सिडको-मराठा,शेटजी, भटजींचे षडयंत्र?

17

छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले ते रयतेचे म्हणजेच 85 टक्के स्त्री,शूद्राती शूद्र, ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीय लोकांच्या सर्वाधिकारांचे राज्य होते. वर्तमान महाराष्ट्रात हा सामाजिक समतेचा दृष्टिकोन मागासवर्गीय ओबीसी, एससी, एसटी यातील विचारवंतांना प्रभावीपणे मांडता आला नाही. याचा फायदा ब्राह्मण, मराठा विचारवतांच्या सहाय्याने मराठा ब्राह्मण राज्यकर्त्यांना झाला. छत्रपती शिवरायांच्या इतिहासात रमणार्या मागासवर्गीय लोकांनी, आपली फसवणूक कोण करतेय? याची माहिती युक्तीने घेतली पाहिजे. ब्राह्मण छत्रपती शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतात. तर मराठे क्षत्रिय कुळावनतस म्हणतात. ही खऱ्या रयतेच्या राजाची सांस्कृतिक चोरी आहे. छत्रपती शिवरायांनी मनुस्मृतीच्या धार्मिक हुकूमशाहीने लादलेल्या गुलामीच्या साखळ्या तोडून मागासवर्गीय रयतेला खरे स्वातंत्र्य दिले. अर्थात मनुस्मृतीच्या वैदिक धर्माने शस्त्र हाती धरण्याचे हे नाकारलेले स्वातंत्र्य, कोकणातील आगरी, कोळी, भंडारी, गाबीत, सागरपुत्र, आरमारी जातींसाठी छत्रपती शिवरायकृत, खरी मोक्ष मुक्ती देणारे अधिकार ठरले. याची माहिती जशी ओबीसींना नाही? तशी ती वर्तमान अतिशूद्र जातीतील विचारवंतांना झालीय असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

मराठा हे शूद्र आहेत, म्हणून त्यांना आरक्षण द्या, आणि ब्राह्मण गरीब आहेत म्हणून त्यांना 10 टक्के आर्थिक मागास आरक्षण ध्या. असे सांगणारे बामसेफचे वामन मेश्राम आणि भाजपचे मोदी हे विषमतावादी लोक आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध याची नेहमी वर्तमानात जगण्याची विवेकबुद्धी या लोकांमध्ये नाही. मोदींनी सांगायचे मी ओबीसी पंतप्रधान आहे. वामन मेश्राम यांनी सांगायचे मी मागासवर्गीय राष्ट्रीय नेता आहे? ही मागासवर्गीय लोकांच्या डोळ्यात वैचारिक भ्रष्टाचाराची धूळफेक आहे. छत्रपती शिवराय हे सामाजिक न्यायाचे प्रतीक विषमतावादी ब्राह्मण मराठयांच्या हाती देऊन, आम्ही ओबीसींच्या गुलामीची पायाभरणी केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आमच्या हिंदू धर्माच्या माध्यमातून मोठे भाऊ आहेत? हे हिंदुत्वाचा खोटा प्रचार करणारे असंख्य बुवा, बापू ,शाहीर, भिडे, एकबोटे हे मागासवर्गीय समाजाचे शत्रू असताना, आमची तरुणाई त्यांना गुरू मानते? हा ओबीसी विचारवनतांनचा पराभव, भिडे टिकली आंबा प्रकरणातून जगजाहीर प्रकरण झाले आहे.

छत्रपतींचे स्वराज्य आणि महापराक्रमी सागरी आरमार पेशवे ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठ्यांनी बुडविले. याचे कारणच होते की छत्रपती शिवरायांचे स्वराज्य मनुस्मृतीच्या रामायण महाभारतातील विषमतेच्या विरोधात उभे राहून वर्तमान संविधानिक समतेकडे वाटचाल करणारे स्वराज्य होते. कोकणातल्या आगरी, कोळी, भंडारी कुणबी, बारा बलुतेदार यांना छत्रपतींच्या स्वराज्यात कसायला मिळालेल्या जमिनी पेशवे ब्राह्मण मराठा यांनी आपल्या नावे केल्या. ही खोती पद्धत विषमता सांगणारी आहे. हे भारतातील सामाजिक न्यायाचे पितामह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हा ओबीसींना सांगितले. गोळवलकर, सावरकर यात कुठे दिसत नाहीत. त्याचप्रमाणे कोणताही क्षत्रिय, मराठा राज्यकर्ता कुळांची बाजू घेताना दिसत नाही. आगरी समाजाचे नारायण नागु पाटील भंडारी, समाजाचे सी के बोले हे उच्चवर्णीय जातींशी उघड वैर घेणारे ओबीसी नेते होते. ही हिम्मत आजच्या ओबीसी नेतृत्वात नाही. अशा प्रकारच्या नेतृत्वाची निर्मिती हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक देणगी आहे.

पेशवाईच्या शोषणातून आमचे गेलेले जमीन-पाणी-जंगल-शिक्षण आरक्षणाचे अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर देतात ही वास्तव स्थिती ओबीसी तरुणाईला समजविण्यात आम्ही ओबीसी नेते कमी पडत आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आर्थिक सामाजिक राजकीय समतेचे संविधान देऊन गेले. त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या अजरामर झालेल्या खोती विरोधी, मनुस्मृती दहन, चिरनेर जंगल सत्याग्रह आंदोलन यातील फिलॉसॉफी आम्ही ओबीसी विसरलो. याचा फायदा घेऊन सत्तेत आलेल्या मराठा, शेटजी, भटजी नि नव्या सरकारी माध्यमातून आमच्या शेतजमिनीवर इंडस्ट्री एमआयडीसीचे आरक्षण टाकून आमची मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथील शेती मासेमारी मिठागरे रेती हे पारंपरिक व्यवसाय संपविले.

1960 साली एमआयडीसी 1970 ला सिडको आणून ओबीसी जातींना संपविण्याचा कट 13 पेक्षा जास्त मराठा, ब्राह्मण मुख्यमंत्री, महसूल, गृहमंत्री यांनी रचला आणि यशस्वी केला. आज आगरी, कोळी, भंडारी, कराडी हे ओबीसी या मराठा ब्राह्मण युतीने भूमिहीन केलेले ओबीसी आहेत. मागासवर्गीय जातींची नोंद करणाऱ्या मागासवर्गीय आयोगावर मराठा, ब्राह्मण जातींचे वर्चस्व कोणता न्याय करणार? आज शेती जमिनी यात याच सरंजामी जातींचे वर्चस्व आहे. ऊस कारखाने सहकार क्षेत्र, राजकारण, शिक्षण यात महाराष्ट्र पूर्ण उच्चवर्णीयांच्या हाती गेलाय. सत्ता सतत ब्राह्मण, मराठा सत्ताधारी लोकांच्या हाती असणे यात कोणते पुरोगामीत्व आहे?1984 साली लोकनेते दि.बा. पाटील यांच्या सिडको विरोधी आंदोलनावर गोळ्या घालून घेतलेल्या जमिनींचे अजूनही पुनर्वसन नाही. 2005 साली गरिबांच्या घरासाठी घेतलेल्या जमिनी रिलायन्स च्या सेझला विकणारे लोक किती नालायक असतील? आज 15 वर्षे उलटून येथे एकही रोजगार नाही. उरलेल्या जमिनी मराठा, ब्राह्मण बिल्डर लॉबी आणि शिक्षण सम्राट डी वाय पाटील, पतंगराव कदम यांना विकणारे लोक पुनर्वसन विसरले?

त्यातच कोयना प्रकल्पग्रस्त मराठा लोकांना आमच्या ओबीसीच्या डोक्यावर बसवणारी मराठा मंडळी उदयन राजे यांची 40 हजार एकर जमीन सुरक्षित कशासाठी ठेवतात?

मराठा, ब्राह्मण प्रशासक राज्यकर्ते यांनी लुटून सिडकोला फस्त केले. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प पुनर्वसना साठी आज जमीन शिल्लक नाही. साडे बारा टक्के योजना पुनर्वसनासाठी जमीन सिडकोकडे नाही. म्हणून उरले सुरले निसर्ग सुंदर उरण तोडायला निघालेले हे लुटारू राज्यकर्ते आमचा गावठाण कोळीवाडा, इथला परंपरागत जमीन मालकी हक्कही मान्य करीत नसतील? तर तक्रार करायची कुठे?महाराष्ट्रातही आज अशी विषमता आहे. “सिडको” तिचे नाव असले तरी तिचा सरंजामी स्वभाव हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य महायुतीच्या मनुनीतीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठा ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ब्राह्मण),महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हा उच्चवर्णीय (मराठा) जातीयवाद मागासवर्गीय शोषित वंचित तरुणांना ज्या दिवशी समजेल? त्या दिवशी कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये ,असे शहाणपण आम्हा सर्व भारतीय स्त्री पुरुषांना यावे यासाठी ही वेदना देशासमोर ठेवतो आहे.

✒️सुलोचनापुत्र:-राजाराम पाटील(केगाव-उरण जिल्हा रायगड)मो:-8286031463