मतदान केंद्रामधील गोंधळ थांबवण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक

30

🔹याप्रकरणी वीसहुन अधिक जणांवर गुन्हा दाखल

🔸गेवराई तालुक्यातील केकतपांगरी तांड्यावरील येथील घटना
___________________________

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.19डिसेंबर):-सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुका शांतेत पार पडत असतानाच मात्र गेवराई तालुक्यातील केकतपांगरी तांड्यावरील ग्रामपंचायत निवडणूकीला गालबोट लागले आहे. कारण मतदान केंद्रातला गोंधळ रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. ज्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, याप्रकरणी वीसहुन अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींचा शोध घेऊन पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील केकत पांगरी तांड्यावर मतदान सुरू असताना अचानक ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यामुळे काही काळ मतदान केंद्रामध्ये गोंधळ झाला. या गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांचा एक पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र घटनास्थळी आलेल्या पोलिसांकडून गोंधळ रोखण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असतानाच, या पोलिसांवर काही लोकांनी दगडफेक केली. यामध्ये गेवराई पोलीस ठाण्याचे सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर बीडमध्ये उपचार सुरू असून, याप्रकरणी पहाटे वीसहून अधिक लोकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडफेक करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड…

गेवराई तालुक्यातला केकत पांगरी गावात अचानक ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यामुळे साडेपाच वाजल्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती. याच वेळी मतदान केंद्रात गोंधळ सुरू होता आणि हाच गोंधळ रोखण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र पोलिसांवरच काही लोकांनी दगडफेक केली आणि यामध्ये पोलीस जखमी झाले आहेत. त्यामुळे सद्या घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या लोकांची धरपकड पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेनंतर गावात काही वेळेसाठी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र सद्या गावात शांतता आहे.