पाकिस्तानात स्वतंत्र सिंध देशाची मागणी?

25

पाकिस्तानातील शरीफ सरकारपुढील आव्हाने कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याने देश भिकेकंगाल झाला आहे. महागाई इतकी वाढली आहे की पाकिस्तानी नागरिकांना एकवेळचे जेवण करणे देखील मुश्किल झाले आहे. महागाईने जनता मेटाकुटीला आली आहे त्यामुळे जनता रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध आंदोलन करत आहेत. भुके कंगाल नागरिकांना दिलासा शरीफ सरकार अपयशी ठरत असतानाच आता शरीफ सरकारपुढे नवी डोकेदुखी उभी ठाकली आहे ती म्हणजे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लोक आता सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरत आहेत. सिंध प्रांतातील सिंधी लोक आता पाकिस्तान सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत. सिंध प्रांतातील नागरिक आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. इतकेच नाही तर या आंदोलनात सिंध प्रांतातील नागरिकांनी स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू धर्मीय नागरिक मोठया प्रमाणात राहतात.

या नागरिकांवर गेल्या काही वर्षांपासून अन्यायाची मालिका सुरू झाली असून ही अन्यायाची मालिका संपावी आणि हिंदू नागरिकांना त्यांचे अधिकार आणि हक्क प्राप्त व्हावेत यासाठी वर्ल्ड सिंधी कॉन्फरन्सने सिंध प्रांतातील या आंदोलनांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मागील काही काळात पाकिस्तानातील हिंदू महिलांवर विशेषतः सिंधी हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. या भागातील मुलींचे, महिलांचे फसवून, पळवून, सक्तीने धर्मांतर केले जात आहे. बलुचिस्तान आणि बैखुर प्रांतातून येणारे तेहरिक ए तालिबान पाकिस्तान संघटनेचे अतिरेकी या प्रांतातील नांगरिकांना लक्ष करत आहेत. वाढत्या अत्याचारामुळे येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. वारंवार सरकारला विनंती करूनही सरकार हे हल्ले रोखू शकत नाही त्यामुळेच हे नागरिक अस्वस्थ झाले असून त्यांनी स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली आहे.

या भागातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली असून हे अत्याचार कमी करण्यासाठी शरीफ सरकारने ठोस प्रयत्न करावेत अशी तंबी संयुक्त राष्ट्र संघाने शहाबाज शरीफ यांना दिली आहे. स्वतंत्र सिंधू देशाची मागणीला भारत आणि अमेरिकेने पाठिंबा द्यावा अशीही विनंती आंदोलनकर्त्यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांना केली आहे. अद्याप दोन्ही देशांनी यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी भविष्यात या दोन्ही देशांना आंदोलनकर्त्यांच्या या मागणीची दखल घ्यावीच लागेल आणि जेंव्हा या दोन्ही देशांचे प्रमुख या मागणीची दखल घेतील तेंव्हा पाकिस्तानचे आणखी शकले झालेली दिसतील.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५