माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त धरणगावात वैचारिक प्रबोधन..

32

🔹राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व; लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.14जानेवारी):- येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठे समाज सभागृहात राजमाता – राष्ट्रमाता – स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक मराठे यांनी केले. तत्पूर्वी माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्यासह सु.क्ष.म.स.अध्यक्ष भरत मराठे व पंच मंडळाने माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर बबलू भगवान मराठे यांनी समाज मंगल कार्यालयाला जिजाऊ, शिवराय, व शंभूराजे यांचे तैलचित्र भेट स्वरूप दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठे समाजाध्यक्ष भरत धनलाल मराठे होते.

वैचारिक प्रबोधन कार्यक्रमात व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना सांगितलं की, राजे शिवराय १४ वर्षांचे असतांना शहाजीराजेंनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरीर सुपुर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी माँसाहेबांवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाऊ आणि बाल शिवराय पुण्यात येऊन दाखल झाले व उध्वस्त झालेले पुणे, दिमाखात पुन्हा वसवून त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिला. जिजाऊंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. शिवरायांना नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर राजकारणाचे पहिले धडेही दिले. राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या बळावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून स्वराज्याची स्थापना केली.

स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या, जीव धोक्यात घालावा लागला. पुत्राचा दररोज मृत्युशी चाललेला संघर्ष, उघड्या डोळ्यांनी बघुनही सैरभैर न होता, व चिंतेची साधी रेघही चेहऱ्यावर उमटू न देता त्यांनी खंबीरपणे स्वराज्याची निगरानी केली. एवढेच नव्हे तर राजमाता जिजाऊ या आजी झाल्यावर निवृत्तांसारखं न बसता नातू शंभूराजेंच्या मनातही अंत:करणात निर्भीड विचारांची पेरणी करून स्वराज्याभिमानाचं दिव्य स्फुलिंग चेतविलं! तीन पिढ्यांना स्वराज्याच्या ध्यासाने प्रेरित करणारी अशी राजमाता जिजाऊ होत्या. नुसतं राजमाता म्हटलं तरी ओठांवर आपसूक जिजाऊ शब्द येतो. राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व होय.

या देशाला एक नव्हें तर दोन – दोन छत्रपती देणाऱ्या, स्वराज्य निर्मात्या या राजमातेचा आदर्श व विचार आजच्या तरुण-तरुणींनी घ्यावा म्हणजे जिजाऊ आऊसाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे मत व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी करत उपस्थितांना अनमोल मार्गदर्शनाने मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे आयोजन सु.क्ष.म.स. अध्यक्ष व पंच मंडळ यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठे समाजाच्या सर्व युवक मित्रांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रम प्रसंगी असंख्य बाळगोपाळ, महिला, पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मराठे यांनी तर आभार प्रफुल पवार यांनी मानले.