महान पंतप्रधान इंदिरा गांधी

47

भारताच्या सर्वात सामर्थशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज १०५ वि जयंती. इंदिरा गांधींची भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात सामर्थ्यशाली आणि महत्वपुर्ण नेत्यांमध्ये गणना होते. १९ नोव्हेंबर १९१७ रोजी त्यांचा जन्म झाला. इंदिरा गांधी यांना इंदिरा हे नाव आजी आजोबांकडून मिळाले. पण लहानपणी सर्वजण त्यांना प्रियदर्शनी म्हणून बोलवायचे. आई कमला नेहरु आणि वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांना देशप्रेमाचे बाळकडू मिळाले. लहानपणीच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले. कारण त्यांचे पूर्ण कुटुंबच स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी होते. लहानपणापासूनच स्वदेश आणि स्वदेशी याविषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण झाले. अगदी लहान असतानाच त्यांनी विदेशी खेळणी व कपड्यांची होळी केली होती. एका पाहुण्यांनी त्यांच्यासाठी विदेशातून आणलेला किंमती फ्रॉक परिधान करण्यास त्यांनी नकार दिला होता.

आजोबा मोतीलाल नेहरू व वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांचे देश स्वातंत्र्य करण्यासाठी चालू असलेले आंदोलने पाहून आपणही या आंदोलनात सहभागी व्हावे असे त्यांना वाटे. वयाच्या अवघ्या १३ वर्षी म्हणजे सण १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांसह वानरसेना नावाची संघटना स्थापन केली आणि नेत्यांचे संदेश पोहचवण्याचे काम केले. इंग्रजांविरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषणा दिल्या. त्यांचे सुरवातीचे शिक्षण अलाहाबाद, पुणे इथे झाले पुढे त्या रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन येथे शिक्षण घेण्यासाठी गेल्या. तिथे त्यांनी शिक्षणासोबत विविध कलाही आत्मसात केल्या. वडील पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याचा आंदोलनात अग्रणी असल्याने बऱ्याच वेळा ते तुरुंगातच असायचे अशा वेळी इंदिरा याच आई कमला नेहरू यांची काळजी घ्यायच्या. १८ फेब्रुवारी १९३६ रोजी कमला नेहरू यांचे निधन झाले तेंव्हा त्यांना खूप दुःख झाले. या दुःखातून सावरण्यासाठी वडील पंडित नेहरू यांनी त्यांना विदेशात शिकण्यासाठी पाठवले. विदेशातून शिक्षण पूर्ण करुन आल्यावर २६ फेब्रुवारी १९४२ रोजी फिरोज गांधी या उमद्या व देखण्या तरुणाशी त्यांनी विवाह केला.

विवाहानंतर फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्याचा चळवळीत भाग घेतला. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या संसारात रमल्या. राजीव आणि संजीव या दोन मुलांच्या पालनपोषणातच त्यांचा वेळ जाऊ लागला. पुढे त्या काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. १९५९ साली त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. यावेळी त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी खूप काम केले. १९६० साली पती फिरोज गांधी तसेच १९६४ साली वडील पंडित नेहरू यांचे निधन झाले तरी त्या खचल्या नाहीत. कठीण परिस्थितीतही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. लाल बहाद्दूर शास्त्री यांनी त्यांना मंत्रिमंडळात माहिती प्रसारण आणि नभोवाणी खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी दिली त्यांनी ती लीलया पेलली. लाल बहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर २४ जानेवारी १९६६ रोजी त्या देशाच्या पंतप्रधान बनल्या. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली पण त्यावेळी देशाची परिस्थिती खूप बिकट होती.भारत पाकिस्तानचे युद्ध झाले होते. देशात मोठा दुष्काळ पडला होता.

