घुग्घुस नगर परिषदेतर्फे दहा बगिच्यांची दुरुस्ती सुरु

31

🔹भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीला यश

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.3फेब्रुवारी):- शहरातील दहा बगिच्यांची व सार्वजनिक शौचालयाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी न.प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.याची दखल घेत नगर परिषदेतर्फे दहा बगिच्यांची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे.

त्यामुळे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीला यश आले आहे. घुग्घुस परिसरातील अनेक वार्डात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुंदर दहा बगिच्यांची निर्मिती करण्यात आली होती. या बगिच्यांच्या निर्मितीला तीन वर्षाचा लोटत आहे. त्याठिकाणी बसविण्यात आलेले लोखंडी जीमचे साहित्य मोडकळीस आले आहे.

बगिच्यामध्ये दररोज सकाळी लहान मुले खेळण्यासाठी तसेच जेष्ठ नागरिक आणि महिला व्यायाम करण्यासाठी जातात. परंतु तेथील लोखंडी साहित्य मोडकळीस आल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे ही समस्या लक्षात घेत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी निवेदनातून मागणी केली होती. तसेच नगर परिषदेतर्फे सार्वजनिक शौचालयाच्या जवळील कचरा सफाई करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.