मोहाडी सह्याद्री देवराई पदाधिकाऱ्यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

25

✒️नाशिक प्रतिनिधी(विजय केदारे)

मोहाडी(दि.26डिसेंबर):-येथील गोपालकृष्ण सह्याद्री देवराई पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे जाऊन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन येथील ट्री-म्युझियम या जैवविविधता पूरक वृक्षलागवड प्रकल्पास सहाय्य मिळणे बाबत चर्चा करून निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाने सह्याद्री देवराई महाराष्ट्राच्या अंतर्गत मोहाडी, ता. दिंडोरी, जि.नाशिक(महाराष्ट्र) या ठिकाणी ग्रामपालिकेच्या स्वमालकीच्या पडीक जागेवरती मागील तीन वर्षांपासून लोकसहभागातून निरंतर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन सुरू असून आजपर्यंत विविध पर्यावरणपूरक एकशे पाच देशीप्रकारातील साडेपाच हजार रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.

सदर देवराई ही परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात पर्यटन पूरक व्हावी यासाठी त्यामध्ये Biodiversity Park-जैववैविधता अंतर्गत बाॅटनिकल गार्डन, रॉक गार्डन मेडिटेशन विभाग,बटरफ्लाय गार्डन, प्ले ऐरिया, ग्रीन जिम,कॅक्टस गार्डन, फ्लावरगार्डन,एम्पीथेटर व देवराई मधील तळ्याचे सुशोभिकरण अशा बाबी उभारावाच्या असून सदर ट्री म्युझियम उभारणीस शासन स्तरावरून सहाय्य मिळावे अशा आशयाचे निवेदन व त्यासोबत या सर्व नियोजित आराखड्याची प्रत देण्यात आली. यावेळी मंत्रिमहोदयांनी देवराई सदस्यांकडून सर्व माहिती घेऊन सदर निवेदन योग्य त्या विभागाकडे पाठवून शासन स्तरावरून मदत करण्याचे व नाशिकला आल्यानंतर भेट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवराई पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांचा दुर्मिळ अजान वृक्षाचे रोपटे व नाशिकची बेदाणे पाकीट देऊन आभार मानले.