गोरगरिब बेघरांच्या लेकरांच्या शिक्षणाचेहि जरा बघाच-बाजीराव ढाकणे (बीड जिल्हा समन्वयक, लेक लाडकी अभियान)

17

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.13नोव्हेंबर):- या वर्षी आपण भारत देशाच्या स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना तरी शिक्षणापासून वंचित बालकांचा विचार करु या की या बालकांना पण शैक्षणिक प्रवाहात सामील करण्याचा संकल्प केला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा करतो.

भारत देशातील बहुसंख्य बेघर, भूमिहीन, संसाधन व संपतिव्हीन लोक उपजीवीकेसाठी भटकंती करतात व त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासुन वंचित राहतात व विकासाच्या प्रवाहापासुन दूर फेकले जातात. भटक्या जमातीच्या वस्ती, पाल , बेडा, तांडया मधील मुले नैसर्गिक रित्या कसल्याही बंधनापासून मुक्त जीवन जगतात. दोरीवरचे खेळ, मातीत खेळणे, सपासप झाडावर चढ़णे, मुक्तपणे पाण्यात पोहणे, जंगलातील फळ व मधपोळ काढणे, म्हशीच्या अंगावर बसून गाई म्हशी राखणे, डोंगरावर चढणे असा हा त्यांचा स्वछंद विहार असतो. त्यांना शाळेतील चार भिंतीच्या आत वर्ग खोल्यात अशी स्वच्छंद जगणारी मुले पाहिले की जरा आश्चर्यच वाटत असते. त्यामुळे ती तिथे रमत नाहीत. अशावेळी निसर्गाशी साधर्म्य असणारी जीवन शिक्षण पद्धती अवलंबावी लागते. गड़चिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा (अनिकेत प्रकाश आमटे) तर्फे आदिवासी मुलांसाठी तिनागुंडा येथील शाळा ही याच प्रकारातील एक. अशाच शाळा गीर गाई (लांब कानाच्या लाल गाई) राखणाऱ्या भरवाड़ समाजाच्या मुलांसाठी नागपुर जिल्ह्यात कार्यरत आहेत.

हाच धागा पकडून या मुलांच्या वसाहतीशीं संपर्क साधुन अशाच मुलांसाठी काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या सुवर्ण महोत्सवी वर्षा चा खरा आनंद वंचित दुर्बल घटकातील मुलांना विशेष प्रशिक्षण देवून त्यांच्या कलागुणांना वाव देत होवू शकतो व ह्या मुलांमधील नैसर्गिक गुणांचा विकास साधत खेळातून शिक्षणाची आवड निर्माण करता येईल “.

उस्मानाबाद, हिंगोली औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातील वस्ती, तांडा, पालातील भंगार गोळा करणारी, दोरीवरती खेळ दाखविणारी, गाई , म्हैस राखणारी इत्यादि प्रकारच्या समस्यांमुळे अशी असंख्य शाळाबाह्य मुले आपले भाग्य पारंपारिक पध्दतीने आजमावण्यात दंग असतात आणि त्यांच्या पालकांना पण या बालमनाचा विचार करायला वेळ व साधने उपलब्ध नसल्याने ती आपल्याच बरोबर या बालकांना दैनंदिन जीवनाशी निगडीत व्यावहारिक पातळीवर झगडत आपलं जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली कामे करत असतात.

हि बालके अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष असतात. त्यांच्यामध्ये नैसर्गिक खेळातील कसब, धैर्य, चपळता, क्षमताही चांगल्याप्रकारे असतात.त्यामुळे अशा मुलांना या बालदिनाच्या निमित्ताने संधी मिळणे गरजेचे आहे “यांच अपेक्षासह बालकांना बालदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा बाजीराव ढाकणे यांनी दिल्या.