१० वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत चित्रपट कलावंत-तक्रारदारालाच आरोपीला शोधण्यास पोलिसांनी सांगितले!

27

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मराठीतील नामवंत कलावंत मागील तब्बल १० वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत न्यायालयाने पोलिसांना आरोपीला पकडण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर वॉरंटही काढले, मात्र पोलिस व आरोपी यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच आरोपी मोकाट फिरत आहेत व पोलीस मात्र तक्रारदार कलावंतालाच आरोपीला दाखवण्यास सांगत आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली आहे.

दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. त्यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद नलावडे यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. ज्युनिअर दादा कोंडके म्हणून ते नावरूपाला आले. त्यांनी आतापर्यंत तब्बल २० हून अधिक चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.

नलावडे यांनी २०१० साली ‘मी हायना तुमच्यासाठी’ ( Mee Hayana Tumchyasathi ) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’चे हक्क सत्यम व्हिडीओ एंटरटेनमेंट या कंपनीने घेतले. या कंपनीचे मालक नंदकुमार गणपत विचारे यांनी या हक्काचे मानधन म्हणून नलावडे यांना चार धनादेश दिले. यातील आगाऊ रकमेचा चेक पास झाला. उरलेले तिन्ही चेक खात्यात बॅलन्स रक्कम नसल्यामुळे बाऊन्स झाले.

यानंतर नलावडे यांनी २०१३ साली बांद्रा कोर्टात धाव घेतली. कोर्टाने आरोपी विचारे यांना अनेक वेळेला नोटीस बजावल्या. त्यानंतर अटक वॉरंटही बजावले. मात्र वर्सोवा पोलिस आरोपीला पकडण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे स्पष्ट दिसून येते. नलावडे यांनी आरोपी विचारे याचे घर, ऑफिसचा पत्ता, बँक डिटेल्स व इतरही यासंबंधित इत्यंभूत माहितीही दिली. मात्र हा आरोपी त्या पत्यावर असूनदेखील पोलिसांना सापडत नाही, याबाबत नलावडे यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

वर्सोवा पोलिसांना हा आरोपी मिळत नाही, म्हणून नलावडे यांनी मुंबई पोलीस कमिशनर यांच्याकडेही १९ जुलै २०१७ साली लेखी तक्रार केली होती. मात्र त्याची अद्यापही दाखल घेतलेली नाही. आजमितीस नलावडे या ज्येष्ठ कलावंताचे वय ७४ वर्षे आहे. न्यायासाठी ते मागील १० वर्षांपासून झगडत आहेत. मात्र अद्यापही आरोपी मोकाट फिरत असल्याने ते अधिकच चिंताग्रस्त आहेत.