हा आमदार हवा कुणाला?

53

विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रौढ मतदार असतात.त्यात पन्नास टक्के मतदारांना कळतच नाही कि,आपण मतदान तरी का करतो? पण करतो. मत देतो. द्यायचे तर फुकट का द्यावे ? असे कसे? कोणाही माणसाला काहीतरी द्यावे,पण फुकट का? नाही. जरी आम्हाला फुकट अधिकार मिळाला असला तरीही आम्ही त्याला असेट समजतो. ते काही माणसाप्रती,देशाप्रती प्रेम वगैरे काही नाही. तसे आम्ही जिवनात फुकट काहीच करीत नाहीत. आई बाप म्हातारा म्हातारे झाले, कमवत नसतील तर त्यांना सुद्धा फुकट जेवण देत नाहीत. आईने दिला असेल जन्म. पाजले असेल दूध. धुतले असेल ढुंगण. बापाने घेतले असतील कपडे.घेतले असतील पुस्तके.भरली असेल शाळेची फी. म्हणून काय झाले? त्यांनी पैदा केले तर त्यांचे कर्तृत्व होते ते. पण ते म्हातारे झाल्यावर त्यांना परत देणे, सेवेची परतफेड करणे माझे कर्तव्य नाही. आहेत वृद्धाश्रम. जावे तेथे. नाहीतर रेल्वेत, एसटीत भीक मागावी. मी माझी बायको पोरं सोडून यांच्यासाठी फुकट वेळ का घालवावा?असेही मी माझ्या जिवनात फुकट काहीच देत नाही, फुकट काहीच करीत नाही.

मी देवाला सुद्धा फुकट नमस्कार करीत नाही. काहीतरी बोली सोडवून घेतो. साकडे घालतो. अट घालतो. तेंव्हाच नमस्कार करतो. असेही, आईबाप म्हातारे झाले. काहीच कमवत नाहीत.काहीच कामाचे नाहीत. तर मग, कशाला वेळ घालवायचा त्यांच्यासाठी? गाय आटली कि आम्ही गाय सुद्धा कसाईला विकतो. तसा कोणी घेणारा असेल तर सांगा. म्हणजे जबाबदारी ही संपेल आणि दोन पैसा ही मिळेल.इतका व्यवहारी माणूस,इतका चलाख माणूस .आणि अशा कोणत्याही फुकट कोणाला फुकट मत देणार का? छे ! देश, लोकशाही गेली खड्ड्यात. जो पाकिट देईल,जो पैसे देईल, जो जेवण देईल, जो दारू देईल त्यालाच आम्ही मत देऊ. आम्ही मताचे पैसे घेऊ. तो सुद्धा आमदार झाल्यावर विधानसभेत, विधानपरिषदेत मताचे पैसे घेणारच आहे. आता हे आमदार मुंबई सोडून सुरत गुवाहाटी पळून गेले. ते काय फुकट गेले असतील का?ते काय धर्मार्थ गेले असतील का?शक्यच नाही. काहीतरी गाजर घातलेच असेल.

जर एक माणूस आमदार झाल्यावर महागडी गाडी मोटर, शाळा, कॉलेज, पेट्रोल पंप, फार्म हाऊस वगैरे घेतो ,ते काय कष्टाच्या पैशातून घेतो का? माझा प्रश्न आहे, आमदार इतकी संपत्ती आणतो कोठून? दाऊद, राजन वगैरे लोक म्हणे गांजा, अफू चरस विकतात. पण हे आमदार काय विकतात? अब्रूचे दुकान वगैरे तर नाही ना! हे सुद्धा आपले आधिकार विकतात. आमच्या वाट्याला येणारे धन धान्य अनुदान निधी विकतात. कांग्रेस असो कि भाजप असो कि राष्ट्रवादी असो कि शिवसेना, हे श्रीमंत माणसालाच का उमेदवारी देतात?फुकट देत असतील का? विचारा फडणवीस, पवार, ठाकरे, पटोले यांना. घ्या एकदा यांची नार्को टेस्ट,लाय डिटेक्टर टेस्ट. आमच्या भाषेत झाडाला उलटे टांगून धुराची धुणी लावा.झटका यांचे खिसे. सांगतील सगळे. पैसाच पैसा पडेल पोतडीभर.

राष्ट्र, लोकशाही वगैरे यांनीच बिघडवले. आमदाराचे पोरगं पुन्हा आमदार. खासदाराचे पोरगं पुन्हा खासदार. नाहीच काही जमले तर बाप आमदार आणि कार्टे झेडपीत. कार्टे नसले तर बायको. बायको नसली तर मैत्रीण. याला आम्ही लोकशाही म्हणायची का? याला आम्ही सेवा म्हणायची का? ही सेवा वगैरे काही नाही. मेवा आहे मेवा.तांबे, हिरे, सोने माणिक, पितळे, लोखंडे कोणीही असो. आम्ही पिढ्या दर पिढ्या यांनाच आमदार बनवायचे का? यांनाच मंत्री बनवायचे का? म्हणजे हे काय राजे आहेत का? जर हे राजे असतील किंवा तसे समजत असतील तर मग, लोकशाहीचे, निवडणुकीचे नाटक तरी कशाला करता? हे नाटक फडणवीस, पवार, पटोले, ठाकरे यांना कळते तर आम्हाला कळत नाही का? रात्रीची उतरल्यावर सकाळी तोंड धुवून सांगा, तुम्ही एकाच खानदान मधे उमेदवारी दिलीच कशी? नेमका हा आमदार हवा कोणाला?

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव