लोकसहभागातून मांडवा स्मशानभूमी केली सोयी सुविधा पूर्ण

40

✒️बळवंत मनकर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19नोव्हेंबर):-पासून ९ कि.मी.अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी खडकाळ जमिनीवर वसलेले मांडवा गाव गावाच्या स्मशानभूमी दहनशेडवरील टिनपत्रे कुजलेले, सोयी सुविधांचा अभाव शेवटचा निरोप देण्यासाठी आलेले ग्रामस्थ त्रस्त, गावातील समस्या निकाली काढण्यासाठी बाळासाहेब ढोले यांनी गावासंबधीत कर्मचारी मंडळी ,तरुणमंडळी ,प्रतिष्ठित नागरिक ,गावातील कर्मचारी मंडळी यांचा ग्राम परिवर्तन समिती व्हाट्सअप ग्रुप अडीच वर्षांपूर्वी तयार केला. गावातील स्मशानभूमीचा प्रश्न पोटतिडकीने मांडला. वेळोवेळी मदतीचे आवाहने केली. देणगी मिळु लागली. दहनशेडवरील टिनपत्रे फुटलेली होती.

तेव्हा गोपाल मंदाडे यांनी पाच टिनपत्रे दान दिली.सिंमेट दहनशेड मिळावे म्हणून ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. व माजी जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे यांच्या निधीतुन २०१९-२० जनसुविधा योजने अंतर्गत ५ लाख रुपयांचे दहनशेड मिळाले.संत, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी याचे औचित्य साधून ,तसेच एक तर झाड लावून वाढदिवस साजरा करावा असे उपक्रम राबवुन महाराष्ट्र गवळी समाज संघटना शाखा मांडवा, दुर्गा महिला ग्रामसंघ ,संत सेवालाल जयंती उत्सव समिती, माविम महिला समुह,ग्रामपंचायत मांडवा,तसेच असंख्य वृक्षप्रेमीने ४०० झाडे लोकसहभागातून लावले. या झाडांचे संवर्धन व संगोपन कैलास राठोड निस्वार्थपणे करित आहेत.व ही खडकाळ जमीन हिरवीगार करण्याचा चंग बांधला आहे.

या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरिल कमान किराणा दुकानात काम करणारे अंकुश राठोड यांनी आईच्या तेरवीचा खर्च टाळुन दिली. ग्रामस्थांची मेहनत व जिद्द आणि पारदर्शक कार्य पाहून स्व.पांडुरंग गादेवार यांचे पुत्र अशोक,बालाजी, गजानन, संतोष यांनी भगवान श्री शंकराची बैठक अवस्थेत ६ फुटाची सुंदर व रेखीव मुर्ती दान दिली.या मुर्तीच्या पहाडाकरिता शेकडो दात्यांनी देणगीचे सहकार्य केले. मांडवा व काकडदाती परिसरातील वीटभट्टीवाल्यांनी ३३५४ विटादान दिल्या. मुर्तीवर रोषणाई व कारंजेसाठी दात्यांनी सहकार्य केले. १२ हजार ५०० रुपयांचे स्ट्रेचर बनविण्यासाठी ग्रामसेवक एस.टी.तडसे, उपसरपंच विजय राठोड, रमेश ढोले, गजानन आबाळे यांनी सहकार्य केले. शांताबाई गादेवार यांच्या स्मृतिप्रत्यर्थ स्मशानभूमीत विसावा ओट्याला ग्रिनाईट बसवण्यात आला. तर प्रकाश धाड यांनी स्मशानभूमी प्रकाशमय केली.

कृष्णा पुलाते यांनी पाण्याची व्यवस्था केली.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ, दिलीप आडे, बजरंग पुलाते, लाईनमेन सुरेश आडे,यांनी प्रत्येकी एक असे ४ सिंमेट बेंच दान दिली.तसेच माजी जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे यांनी २सिंमेट बेंच भेट दिली.निवारा शेडसाठी कृषिभूषण दिपकभाऊ आशेगावकर, ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे, दुर्गा ग्रामसंघ मांडवा, साहेबराव चव्हाण, विजय तिपाले पुसद,हरिभाऊ आबाळे,पोस्टमेन गजानन पांढरे, भगवान डोळस,पोस्टमेन शिवराज टिकोरे,ठेकेदार गोपाल पवार, यांनी आर्थिक हातभार लावला.गावातील युवकांच्या सकारात्मक दृष्टिकोन व इच्छाशक्ती आणि सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग तसेच दात्यांमुळे स्मशानभूमीचा कायापालट झाला.