनी बोलायचे होते. पण ते तसे बोलले नाहीत. त्यांनी त्यात संदिग्धता ठेवली आहे. त्यामुळेच त्यांच्या या वक्तव्याचा मागील लेखात आम्ही खरपुस समाचार घेतला. पण देवेंद्रजींनी हा विषय छेडलाच आहे तर त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. फक्त साधी चर्चा नव्हे तर व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे. पत्रकार चाय-बिस्कुटवाले का झाले ? पत्रकार “एच एम व्ही” का झाले ? यावर फडणवीसांनी जाहिर परिसंवाद आयोजित करावा. पत्रकारांच्या, माध्यमांच्या अर्थ शास्त्रावर चर्चा करावी. या अत्यंत महत्वाच्या विषयावर त्यांनी मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणावी.

या परिसंवादाला राज्यातल्या सगळ्या पक्षाचे पक्ष प्रमुख, पदाधिकारी, माधमातले सर्व मान्यवर, संपादक, विचारवंत, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी अशी महत्वाची माणसं बोलवावीत. सामान्य नागरिकही सदर परिसंवादाला उपस्थित राहिल याची तजवीज करावी. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही चर्चा घडवून आणावी. पत्रकार विकतात, विकले जातात हे खरं आहे. पण ते का विकतात ? का विकले जातात ? त्यांना विकत घेणारे कोण असतात ? समाजात केवळ पत्रकारच विकले जातात का ? इमान, निष्ठा, आत्मा फक्त पत्रकारच विकतात का ? या समाजातले बाकी कुणीच विकले जात नाहीत का ? या सर्वांचा उहापोह तिथे व्हावा. एकदा ‘दुध का दुध पाणी का पाणी’ होवून जाऊ दे.

पत्रकारितेला बाजारबसवीचे स्वरूप कुणी दिले ? त्याला जबाबदार कोण ? याची तटस्थपणे तिथे चर्चा व्हावी. अलिकडे म्हणजे २०१४ नंतर मोदी सत्तेवर आसूड सुरू झाल्यापासून पत्रकारांना उद्देशून चाय-बिस्कुटवाले, कुत्रकार वगैरे शेलक्या शब्दांनी पत्रकारांना टार्गेट करणे सुरू झाले. विरोधात लिहीणा-या व बोलणा-या पत्रकारांच्यावर विरोधी पक्षांचे टँग लावणे सुरू झाले. हे सगळं जाणिवपुर्वक केले गेले. कॉंग्रेसच्या सत्ता काळातही पत्रकारांना शिव्या देणे, दम देणे चालूच होते. पण मोदी सत्तेत आले आणि हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. खरेतर हा हल्ला पत्रकारांच्या नैतिक धैर्यावरचा होता. पत्रकारांच्या मनोधैर्यावरचा होता. विरोधात लिहीणा-या व बोलणा-या पत्रकारांचे मनोबल खच्ची करणारा हा हल्ला होता. ज्यांना विकत घेता येत नाही, ज्यांचे आवाज दडपता येत नाहीत अशांच्या मनोबलावर जाणिवपुर्वक केलेले हे हल्ले होते. रवीषकुमार सारख्यांना कसल्या कसल्या धमक्या दिल्या गेल्या ? कसल्या शिव्या दिल्या गेल्या ? याला पारावार नाही. भांडवलदार मालकाला हाताशी धरून माधमात अडचण ठरणा-या अनेकांचे पत्ते कसे कापले गेले ? त्यांना प्रवाहातून बाहेर कसे कोलले गेले ? या सगळ्यावर एक थरारक चित्रपट निघेल इतकी भयंकर हरामी केली आहे.

