चंद्रपूर जिल्‍हयात गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्‍कासनाच्‍या कार्यवाहीला स्‍थगिती

32

🔹जिल्‍हाधिका-यांनी सर्व तहसिलदारांना दिले आदेश

🔸गायरान जमीनीवरील अतिक्रमणे नियमनुकूल होतील – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14डिसेंबर):-जिल्‍हयातील गायरान जमीनीवरील अतिक्रमण निष्‍कासनाच्‍या कार्यवाहीला जिल्‍हाधिकारी विनय गौडा जी.सी. चंद्रपूर यांनी स्‍थगिती दिली असून तत्‍सबंधाने त्‍यांनी दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी सर्व तहसिलदारांना लेखी पत्रद्वारे सुचना दिल्‍या आहेत. गायरान जमीनीवरील कृती आराखडयानुसार निष्‍कासन करण्‍याची सुरु असलेली कार्यवाही स्‍थगित करण्‍याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले होते. मंत्री मंडळ बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे लक्ष वेधले होते. या संबंधी गायरान जमीनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्‍याबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असल्‍याचे मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले होते.

या संदर्भात उच्‍च न्‍यायालय मुंबई यांनी अतिक्रमण निष्‍कासन करण्‍याच्‍या कार्यवाही संदर्भात पुढील आदेश होईपर्यंत निष्‍कासन करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येवु नये असे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यानुसार जिल्‍हाधिका-यांनी सर्व तहसिलदारांना अतिक्रमण निष्‍कासनाच्‍या कार्यवाहीला स्‍थगिती देण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत.

यामुळे चंद्रपूर जिल्‍हयातील संबंधीत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गायरान जमीनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल होतील व नागरिकांना योग्‍य न्‍याय मिळेल असा विश्‍वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे स्वागत केले आहे.