नवीन पिढी सक्षम घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची- आमदार बाळासाहेब पाटील

29

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.2डिसेंबर):- शिक्षण हा सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू आहे  परंतु शिक्षक भरती न झाल्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवरती अतिरिक्त ताण येतो आहे. ज्ञानदानाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आहे, ही परिस्थिती कोणत्या एका संस्थेची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था व शिक्षक भरती प्रक्रिया याबद्दल आपल्या मनोगतातून संस्थेचे चेअरमन मा.ना.श्री बाळासाहेब पाटील यांनी खंत व्यक्त केली. भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात त्यामुळे सर्व शाळा कॉलेजमध्ये पुरेशी शिक्षक संख्या असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी वेणूताई चव्हाण कॉलेजमधील वाणिज्यविभागाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका सौ. वनिता भादुले यांच्या सेवानिवृत्ती व शुभेच्छा समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

      या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. प्रकाश पांडुरंग पाटील हे सुद्धा उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, “शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असतो. तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असतो. मॅडमना अनेक हुशार व अभ्यासू विद्यार्थी घडवण्याचे भाग्य लाभले आहे. शिक्षकांनी हुशार व होतकरू विद्यार्थी घडवावे अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, की मॅडमचे कुटुंब हे सामाजिक कार्यात सुद्धा उत्साहाने भाग घेत असते. सेवानिवृत्तीच्या माध्यमातून व्यक्तीच्या कार्याचा परिचय व्हावा व त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून सेवानिवृत्ती सत्कार समारंभ घेतले जातात.”

      सत्कारमूर्ती प्रा. सौ. वनिता भादुले सत्काराला प्रत्युत्तर देताना म्हणाल्या, “माझे विद्यार्थी माझी संपत्ती व प्रेरणास्थान आहेत. माझ्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले हीच माझी मोठी संपत्ती आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कायम ऋणात राहीन. विद्यार्थ्यांमुळे मी माझं व्यक्तिमत्व सुंदर करू शकले. संस्थेचे चेअरमन मा.ना. श्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे सेक्रेटरी व शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य, मा. श्री. प्रकाश पांडुरंग पाटील, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सेवक, कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या संस्थेत सेवा करण्याचे आणि आज मा. प्रकाश पांडुरंग पाटील यांच्या पत्नी सौ. प्रीती प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते माझा सत्कार होणे हे मी माझे भाग्य समजते.”

            महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना म्हणाले की, “भादुले मॅडम या विद्यार्थीप्रिय, प्रामाणिक शिक्षिका आहेत. एक उत्तम पत्नी, आई, शिक्षिका म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पडली आहे, तसेच त्यांनी इतर कलागुण सुद्धा जोपासले आहेत.” या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. प्रीती प्रकाश पाटील व श्री प्रकाश पांडुरंग पाटील या उभयतांच्या हस्ते श्री व सौ भादुले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. श्रीमती आर. एस. पाटील, प्रा. सौ. पी. एस. सादिगले, डॉ. श्रीमती एम.ए. शिंदे, श्री एम. एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर प्रा.सौ. एस. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि उपप्राचार्य प्रा. श्री. आर. ए. कांबळे यांनी आभार व्यक्त केले.या सत्कार समारंभास महाविद्यालयातील माजी प्राचार्य बी. एन. कालेकर, श्री. अंकुश जगताप, श्री हरी डावरे, प्रा. एस. व्ही. जोशी, आजी-माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नातेवाईक, मित्रमंडळी, माजी विद्यार्थी, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

https://www.purogamiekta.in/2022/11/28/56068/

२९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आणि पितृभाषा