अन्नविषयक मदतीचा पी एल ४८० कराराचे नूतनीकरण करण्यास अमेरिकेने नकार दिला होता. या आर्थिक परिस्थितीतुन मार्ग काढत असतानाच १९६७ सलची निवडणूक आली अनेक राज्यात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. लोकसभेत काँग्रेसचे संख्याबळ घटले. त्यामुळे पक्षातील सिंडिकेट नेत्यांनी उचल खाल्ली. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपल्या इच्छेप्रमाणे कारभार करावा असे त्यांना वाटत होते. त्यामुळे इंदिरा गांधी आणि त्यांच्यात वाद होऊ लागले त्यातूनच काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. जेष्ठांची सिंडिकेट विरुद्ध तरुणांची इंडिकेट असा उभा संघर्ष झाला. काँग्रेसमधील तरुण नेत्यांनी इंदिरा गांधी यांना साथ दिली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी सिंडिकेटचे उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव करुन व्ही व्ही गिरी यांना राष्ट्रपती बनवले. सिंडिकेटचा दारुण पराभव झाल्याने इंदिरा गांधी सामर्थ्यवान बनल्या.

मंत्रिमंडळात त्यांनी बदल केले. उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडील अर्थखाते त्यांनी स्वतःकडे घेऊन मोरारजी देसाई यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे, संस्थांनीकांचे तनखे रद्द करणे असे निर्णय घेऊन त्यांनी खळबळ उडवून टाकली त्यांच्या या धाडसी निर्णयाला अनेकांनी विरोध केला पण आपल्या निर्णयापासून त्या तसूभरही मागे हटल्या नाही. १९७१ साली झालेल्या मुदतपूर्व निवडणुका त्यांनी एकहाती जिंकल्या. यानिवडणुकीत त्यांनी गरिबी हटाव ही घोषणा दिली. त्यांची ही घोषणा खुप गाजली. गोरगरिबांनी त्यांना भरभरुन मते दिली. याचवेळी पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला. पूर्व पाकिस्तानातून एक कोटी निर्वासित भारतात आले. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडला. पूर्व पाकिस्तानला भारत मदत करीत आहे म्हणून पश्चिम पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले.

अमेरिकेने भारताला धमकी देत त्यांचे सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवले पण त्या घाबरल्या नाहीत त्यांनी जनतेला आणि सैनिकांना विश्वास दिला या विश्वासाच्या जोरावरच भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आणि बांगलादेश नावाचे नवे राष्ट्र उदयास आणले. पाकिस्तानचे एक कोटी सैनिक भारताला शरण आले. यावेळी त्यांनी दाखवलेल्या धाडसाची आणि नेतृत्वगुणाची जगाने दखल घेतली. जागतिक राजकारणातील एक सामर्थ्यशाली नेत्या म्हणून त्या उदयास आल्या. देशातही त्यांची लोकप्रियता शिखरास पोहचली. विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गेची उपमा दिली. १९७५ साली त्यांनी सिक्कीमचे भारतात विलीनीकरण केले तर १९७६ साली अणुस्फोट करुन देशाला अणुऊर्जेत स्वयंपूर्ण बनवले. २६ जून १९७५ रोजी त्यांनी देशावर लादलेली आणीबाणी मात्र लोकांना रुचली नाही त्यामुळे १९७७ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण तीन वर्षाने १९८० साली त्या बहुमताने विजयी झाल्या. १९८४ साली पंजाबमधील पवित्र सुवर्ण मंदिरात खलिस्तानवादी अतिरेकी ठाण मांडून बसले होते.

देशाची दुसरी फाळणी करुन स्वतंत्र खलिस्तान देश निर्माण करणे ही त्यांची मागणी होती त्यांचा जर लवकर बिमोड केला नाही तर देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला मोठा धोका आहे हे ओळखून या अतिरेक्यांना सुवर्ण मंदिरातून हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय घेऊ नये असा सल्ला त्यांना अनेकांनी दिला या मोहिमेमुळे अतिरेकी त्यांचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत असा सल्ला त्यांना अनेकांनी दिला पण देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी हा निर्णय घेतला. सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम राबवून अतिरेक्यांना बाहेर काढण्यात आले. अनेक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. भिंद्रनवाले हा अतिरेकी या कारवाईत मारला गेला. या मोहिमेने दुखावलेल्या त्यांच्या अंग रक्षकानींच ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात त्यांचा दुःखद अंत झाला. त्यांच्या मृत्यूने भारतातच नव्हे जगात शोककळा पसरली. देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या इंदिरा गांधी यांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली!

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५