आत्मविश्वास हेच मोठे सामर्थ्य!

63

जातीवाचक,धर्मवाचक संघटना,पक्षाला मर्यादा पडतात.जसे मुस्लीम लीग,एमआयएम,मुलनिवासी, ओबीसी, सैनिक, पोलिस,बामसेफ या नावाने स्थापन संघटना व पक्षाला मर्यादा पडतात .या संघटना एका समुदायापुरते किंवा पदापुरते काम करीत आहेत. त्याला सर्वसमावेशक स्वरूप येत नाही.जर सैनिक समाज पार्टी, पोलिस समाज पार्टी, रेल्वे कर्मचारी पार्टी, महसूल कर्मचारी पार्टी असे नाव दिले तर संघटना किंवा पक्ष मर्यादित होतो.महाराष्ट्रात मराठा समाज मोठा आहे.तरीही मराठा नावाने काढलेल्या संघटना संकुचित आहेत.त्या मोठ्या होत नाहीत.कारण जातीवाचक मर्यादा पडतात. या नावाने संघटना ठिक आहेत, पण राजकीय पक्ष ठिक नाही.कारण संघटना मर्यादित लोकांच्या हितासाठी काम करते.पक्ष हा व्यापक हितासाठी काम करतो.संघटनेला जनमतांची गरज नसते.पक्षाला जनमतांची गरज असते.

एकाच सर्व्हिस कैटेगरीचे लोक सर्वच कैटेगरी, जाती जमाती ,सर्वच विचारधारा असेलल्या लोकांसाठी नेतृत्व करीत नसतात.पोलिस हा सैनिकाचे हिताचे काम करीत नाही.बॅकवर्ड संघटना या फॉरवर्ड जमातींचे नेतृत्व करीत नाहीत. फारवर्ड संघटना बॅकवर्ड जमातींचे नेतृत्व करीत नाहीत.गांधीजी गुजराती जैन होते.पण गुजराती किंवा जैनांचे नेते बनले नाहीत.फडणवीस ब्राह्मण आहेत पण फक्त ब्राह्मणांचे नेतृत्व करीत नाहीत.राजकारणात  भुमिका घ्यावी लागते.संकुचित नाही.

अनेक संघटनेतील, पार्टीतील काही पदाधिकारी जातीच्या चौकटीत काम करतात.जातीच्या संघटनेत पदे उपभोगतात.जातीचे वर्तुळ ओलांडून जात नाहीत.जातीच्या चुकांच्या विरोधात बोलत नाहीत.तर मग इतर जातींतील लोक अशा लोकांना नेते मानत नाहीत.भेटायला येतील, शुभेच्छा देतील,जेवणाला येतील,भाषणाला येतील पण वैचारिक नाळ जुडत नाही.मताची नाळ जुडत नाहीत.उरते फक्त औपचारिकता.हाय हैलो करणे,गोड गोड बोलणे, नमस्कार चमत्कार करणे, शुभेच्छा देणे इतकेच करतात.यातून ओळख होते पण मैत्री होत नाही.नाळ जुडत नाही.जशी ठाकरे आणि राऊत यांच्यात आहे.जशी मोदी आणि शहा यांच्यात आहे.

अनेकदा एकाच पक्षातील काही पदाधिकारी वेगळ्याच हेतूने काम करतात.सोबत असले तरीही धोरण,दिशा , विचार, अपेक्षा वेगळीच असली तर ती सुद्धा इतरांना लक्षात आली कि संघटनेत तडे पडतात.किमान ध्येय,धोरण,दिशा तरी एक हवी.इतरांची नाही किमान पदाधिकारीची तरी असावी.कोणी सोबत नसले तरीही मी याच ध्येयाने,याच धोरणाने,याच दिशेने काम करीन.तसेच केले पाहिजे.त्याच ध्येयाने प्रेरीत,तेच धोरण पसंत करणारे,त्याच दिशेने जातात.आपोआप नेत्याला जाऊन मिळतात.पण नेत्यांची किंवा पदाधिकारीचे ध्येय,धोरण,दिशा संशयास्पद असेल , दृढ नसेल तर मित्र संभ्रमात पडतात.

एक माजी सैनिक लोकसभा निवडणूक लढतांना एकही माजी सैनिक सोबत आला नाही.म्हणे आमचे तिकडच्या उमेदवाराशी जवळचे संबंध आहेत.आपल्याच कैटेगिरीच्या माणसाशी निष्ठा नसलेली माणसे विश्वासपात्र नसतात.तर इतर कैटेगिरीशी कशी निष्ठा ठेवतील? विचारांची चर्चा असेल,आंदोलनाची तयारी असेल तेंव्हा स्वताहून आलेली माणसे विश्वासपात्र असतात.कारण ध्येय,धोरण,दिशा ,विचारांनी ते आकर्षित झाले पाहिजे.