लोकशाहीत विरोधातले आवाज दडपण्यासाठी केलेला हा आटापिटा कुणाच्या मालकाने केलाय ? आणि त्या मालकाचे ‘Master of voice’ कोण आहेत ? ते जगजाहिर आहे. अशा हल्ल्यांची सुरूवात भाजपाने चाळीस पैसेवाल्या भाडोत्री ट्रोलर्सच्या माध्यमातून चालू केली होती. आता यात सगळ्याच पक्षाचे लोक उतरले आहेत. त्यांनी याला सार्वजनिक स्वरूप दिले आहे. देवेंद्र फडणवीसही परवा पत्रकारांना अप्रत्यक्ष तेच बोलले. आजवर त्यांचे पाळीव ट्रोलर्स बोलत होते. ट्रोलर्सकडून हिच मंडळी वदवून घेत होती तरीही इथपर्यंत ते ठिक होते. पण जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर काम करणारा माणूसच असे बोलतो तेव्हा ते गंभीर व चुकीचे आहे. पत्रकार विकले जात नाहीत, सुपा-या घेत नाहीत, पत्रकार हरामखोरी करत नाहीत, पत्रकार पाकीट घेत नाहीत. पत्रकार शुध्द आहेत किंवा स्वच्छ आहेत. असा दावा आम्ही कधीच करणार नाही. पण ज्यांचे हात बरबटलेले नाहीत त्यांनी यावर बोलावं. ज्यांच्या हाताला कुठल्या सौद्याचा स्पर्श नाही झाला नाही, ज्यांनी कसलेही गैरव्यवहारी वर्तन केले नाही. ज्यांनी नैतिकता फाट्यावर मारणारे कसलेही काम केले नाही, ज्यांनी आर्थिक, वैचारिक व तात्विक भ्रष्टाचार केला नाही अशा माणसानेच यावर बोलावं.

वर्षभर राष्ट्रवादीला शिव्या घालून, सिंचन घोटाळ्याच्या पुराव्याचे कागद गाडीने देतो म्हणत पहाटे पहाटे त्याच अजित पवारांसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणा-या माणसाने हे बोलावं का ? विरोधी पक्षात असणा-या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर मोठ-मोठ्याने बोलायचं आणि त्यांनाच आपल्या पक्षात घेवून सत्तेत सोबत घेणा-या, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणा-या माणसाने हे बोलावं का ? हा खरा प्रश्न आहे. पुजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावरती टोकाचे आरोप केले, त्याच्या राजिनाम्याची मागणी केली. त्यांच्या विरोधात रान उठवले, त्याच्या लफड्याची प्रचंड चर्चा केली. ती घडवून आणताना पुजा चव्हाणच्या कुटूंबाच्या वाट्याला काय येईल ? याचा कसलाही विचार केला नाही. सदरची चर्चा करताना राठोडांच्या चड्डीत हात घालून केली आणि पुन्हा त्याच माणसासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अशी शपथ घेणा-या माणसाने हे बोलावं का ? ही कोणती सात्विकता आणि शुध्दता ? पत्रकारांचे आवाज त्यांच्या धन्याचे असतीलही पण, देवेंद्रजी, जरा कान लावून तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून पाहता काय ? तो काय म्हणतोय ते ऐकता काय ? आरशासमोर उभे राहून जरा स्वत:च स्वत:च्या डोळ्यात डोळे घालून पहाता काय ? स्वत:च स्वत:ला काही प्रश्न विचारून बघता काय ? स्वत:च्या गिर्रेबानमध्ये झोकून पहा आणि मग कुणाचा आवाज Master of voice आहे ? ते तपासा.

