प्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव

44

🔸शासकीय अनुदानात हजारो रुपयांचा भ्रष्टाचार

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.3फेब्रुवारी):- पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील भवानीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पगारी शिक्षक प्रविण गोसावी यांनी आपल्या जागी कायद्याची पायमल्ली करून अध्यापनासाठी डमी शिक्षक नेमला आहे. तसेच मुख्याध्यापक पदाच्या कालावधीत कोणतेही काम न करता हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तरी संबंधित शिक्षकावर तात्काळ चौकशी करून निलंबित करावे, अन्यथा ८ दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी ऑफिससामोर उपोषण करणार असल्याचा इशारा पुसेगाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष राम जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

राम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रविण गोसावी हे पुसेगाव येथील भवानीनगर शाळेत गेली पावणे पाच वर्षापासून कार्यरत आहेत. दोन वर्षे प्रभारी त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार  सांभाळला. या कालावधीत शासनाकडून शाळेच्या खर्चासाठी ५० हजार अनुदान आले होते. श्री गोसावी यांनी मेडिकल, स्टेशनरी आणि फर्निचर इत्यादींची बिले सादर करून दुकानदारांच्या नावावर चेक काढले. मात्र काही दुकानदारांकडून वस्तू खरेदी करण्याऐवजी रोख रक्कम स्वतःकडे घेऊन हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केला. या विषयांतील पालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना मुख्याध्यापक पदाचा राजीनामा द्यावा लागला.

प्रविण गोसावी हे सध्या चौथीच्या वर्गाचे वर्गशिक्षक आहेत. त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली तर शिक्षण विभागाला लाज वाटेल. ते आपले ज्ञानदानाचे कार्य सोडून तास न तास मोबाईलमध्ये खेळत असतात. त्यांच्या या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे. श्री गोसावी हे शाळेच्या आवारात व वर्गात गुटखा, तंबाखूचे सेवन करताना विद्यार्थी, पालकांना आढळून येतात. म्हणून पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक भूमिका घेतली. व्यसनाधीनता अडकल्यामुळे त्यांनी स्वताच्यात सुधारणा न करता आपल्या जागी चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ५ हजार पगारावर “डमी शिक्षकाची” नेमणूक केली आहे. त्यांनी केलेली डमी शिक्षकाची नेमणूक ही कायद्याच्या चौकटीत कुठेही बसत नाही.असे असताना ही  डमी शिक्षकाला श्री गोसावी हे स्वतःच्या खिशातील पगार देतात. अशा चुकीच्या प्रकाराला शिक्षण विभागाने पांघरून घातले तर जिल्ह्यात डमी शिक्षकांचे पेव माजेल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा वाईट दिवस येतील. डमी शिक्षक प्रकरणाचे वस्तुनिष्ठता तपासून शहानिशा करावी.

या व्यतिरिक्त पत्ते खेळणे, दारू पिणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे अशा वागणूकीमुळे शाळेची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे. गोसावी यांच्याकडून शिक्षकी पेशाला काळीमा फासला जाईल अशी वागणूक कायमच केली जात आहे. त्यामुळे प्रविण गोसावी यांची चौकशी करून त्यांचे तात्काळ निलंबित होणे गरजेचे आहे.

*प्रविण गोसावी दोषी असल्यास कारवाई करणार : शबनम मुजावर*

चौकट :
प्राथमिक शिक्षण विभागात डमी शिक्षकांचा गैरप्रकार सुरु असेल तर ही बाब चुकीची आहे. खटाव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तात्काळ अहवाल  मागवून घेणार आहे. या प्रकरणात प्राथमिक शाळेचे शिक्षक दोषी असतील तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे योग्य ती कारवाईसाठी प्रस्तावित करणार आहे, अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.

*शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलावीत: राम जाधव*

चौकट :
ग्रामसभेने ठराव घेतल्यानंतर गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी तत्काळ भवानीनगर शाळेला भेट देऊन तपासणी केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी गोसावी यांच्याविरोधात डमी शिक्षक, व्यसनाधीनता आणि असभ्य वर्तन आदी लेखी तक्रारी लिहून दिल्या आहेत. यावर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलावीत : राम जाधव