सावित्रीबाईचे विचार व कार्य तमाम समाजासाठी प्रेरणादायी -विशाल विमल – श्रीराम विद्यालयात उपक्रम

34

✒️मंचर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मंचर(दि.4जानेवारी):-सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य स्त्रीपुरुषांसह तमाम समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांना केवळ स्त्रीउद्धारक म्हणून मर्यादित ठेवू नये, असे प्रतिपादन महा. अंनिसचे राज्य पदाधिकारी आणि तारुण्यवेध संघटनेचे संघटक विशाल विमल यांनी केले.

सावित्री उत्सव 2023 अंतर्गत महा. अंनिस आणि तारुण्यवेध संघटनेच्यावतीने श्रीराम विद्यालय पिंपळगाव (मंचर) येथे सावित्री उत्सव साजरा केला. यावेळी विशाल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ टेके होते. यावेळी तारुण्यवेधचे अध्यक्ष विकास पोखरकर, नीता आवटे, विजया लायगुडे, अर्चना आचार्य, वैशाली खूडे, अविनाश वाडेकर उपस्थित होते. शरद कदम, प्रणिता वारे, विशाल विमल, प्रतीक्षा दापुरकर यांनी लिहिलेल्या सावित्री उत्सव पत्रकाचे प्रकाशन साऊ-ज्योतीच्या वारसदारांच्या हस्ते करण्यात आले.

महामाता आणि महापुरुषांचे कार्य हे सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारे असते. मात्र त्यांना त्यांच्या विशिष्ट जातीत बंदीस्थ केले आहे. सावित्रीबाई फुले या स्त्री उद्धारक आहेतच, पण त्यांना मुलींसह मुले, प्रौढ स्त्रीपुरुष आणि शेतकरी कष्टकऱ्यासाठी शाळा काढल्या. अनाथबालकाश्रम, अन्नछत्र उभारणी, दुष्काळ निवारण, प्लेग आजारात सेवाकार्य, बालप्रतिबंधक गृह उभारणी, काव्यलेखन, स्फुट लेखन आदी सर्व कामे सावित्रीबाई यांनी सगळ्या समाजासाठी केली आहेत. त्यामुळे त्यांना केवळ स्त्रीपुरते मर्यादित करू नये, असेही विशाल विमल म्हणाले.

बबन बांगर यांनी प्रास्ताविक केले. पत्रकाचे वाचन ऋतुजा पोखरकर यांनी केले. नितीन सासवडे यांनी आभार व्यक्त केले.