पैलवानांची रशियासाठी निवड

25

✒️प्रतिनिधी पंढरपूर(अमोल कुलकर्णी)

पंढरपूर(दि.19डिसेंबर):-तालुक्यातील पळशी,कोर्टी या गावातील दोन कुस्तीगीर पैलवानांची रशिया येथे निवड झाली आहे.राष्ट्रीय स्तरावर जम्मू काश्मीर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत गणेश बोडरे(पळशी)शंभर किलो वजनी गटात तर स्वप्नील येडगे(कोर्टी) चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात दोघांचाही दुसरा क्रमांक आला आहे.हनुमान विद्यालय सुपली या प्रशालेचा गणेश बोडरे हा माजी विद्यार्थी असल्याने त्याच्या समवेत स्वप्नील येडगे चा ही प्रशालेत सत्कार करण्यात आला.पैलवान गणेश याने कुस्तीमध्ये असणाऱ्या स्पर्धा आणि सराव यावर अनौपचारिक माहिती दिली.

त्यावेळी पालक शहाजी बोडरे यांनी त्यासाठी घेत असलेल्या कष्टाची माहिती दिली.सदर आंतराष्ट्रीय स्पर्धा ह्या येत्या जून महिन्यात रशिया येथे होत आहेत.पैलवानांना प्रथमतः देशाबाहेर आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करावा लागणार असल्याने घ्यावयाची दक्षता,भाषा,पर्यटन याबाबत आपल्या प्रास्ताविकात अमोल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अशोक यलमर यांनी मुलांची जिद्द आणि कौशल्य यावर अन्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर विद्यार्थ्यांना वस्ताद प्रणित भोसले,महादेव कुसुमडे,संतोष गलांडे आदींचे डावपेच कामी येत आहेत.यांच्या निवडीचे कौतुक पंढरपूर तालुका तसेच पळशी-सुपली,कोर्टी आदी भागातून होत आहे.सदर विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काही सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था,दानशूर व्यक्ती आदींनी सहकार्य करावे अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि पालक वर्गातून होत आहे.कार्यक्रम स्थळी हनुमान विद्यालय सुपलीचे विलास पाटील,आयुब मुलाणी,ज्ञानेश्वर उत्पात,नामदेव लवटे,हणमंत यलमर,शंकर भिसे,संतोष वेदपाठक,लता कोळवले,कांतीलाल कदम सह सर्व शिक्षक,कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.आभार रमेश सोनवले यांनी मानले.