शिक्षक काढणार महामोर्चा, 26 जानेवारीला उपोषण

33

🔸पुरोगामी शिक्षक समिती चे सभेत ठराव

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.20डिसेंबर):- पंचायत समिती अंतर्गत, शिक्षकांच्या समस्या सुटत नसल्याने शिक्षण विभाग चिमूर चे विरोधात शिक्षक 23 जानेवारीला महामोर्चा काढणार आहे समस्या न सुटल्यास 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन पासून साखळी उपोषण करण्यात येईल असा ठराव महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती चे तालुका सभेत घेण्यात आला.

शिक्षकांचा कपात झालेला आयकर त्यांचे पॅन वर जमा न करणे. शिक्षकांना 16 नंबर फॉर्म ची प्रत न देणे, DCPS ची कपात केलेली रक्कम जमा न करणे, शिक्षकांचे LIC चे काही हफ्ते गहाळ असणे, सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित असणे, वैद्यकीय देयके मंजूर होऊनही देयके निकाली न निघणे, रजा प्रवास देयके, या व इतर अनेक समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या आधी शिक्षकांनी ‘झाडू लगावो- धरणे आंदोलन’ करून समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले होते. शाळा गुणवत्ता तपासणी चे नावावर विषय तज्ञ शिक्षक्षांना शाळेवर पाठवून त्यांचे अहवालावर शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिल्या जात आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेत तपासणी पथक द्वारे शाळा तपासणी करणे, विषय तज्ञ व्यक्तींद्वारे शाळा तपासणी करणे याचा नाहक त्रास शिक्षकांना सहन करावा लागत आहे. शिक्षण विभाग चिमूर च्या या दबावतंत्र मुळे शिक्षकांच्या मनात कमालीची नाराजी पसरली आहे. त्या मुळे विषय तज्ञ शिक्षकांना आवश्यक रिक्त जागी अध्यापनाचे कार्य द्यावे अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. शिक्षण विभागाशी संबंध नसलेल्या व्यक्तीला गट शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार दिल्याने शिक्षण विभागात अनेक समस्या वाढल्या असे बोलल्या जात आहे.
——————————————–
शिक्षकांच्या समस्या निकाली न निघाल्यास, शिक्षण विभाग पंचायत समिती चिमूर चे विरोधात महामोर्चा काढण्यात येईल. समस्या न सुटल्यास संघटना 26 जानेवारी पासून साखळी उपोषण सुरू करणार.

गोविंद गोहणे
अध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती, चिमूर