शाही फेक आणि बरेच काही…….

26

सन्मानिय चंपाजींच्या तोंडावर मनोज गरबडे या समता चळवळीतील कार्यकर्त्याने शाई फेकून महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भिकाऱ्यांच्या रांगेत बसवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त केला. तर छत्रपती शिवाजी महाराजां संदर्भात भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी, भगत सिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावर महाराजांचे तेरावे वंशज दबंग पर्सनॅलिटीचे ऊदयन राजे भोसले भर पत्रकार परिषदेत अश्रू ढाळत बसले. रडू नका लढाचा संदेश दलित चळवळीने दिला.

शाई फेकणाऱ्याने अनाहूत पणे शाही फेकली नि अकरा पोलीस कर्मचारी कारण नसता शहीद झाले. सन्मानिय चंपाजींनी प्रसार माध्यमांपुढे त्यांचेवर दया दाखविली,आपण कोत्या मनाचे नसून मोठ्या मनाचे आहोत हे सिध्द करायचा प्रयत्न केला पण, ग्रुहमंत्र्यांना ते मान्य नसल्याने कार्यवाही झाली, राजकारणाचे संदोपसुंदीत त्या अकरा पोलीसांना निलंबनत्व प्राप्त झाले. लवकरच ते रुजू होतील हा भाग वेगळा. चं पां चा रोष मात्र ज्या कोणा पत्रकाराने शाहीफेकीचा प्रसंग चित्रीत केला त्या श्री गोविंद वाकडे या टी व्ही 9च्या वार्तांकन करणार्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चंद्रकांत पाटील यांनी क्षमेस पात्र ठरविलेल्या मनोज गरबडेवर आर्म एक्ट, जिवेमारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, फसवणूक अश्या जवळपास बारा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित केसचेच बारा वाजविण्याचे काम पोलिसांनी केले आहे. पत्रकारीता बाळ शास्री जांभेकरां सारखी आदर्शवत असली पाहिजे असा डोज त्यांनी तमाम पत्रकार बांधवांना पाजला. अशी आदर्शवत पत्रकारीता विद्यमान मोदी सरकारला किती घातक ठरु शकते याची जाणीव भाबड्या चंद्रकांत पाटलांना नसावी.

शाई हा विषय जीवनातुन बाद होऊन चार साडेचार दशके झालेली, प्राथमिक शाळेत असताना टाक दऊत असायची, टाकाने लिहिले म्हणजे अक्षराला वळण लागते, असा गुरुजनांचा समज होता, गुरुजींचा चांगल्या हस्ताक्षरांवर भर असायचा. अक्षर वळणदार आले नाही की गुरूजनांचे हाथ व आमची पाठ यांचा सामना व्हायचा, शेवटी गुरुजी थकले.

दौतीची कुपी बसक्या आकाराची त्यात टाक डुबवने व्यवस्थित झटकने व नंतर लिहिने, लिहितांना थेंब वहीवर पडायचे त्यावर खडु ठेवला म्हणजे ठिपका कोरडा व्हायचा नाहीतर पसरायचा, शिक्षकांनी फेकलेले खडूचे तुकडे मिळवायची स्पर्धा लागायची. पुढे पेन आले पण शाई होतीच, पाच सहाजण पेन मध्ये शाई भरण्यासाठी जायचे, दुकानदाराला ईतर गिऱ्हाईक असायचे त्यामुळे तो शाहीची पिचकारी एका कडे द्यायचा, ती घेतली की आडोशाला असलेले ईतरही फुकटात शाई भरून घ्यायचे. बरेचदा पेन गळायचे, शर्टाचा खिसा तर नेहमीच निळा असायचा, पेन पुसताना बोटाला लागलेली शाई चेहऱ्यावर पसरायची. नवीन पेन, त्याची निप, शाई,शाईची दऊत अभ्यासा पेक्षाही ऊत्सुकतेचा विषय असायचा काळाच्या ओघात दऊत, टाक, बॉलपेन कालबाह्य झाले. गुरुचे शिक्षक,नि शिक्षकांचे मास्तर झाले, मास्तरांची, क्या चल है सर म्हणून चौकशी करणारे विद्यार्थी आणि त्यांना हसून दाद देणारे मास्तर बघितले तेंव्हा, गुरुजी रस्त्याने चाललेकी रस्ता सानसुन व्हायचा ते दिवस आठवतात.

विद्यार्थ्यांचे पालक गुरुजनां पुढे नतमस्तक व्हायचे. वार ठरवून विद्यादानाचे कार्य करणारे गुरुजन, धर्म पत्नीचे सोने गहाण टाकून बहुजनांच्या शिक्षणाची सोय करणारे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, खस्ता खाऊन शिक्षण संस्था ऊभारणारे कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचा ऊपयोग फक्त मतदानाचे वेळी करणाऱ्या ऊपयुक्ततावादी पुढाऱ्याना हे महात्मे कितपत समजले हाच खरा संशोधनाचा विषय आहे.

✒️सतीष देशमुख(पणज,तालुका अकोट,जिल्हा अकोला)मो:-9604912351