पत्रकार बाजारू का झाले ? माध्यमं विकत घेण्याची परंपरा कुणी चालवली ? या परंपरेला कुणी प्रस्थापित केले ? सत्ता व भांडवलाच्या बदल्यात माध्यमं कुणी दावणीला बांधली ? यावर एकदा जाहिर चर्चा होवून जाऊ दे. आयुष्यभर पत्रकारिता करूनही आज अनेकांना धड पोट भरता येत नाही. तालुका प्रतिनिधी म्हणून आयुष्यभर काम केलेल्या माणसाला स्वत:च्या मुलाला इंजिनियरिंगला प्रवेश घेता येत नाही. त्यांना चांगले शिक्षण देता येत नाही. पत्रकार अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करत असतात. मुख्य प्रवाहातील, मुख्य माध्यमातील काही मोजकी मंडळी सोडली तर बहूतेक पत्रकारांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यांचा जगण्याचा स्तर फार उंचावलेलाही नाही. बायका-मुलांच्या नजरेत तो सन्मान मिळण्याच्याही लायकीचा नाही. भाजपाच्या आयटी सेलने ज्या पध्दतीने पत्रकार आणि पत्रकारितेवर चिखलफेक सुरू केली तेव्हापासून पत्रकारांना शिव्या देणारांची संख्या वाढली आहे. सगळेच पत्रकार भ्रष्ट आहेत असा समज रूढ झालाय. इतर सर्वच क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातही काही ठग आहेत, नालायक आहेत पण म्हणून सर्वांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे करणे योग्य नाही. पत्रकारांची खरच काय स्थिती आहे ? याचा परामर्श या निमित्ताने घ्यावा. पत्रकारांची दुरावस्था तरी या निमित्ताने लोकांच्या समोर येईल. मुठभर भांडवलदार मालक सोडले तर सगळे पत्रकार जे जिणं जगतात ते देवेंद्र फडणवीसांनी स्विकारावं असं त्यांना खुले आव्हान आहे.

आर्थिक संकटाशी मुकाबला करत, लोकांचा त्रास सहन करत निष्ठेने पत्रकारिता करणा-या तमाम पत्रकारांची ही कुचेष्ठा आहे. एका चांगल्या परंपरेची ही विटंबना आहे आणि ती फडणवीसांनी केली आहे. या व्यवस्थेत पत्रकार एकटेच विकले जातात का ? कुठलेही राजकारणी विकले जात नाहीत का ? ते पत्रकारांना विकत घेत नाहीत का ? ते पत्रकारांना पैसे देवून, भिती घालून, दम देवून, मारहाण करून त्याचा आवाज बंद करत नाहीत का ? यावरही चर्चा करावी. फडणवीसांच्यात हिम्मत असेल ? त्यांच्यात थोडीफार जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तटस्थपणे असा परिसंवाद आयोजित करावा. समाज व्यवस्थेतील कुुठला कुठला घटक विकला जात नाही ? कुठले कुठले घटक विकले जातात ? हे ही सांगावे. फडणवीस गेली दोन दशके राजकारणात आहेत. या काळात त्यांनी व त्यांच्या पक्षाने मतांसाठी दारू वाटली नाही ? पैसे वाटले नाहीत ? पैशाचा वापर करत राजकारण केले नाही ? पत्रकार विकत घेतले नाहीत ? याचा खुलासा करावा. विकले जाणारे नालायक असतील तर विकत घेणारे महानालायक नाहीत का ? विकेल जाणारे विकाऊ तर विकत घेणारे कोण ? त्यांना हरिश्चंद्र म्हणायचे का ? २०११ ते २०२२ या काळात भाजपाने माध्यमावर किती खर्च केला ? माध्यमांना किती हजार कोटीच्या जाहिराती दिल्या ? किती हजार कोटीचे पँकेज दिले ? याचाही खुलासा करावा. पत्रकार विकले जात असतील, विकाऊ असतील तर त्यांनाही सरसकट इडी लावावी. जे भ्रष्ट आहेत त्यांना तुरूंगात टाकावे पण त्याच वेळी सर्व पक्षाच्या सरसकट नेत्यांना इडी लावावी. त्यांच्याही संपत्तीची चौकशी करावी. केवळ विरोधकांनाच नव्हे तर स्वपक्षीय नेत्यांनाही इडी लावावी आणि त्यांची प्रामाणिक चौकशी करावी. फडणवीसांच्यात असेल हिम्मत तर त्यांनी हे जरूर करावं हे खुलं आव्हान आहे.

*टिप :- दम दिला, धमक्या दिल्या, तुरूंगात टाकले, काही वाट्टेल ते केले तरी मरेतो हा आवाज थांबणार नाही*