मा.आण्णा हजारे हे सामान्य सैनिक होते.पण त्यांचे ध्येय, धोरण,दिशा ठाम होती,आहे.मी याच मार्गाने जाईन, कोणाला आवडले तर येतील सोबत.हाच आत्मविश्वास अण्णांचे मोठे सामर्थ्य आहे.तुम्हाला नाही आवडले तर तो तुमचा दोष,पण मला आवडले म्हणून मी करतो,हा माझा गुण.हिच भुमिका नेत्यांच्या अंगी असावी.मी एकटा उरलो तरी चालेल पण माझ्या भुमिकेशी ठाम राहिले पाहिजे.तुम्ही पळून गेले तरी चालेल पण मी लढत राहिन ही वीर तानाजी मालुसरे यांची भुमिका गड जिंकून देते.मावळे तर पळाले.आपण निघा येथून .अशी भुमिका तानाजी मालुसरे यांनी घेतली असती तर ,गड जिंकता आला नसता.स्वराज्य उभे राहिले नसते.

एखादा कार्यक्रम घेतांना आम्ही मित्रांना बोलवतो.ते तिकडून विचारतात.किती लोक आलेत? जास्त जमले तर मला फोन करा.मी येतो.अशी सावध भुमिका असलेली माणसांना आत्मविश्वास नसतो.ते गर्दी पाहून वर्दी लावतात.अनेकदा आमदार खासदार मंत्री कार्यक्रमाचे आमंत्रण स्विकारतात.एक चमचा त्या ठिकाणी उभा ठेवतात.गर्दी जमली तर मला फोन कर.मी येतो.गर्दी नसेल तर सांग, साहेबांना दुसरीकडे अर्जंट काम निघाले.

मी जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी केली.विरोधात मोठा बिल्डर होता.दहशत होती.मी ठामपणे उभा राहिलो.माझ्या सहकाऱ्याने मला त्या उमेदवार कडे नेण्याचा आग्रह केला.मी नाकारले.लढू आमनेसामने.शेवटी तोच उमेदवार मला येऊन भेटला.तो सहकारी माझ्या सोबतच होता.उमेदवार म्हणाला, चला आपल्याकडे.मी नाकारले.म्हटले,आपण येथेच लोकांसमोर चर्चा करू.तुमचे म्हणणे तुम्ही मांडा.माझे म्हणणे मी मांडतो.लोक ऐकतील.पाहातील.त्यांनी तसे करणे नाकारले.

मी गरीब माणूस निवडणूक लढली.लोकांनी सल्ला दिला कि,काका,ते एका मतांचे पांचशे रूपये देत आहेत तर आपण शंभर दोनशे तरी द्या.मी जाहिर पणे माईकवर सांगितले कि,ज्या मतदाराला माझ्या कडून चहाची ,पैशांची अपेक्षा असेल त्याने कृपा करून मला मत देऊ नका.तुमच्या नासलेल्या मतामुळे मी नाशीवंत होऊ शकतो.नासलेले मत नासलेल्या उमेदवाराला द्या.तो मतांचे वीस लाख खर्च करून निवडून आला तर एक कोटी महानगरपालिकेतून कमवू शकतो.मला ते आवडत नाही,जमत नाही.फुकट मत द्यायचे असेल तर द्या.मी रस्ते पाणी गटार वीज आरोग्य स्वच्छता शिक्षण घरपट्टी यासाठी उमेदवारी करीत आहे.मी पैसा कमवणार नाही,पैसा वाटणार नाही.

मी माझ्या ध्येय,धोरणांशी प्रामाणिक राहून त्याच दिशेने वाटचाल करीत आहे.मला अनेकदा सुचवले जाते कि , राजकारणात पैसा लागतो.पण मी मान्य करीत नाही.ज्याला तसे वाटते त्यांनी तसे करावे .पण मला आवडत नाही,जमत नाही.तसा प्रयत्न करणार ही नाही.कारण राजकारण हा पैसा गमावणे आणि कमावण्याचा धंदा नाही.हे सार्वजनिक, वैधानिक सेवेचे क्षेत्र आहे.सेवेच्या क्षेत्रातून पैसा कमवणारी माणसे समाजघातकी,धर्मघातकी,राजघातकी असतात.ते आप्तघातकी व आत्मघातकी सुद्धा असतात.असा माझा समज आहे.श्रीमंत माणूस दिसला कि जनता त्याच्यामागे धावते.कालच सुरेश जैन यांना घरकूल घोटाळा प्रकरणातून दहा वर्षांनंतर जामीन मिळाला.जळगाव मधील राजकीय चेहऱ्यांनी फटाके फोडले.आनंद उत्सव साजरा केला.याच लोकांच्या हाती जळगाव महापालिका आहे‌.या आणि जळगाव चे रस्ते पहा.या राजकीय चेहऱ्यांचे ध्येय धोरण,दिशा कळेल.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव